

आपला देश स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान नावाच्या कॅन्सरने त्याला कायमचे जखडून ठेवलेले आहे. आज देश प्रगतिपथावर असताना शेजारी देश धर्माच्या नावावर सुखा-समाधानाने नांदत असलेल्या काश्मीरवर दहशतवादी हल्ला करतो हे त्या देशाचे दुर्दैव आहे, हे निश्चित. सद्यपरिस्थितीला पाकिस्तानची स्वतःची परिस्थिती बिकट आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेकडून कर्ज घेऊन कशीबशी त्या देशाची वाटचाल सुरू आहे.
सामान्य पाक नागरिक नेहमीचे जीवन जगताना हालअपेष्टा सहन करत आहे. अशावेळी काहीतरी कुरापत काढून भारतातील सामान्य नागरिकांवर काश्मीरमध्ये हल्ला करणे म्हणजे पाकिस्तानने स्वतःवरच संकट ओढवून घेतले आहे, हे निश्चित. कुठलेही मोठे व्यवसाय नाहीत, कोणते कारखाने नाहीत, साधी सुईही तयार होत नाही अशा देशाने गेल्या 80 वर्षांत काय साध्य केले आहे, हा मोठाच प्रश्न आहे. पाकिस्तानमध्ये एकच कारखाना आहे आणि तो म्हणजे दहशतवादी तयार करण्याचा. वेळोवेळी जाणीव देऊन भारताने योग्य तो बंदोबस्त केला होता; पण एवढ्यावर हा शेजारी सुधारेल अशी शक्यता दिसत नाही. पाकिस्तानची स्वतःची अर्थव्यवस्था बिकट आहे.
चीनसारखे देशसुद्धा पाकिस्तानला कर्ज देऊन थकून गेले आहेत. या पाकिस्तानचा एकमेव प्रश्न म्हणजे त्याला भारताची प्रगती पाहवत नाही. सगळे पाकिस्तानी जान कुरबान करत काश्मीर आपल्या ताब्यात आणण्यासाठी आसुसलेले आहेत. काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, त्याला पाकव्याप्त काश्मीर असे आपण म्हणतो. या पाकव्याप्त काश्मीरमधील जनता पाकिस्तानच्या कचाट्यातून सुटण्यासाठी नेहमी आंदोलने करत असते. त्यांचे जगणे तिथे मुश्कील झालेले आहे. पाकव्याप्त काश्मीर हा स्वतंत्र भाग आहे, असे दाखवण्यासाठी पाकिस्तानने तिथे वेगळा झेंडा आणि एक बाहुलीवजा पंतप्रधान कायम ठेवलेला आहे.
गवत खाऊन राहू; पण अणुबॉम्ब तयार करू, असे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान कैलासवासी भुट्टो म्हणत असत. इकडून तिकडून तंत्रज्ञान चोरून त्यांनी अणुबॉम्बही तयार केला. हा अणुबॉम्ब कधी ना कधीतरी भारतावर टाकून विकृत आनंद मिळवायचा यासाठी तो देश तयार आहे.
नुसत्या अणुबॉम्बवर युद्ध जिंकता आले असते, तर कित्येक देशांनी फक्त अणुबॉम्ब आणि ते डागणारी क्षेपणास्त्रे बरोबर ठेवली असती. एकाही सैनिकाची भरती करण्याची गरज नव्हती. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अत्यंत मजबूत अशी अर्थव्यवस्था लागते जी भारताकडे आहे आणि त्या तुलनेत पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्ण खिळखिळी झालेली आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आपल्या देशात अत्यंत संतप्त अशी भावना आहे. आपल्या देशाच्या प्रगतीला लागलेला हा कॅन्सर आज न उद्या काढावाच लागणार आहे.