

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर बहीण-भावांना ओढ असते ती राखी पौर्णिमेच्या सणाची. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक नाते जपण्यासाठी कुठला ना कुठला तरी सण आहे आणि हेच वैशिष्ट्य आहे. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला घसघशीत ओवाळणी टाकतो ही राखी पौर्णिमेची प्रथा आहे. भाऊ येऊ शकत नसेल तर बहीण माहेरी जाऊन त्याला ओवाळते आणि बहीण येऊ शकत नसेल तर भाऊ तिच्या सासरी येऊन तिला ओवाळतो. परंतु हे नाते दरवर्षी अधिक मजबूत होत जाते.
सध्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींचा बोलबाला आहे. विधानसभेला महायुतीने लाडक्या बहिणींना दरमहा ओवाळणी टाकायला सुरुवात केली. उशिरा अर्ज करणार्या लाडक्या बहिणींचा अर्ज पण सरकारने स्वीकारला आणि त्यांनाही दरमहा ओवाळणी सुरू केली. शासकीय प्रक्रिया ही कागदपत्रे पाहून केली जाते. या लाडक्या बहिणींच्या अर्जासोबत सुमारे 14 हजार 298 पुरुषांनीही अर्ज केले आणि योजनेचा लाभ घेतला. ही सर्व प्रक्रिया त्यांनी कशी केली असेल, त्यांना काय अडथळे आले असतील, त्यावर त्यांनी कशी मात केली असेल, याचा खरे तर सखोल अभ्यास व्हायला हवा. या लाडक्या भावांचे चुकीचे अर्ज मंजूर करणार्या लाडक्या कर्मचार्यांची पण सखोल चौकशी झाली पाहिजे असे वाटते. या लाडक्या भावांच्या गर्दीत हे हजारो दुसरेच भाऊ बहिणींच्या नावाने शिरले. आता महिन्याला पैसे मिळत असल्याने लाडकी बहीण पण खूश असते आणि लाडके भाऊ पण खूश असतात. महिलांच्या योजनांचा लाभ पुरुषांना होत आहे हे दिसून येताच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. इथे पण त्यांनी पुन्हा बहिणींना झुकते माप दिले आहे. चुकीच्या पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतले, त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही; मात्र महिलांचे पैसे पुरुषांनी घेतले असतील तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजे.
सर्व प्रकारची शासकीय कागदपत्रे सादर करून आपण बहीण आहोत असे सिद्ध करणारे हे भाऊ तर बुद्धिमान असेच म्हणावे लागतील. पूर्वी नाटकांमध्ये महिला काम करत नसत तेव्हा पुरुष पात्र महिलांच्या साड्या आणि शृंगार करून स्त्री पात्र उभे करत असत. बालगंधर्व हे नटश्रेष्ठ यासाठी इतके प्रसिद्ध होते की, त्यांनी केलेल्या फॅशनचे अनुकरण त्या काळातील महिला करत असत. असाच काहीसा भपका तयार करीत 14 हजार पेक्षा जास्त लाडक्या भावांनी शासनाच्या गल्ल्यामध्ये हात घातला आहे.
शासकीय योजनेचा पद्धतशीर अभ्यास करून, स्वतःला स्त्रीरूपात आणून त्याप्रमाणे कागदपत्रे तयार करून, महिलांसाठीच्या योजनांचा लाभ घेणारे पुरुष आपल्या राज्याबाहेर कुठे असतील असे वाटत नाही. इतकी बुद्धिमत्ता इतर राज्यांमध्ये कुठून असणार? त्यांची नावे जाहीर करून त्यांचा सन्मान केला पाहिजे. कारण हा त्यांचा नव्हे तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा सन्मान असणार आहे हे निश्चित.
कलंदर