

पुजारी : अहो ताईसाहेब, काय अनर्थ हा! आरतीचे ताट द्या त्यांना. देवाशी नडू नका. ताटातले तांदूळ कबुतरांना टाकल्यागत काय फेकता मूर्तीवर?
ताईसाहेब : आम्ही आजवर लांब राहिलो म्हणून रक्तगट बदलला का आमचा? आम्ही वारस आमच्या घराण्याचे. आम्हाला समजतं काय ते.
पुजारी : देवाच्या दरबारी कोणी वारस वगैरे नसतं, देवाला सगळे सारखेच. नीट आरती धरा. नाहीतर कबूतर म्हणून उडवाल. तिकडे तीर्थरूपांचे ठोके चुकताहेत.
ताईसाहेब : आरती आम्हीच करणार. सगळे सारखेच देवाला. हो ना रे?
भाऊसाहेब : होच मुळी. कर तू आरती. मी टाळ वाजवतो.
ताईसाहेब : तुला टाळ वाजवावेच लागतील.
भाऊसाहेब : का बरं? आरतीपुरताच मान असतो टाळ आणि भक्तांना. करा आणि निघा इथून.
ताईसाहेब : आता आमच्या तीर्थरूपांना जमणार नाही वय झाल्याने. तुम्ही आमचे सख्खे नाहीत. तुम्ही नका यात पडू.
पुजारी : अहो ताईसाहेब, आपल्याच तीर्थरूपांचा हा आदेश आहे. आरतीचा मान तुम्हाला नाही देता येणार. आपण कबुतरं उडवायला गेला तेव्हा आपले तीर्थरूप एकटे पडले होते. आता महानगरपालिकेने कबुतरं उडविण्याचं काम हाती घेतलं तेव्हा आपले हात रिकामे झाले, म्हणून आरतीचे ताट हाती घ्यायला निघाला.
ताईसाहेब : ए तू कोण? गप्प बस ना!
पुजारी : मी गप्प बसलो तर पूजा कोण करणार? फक्त आरतीने पूजा संपन्न होते का?
ताईसाहेब : मग कर पूजा. घुटरघूं बंद कर आता.
पुजारी : मी घुटरघूं करत नाही. मागे बघा. कबूतर आहेत. त्यांना हाकला. तुम्ही जिकडे जाता तिकडे कबुतरं कशाला घेऊन फिरता हो? कसं वाटतं ते.
ताईसाहेब : ओ माय गुडनेस. हर हायनेस आहे मी त्यांची. म्हणून सोबत येतात. तुमचं काय जातं?
पुजारी : भाऊसाहेब, उडवा ती कबुतरं. किती घाण करतात.
भाऊसाहेब : संगतीचा परिणाम, दुसरं काय?
ताईसाहेब : तू घालवूनच दाखव या कबुतरांना, यशस्वी झालास की महानगरपालिकेत कबुतरं उडवायचं काम देते. चांगला पगार देतील.
भाऊसाहेब : खरंच? मग कर तू आरती. देवच पावला. महानगरपालिकेत कोणतेही काम चालेल. मी करायला तयार आहे.
ताईसाहेब : आम्ही कबुतरांना पाळतो. सोडत नाही. शिक आमच्याकडून. ताई म्हणतोस ना! आता हर हायनेस म्हणायचं!
भाऊसाहेब : येस, हर हायनेस. चला..!
- बिलंदर