पहिला चहा : साहेब, जरा शांत बसा!

Editorial
पहिला चहा : साहेब, जरा शांत बसा!
Published on: 
Updated on: 

अमेरिका किती मोठा देश. जगातील महासत्ता. हा देश एरवी जगाचा पोलिस म्हणून काम करतो; पण याच महासत्तेच्या संरक्षण मंत्र्याला एका अमेरिकन सैनिकाने ‘जागा’ दाखवून दिल्याची घटना घडली आहे. अमेरिकेत समाधीसमोर हसण्याचे स्वातंत्र्यही आहे, असा समज संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी करून घेतलेला असावा; पण तेथील राष्ट्रीय स्मशानभूमीत एका सैनिकाने संरक्षण मंत्र्यांचा हा समज दुरुस्त केला. त्याने चक्क अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनाच शांत राहण्याची सूचना केली. म्हणजे संरक्षण मंत्र्याला सैनिकाने शिस्तच शिकवली की हो!

या समाधीचे नाव आहे 'अज्ञात सैनिकाची समाधी'. संरक्षणमंत्री पीट हेगसेथ पत्नी आणि सल्लागारांसह आले. छायाचित्रे काढली. छायाचित्र काढताना एका महिलेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. आता फोटो काढताना चेहरा गंभीर ठेवायचा की फोटो चांगला यावा म्हणून हसायचे? अमेरिकन राजकारणात दुसऱ्या पर्यायाला अधिक पसंती असावी. त्यामुळे अर्लिंग्टनच्या स्मशानभूमीत कॅमेरा अँगलसाठी हास्य फुलले असेल; पण समाधीवरील पहारेकऱ्याला शहिदांचा सन्मान महत्त्वाचा वाटला. त्याने सर्वांना शांत राहण्यास सांगितले.

या समाधीवर ‘द ओल्ड गार्ड’चे सैनिक ९० वर्षांपासून चोवीस तास पहारा देतात. त्यांच्यासाठी ती केवळ नोकरी नसते. ती शहिदांप्रती निष्ठा असते. त्यामुळे तिथे आवाज कमी आणि आदर जास्त असणे अपेक्षित असते; पण राजकीय नेते जिथे जावे तिथे सोबत कॅमेरे, सल्लागार आणि प्रसिद्धीची सावली सोबत घेऊन जातात. शांततेच्या ठिकाणीही त्यामुळे प्रसिद्धीचा आवाज पोहोचतोच! काहींनी टीकाही केली की, हेगसेथ यांना प्रत्येक ठिकाणी स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचे असते. राजकारणात लक्ष वेधून घेणे हा गुण असतो; पण समाधीसमोर तोच गुण-अवगुण ठरू शकतो. कारण, तिथे काही शिस्तीचे सैनिकही असतात.

त्या सैनिकाने संरक्षणमंत्र्यांना एक साधा संदेश दिला. 'समाधीसमोर शांत राहा, शहिदांचा सन्मान करा' हा संदेश केवळ हेगसेथ यांच्यासाठी नव्हता. तो प्रत्येक सत्ताधाऱ्यासाठी होता. कारण, पद मोठे असले, तरी कर्तव्यापेक्षा मोठे नसते आणि काही ठिकाणी फोटो काढण्यापेक्षा मान झुकवणे अधिक महत्त्वाचे, नाही का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.