Padma Awards: प्रकाशाची बेटे

सामाजिक भान जपत आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाची सेवा नित्यनेमाने बजावणाऱ्या व्यक्तींना देशातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झाले
Padma Awards
Padma Awards: प्रकाशाची बेटेPudhari Photo
Published on
Updated on

सामाजिक भान जपत आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाची सेवा नित्यनेमाने बजावणाऱ्या व्यक्तींना देशातील मानाचे पद्म पुरस्कार जाहीर झाले. पाच जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्रीने गौरवण्यात आले. या संख्येपेक्षा त्यातील गुणात्मकता महत्त्वाची; अपवाद सोडता सर्वच व्यक्तींची निवड सार्थ म्हणावी अशाच श्रेणीतील. साहजिकच त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया समाजसेवी व्यक्ती-संस्थांना त्यांच्या कार्यासाठी उभारी देणाऱ्या ठरतील.

समाजाला नकारात्मकतेची काजळी चढू लागली आहे की काय, अशी वाढत चाललेली चिंता आणि संवेदनशील समाजमनाला विखारी विद्वेषाचे, भेदा-भेदाचे चटके बसू लागले असताना तशी काळजी करण्याचे कारण नाही, असा संदेश देणारी ही प्रकाशाची बेटे या पुरस्कारांच्या निमित्ताने उजेडात आली. निमित्त पुरस्काराचे असले, तरी ही महान माणसे त्यासाठी कधी थांबली नाहीत वा नव्हती, वा त्यांनी आपल्या कामात कधी खंड पडू दिला नव्हता. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरून, इतिहास घडवणारे ग््रुाप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना देशातील सर्वोच्च अशोकचक्र हा शौर्य पुरस्कार जाहीर झाला.

केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही. एस. अच्युतानंद यांना मरणोत्तर पद्मविभूषण हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन आणि भाजप नेते विजयकुमार मल्होत्रा यांनाही मरणोत्तर पद्मभूषण जाहीर झाला. सोरेन यांनी जमीनदार आणि सावकारांविरुद्ध संघर्ष केला. तसेच स्वतंत्र झारखंड राज्यासाठी अभूतपूर्व आंदोलन उभे केले होते. पद्मविभूषणप्राप्त एन. राजम या अव्वल व्हायोलिनवादक असून, वडील ए. नारायण अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली स्वतंत्र शैली विकसित केली. व्हायोलिनवर विशेषतः ख्याल गायकी अंग परिपूर्ण कलात्मकतेने सादर करण्याबद्दल त्या प्रसिद्ध. मामुटी यांना पद्मभूषण मिळाला असून आजवर मल्याळी, तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी आणि इंग््राजी अशा 400 चित्रपटांत त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.

व्यावसायिक त्याचप्रमाणे प्रयोगशील चित्रपटांत कसदार अभिनयाचे दर्शन त्यांनी वारंवार घडविले आहे. धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या अगणित चाहत्यांना समाधान मिळाले असेल. महाराष्ट्रातील 15 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र मागे नाही, हे कला आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी दाखवून दिले आहे. व्यापार व उद्योग क्षेत्रातून अशोक खाडे व सत्यनारायण नुवाल आणि सौरऊर्जा, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स व फोटोव्होल्टाईक तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनासाठी ओळखले जाणारे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक जुझेर वासी यांचा पद्मश्री पुरस्काराने यथोचित गौरव झाला आहे. गेली 26 वर्षे छत्तीसगडसारख्या आदिवासी क्षेत्रात निष्ठेने काम करत बस्तर येथे गोरगरीब आदिवासींसाठी आरोग्यसेवा देणाऱ्या डॉ. रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले या दाम्पत्याला सार्थपणे पद्मश्री मिळाली आहे. मूळच्या साताऱ्याच्या या दाम्पत्याने आपला गाव सोडून वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून या आदिवासींना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचले.

प्रसिद्ध तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना 92 व्या वर्षी पद्म पुरस्कार घोषित करण्यात आला. ते जव्हारचे असून, तारपा घेऊन तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली आदिवासी संस्कृती जोपासली आहे. समाज विकासाच्या नावाखाली अधिक पाश्चात्त्य होत असताना आणि जुन्या कला, परंपरा लोप पावत चालल्या असताना तारपावादन कला जिवंत ठेवणाऱ्या या माणसाचा गौरव तसा उशिराच होत आहे. पद्मश्री रघुवीर खेडकर हे संगमनेरचे सुपुत्र असून, ज्येष्ठ तमाशा कलावंत आहेत. मातोश्री कांताबाई सातारकर यांच्याकडून त्यांना लोककलेचा हा वारसा मिळाला. अलका याज्ञिक या तीन दशकांपासून अधिक काळ पार्श्वगायन करत असून, त्यांची असंख्य गाणी लोकप्रिय झालेली आहेत. त्यांना पद्मविभूषण मिळाला.

रोहित शर्मा, हरमन प्रीत, सविता पुनिया, विजय अमृतराज यांच्यासारख्या खेळाडूंचा या पुरस्कारामुळे मोठा सन्मान झाला. विविध क्षेत्रांत मूलभूत कामगिरी करणाऱ्या लोकांचा गौरव हा इतरांना प्रेरणा देणारा ठरतो. केंद्र सरकारने संकुचित विचार न करता योग्य व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन एक गौरवशाली परंपरा जपली आहे. मराठवाड्यातील शेतकरी विशेषत: कापूस उत्पादक शेती परवडत नसल्याने आत्महत्येचा मार्ग धरत असताना कापसावर संशोधन करून स्वत:चे तंत्रज्ञान विससित करणारे आणि त्याचा लाभ थेट बांधावरील शेतकऱ्याला देणारे परभणीचे श्रीरंग देऊबा लाड यांचेही काम पडद्याआड राहिले होते.

ते या पुरस्काराने देशासमोर आणले गेले. विकसित भारताच्या दिशेने देशाची वेगाने वाटचाल सुरू असून, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य अशा सर्व गोष्टींचा विचार केला, तर तो परिपूर्ण विकास म्हणता येईल. त्यादृष्टीने यंदाची पुरस्कार्थींची निवड संतुलित आहे, असेच म्हणावे लागेल. 1954 मध्ये पद्म पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. आजवर फक्त 1978, 1979, 1993 आणि 1997 मध्ये हे पुरस्कार जाहीर केले नव्हते. भारतातील प्रत्येक नागरिक मग त्याचा धर्म, जात, वय, लिंग कोणतेही असो तो या पुरस्कारांसाठी पात्र असतो. फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार दिले जाऊ शकत नाहीत; मात्र सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांना हे पुरस्कार दिले जाऊ शकतात. अगदी परदेशी नागरिकांनादेखील दिले जाऊ शकतात.

भारताचे पहिले ‌‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ‌’ जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. एखाद्या व्यक्तीला एक पद्म पुरस्कार दिल्याच्या किमान पाच वर्षांनंतरच पुन्हा दुसरा पद्म पुरस्कार दिला जाऊ शकतो. यंदाचे हे पुरस्कार जाहीर झाल्याने ही कर्तृत्ववान माणसे, त्यांचे आभाळाएवढे काम, समाजाची सकारात्मक आणि उजळ बाजू ठळकपणे समोर आली. त्याने मरगळलेल्या समाजमनाला प्रेरणा मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news