पहिला चहा : बुलेटप्रूफ हीरोगिरी...

pahila chaha
बुलेटप्रूफ हीरोगिरी
Published on: 
Updated on: 

बॉलीवूडमध्ये आता अवघड झालंय ते म्हणजे सेलिब्रिटींचं निर्धास्तपणे घराबाहेर पडणं! टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला. पोलिस तपासात टायगर हा हल्लेखोरांचं खरं लक्ष्य नव्हता तसेच इतर सेलिब्रिटींची रेकी झाल्याच्या बातम्यांनी इंडस्ट्रीत चिंतेचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे भाईजान आणि खिलाडीकुमार यांनी घरांभोवती बुलेटप्रूफ काचा उभारल्या.

भाईजानची तर बातच न्यारी! पडद्यावर त्याची दबंगगिरी पाहून भलेभले खलनायक गारद होतात. ‘एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी…’ हा डायलॉग भाईजानने अनेकदा मारला असेल. पण, हल्लेखोरांनी त्याच्या कमिटमेंटचा मान ठेवलेला दिसत नाही! आता घरातून बाहेर पडण्याआधी सिक्युरिटीची परवानगी घेणे, हीच भाईजानची खरी शहाणपणाची कमिटमेंट आहे! भाईजान फार्महाऊसवर जाऊन राहू शकतो आणि तिथूनच बिग बॉसच्या शूटिंगला जाऊ शकतो.. पण, बिग बॉसच्या स्पर्धकांवर नजर ठेवण्याऐवजी भाईजानला स्वतःच्या घराभोवतीच्या कॅमेऱ्यांवरच जास्त लक्ष ठेवावं लागेल! भाईजानच्या आयुष्यात ट्विस्ट काही कमी होत नाहीत. पूर्वी भाईजानच्या घराबाहेर चाहते गर्दी करायचे. आता चाहत्यांपेक्षा सुरक्षा रक्षकांची संख्या जास्त झालीय!

तिकडे खिलाडीकुमारची वेगळीच पंचाईत! चित्रपटात हेलिकॉप्टरला लटकणारा आणि खतरो का खिलाडी असलेल्या खिलाडीकुमारचा मॉर्निंग वॉक बंद झालाय. इतकी वर्षं पहाटे उठून उगवता सूर्य पाहिलेला खिलाडीकुमार आता सूर्य उगवण्याआधी सिक्युरिटीचा रिपोर्ट पाहू लागला आहे. चित्रपटात मृत्यूला चकवा देणाऱ्या खिलाडीला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र सिक्युरिटी गार्डकडून घराबाहेर पडताना क्लिअरन्स घ्यावा लागतो. हीरोगिरी इसमें है! हे त्यालाही पटलंय. पूर्वी खिलाडीकुमारला स्टंटसाठी बॉडी डबल लागायचे नाही; आणि आता त्याच्या घराबाहेरच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड डबल ठेवावे लागत आहेत.

दोघांचेही राजकारण्यांशी संबंध आहेत. भाईजान पतंगबाजी करतो, तर खिलाडीकुमार मुलाखती घेतो. पण, तरी बुलेटप्रूफ शांतताही मिळेल की नाही, सांगता येत नाही. शेवटी काय, बुलेटप्रूफ काच घराभोवती उभारता येते; भीतीभोवती नाही. चित्रपटात ‘कट’ म्हटलं की गोळीबार थांबतो, खलनायक पडतो आणि हीरो सुखरूप घरी जातो. पण, वास्तवात मात्र सुरक्षेची जबाबदारी पोलिसांनाच पार पाडावी लागते. वास्तवात कट म्हणायला दिग्दर्शक नसतो...

- दिनू मास्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news