

अमेरिकेच्या रस्त्यांवर लाखो लोक ‘नो किंग्ज’च्या घोषणा देत उतरतात, त्यावेळी तो अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासाठी धोक्याचा ‘वेक अप कॉल’ आहे, असेच म्हटले पाहिजे; पण त्यांची मानसिकता लक्षात घेता ते हे आंदोलन गांभीर्याने घेण्याची शक्यता कमी आहे. त्यांनी एआय आधारित व्हिडीओतून निदर्शकांची खिल्ली उडवली, त्यावरून हे स्पष्ट दिसते. एकीकडे आपण राजा नाही, असा दावा करीत असताना व्हिडीओत राजाचा मुकूट घालून लढाऊ विमान चालवत न्यूयॉर्कमधील आंदोलकांवर ‘पूप बॉम्ब’ (मलमूत्राची घाण) टाकताना ते दिसतात. अमेरिकेच्या अध्यक्षांनी या पातळीवर जाऊन नापसंती दाखविण्याचा हा अमेरिकेच्या इतिहासातील पहिलाच विकृत प्रकार असावा.
आपण सर्वसत्ताधीश असून विरोधी नेते आपल्यापुढे नतमस्तक होत असल्याचे त्यांनी त्यातून दाखविले. अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यातील थॉमस पेन यांनी ‘अमेरिकेत कायदाच राजा आहे’ याचा उच्चार केला, त्याचा सध्याच्या राज्यकर्त्यांना सोयीस्कर विसर पडला आहे. विरोधकांचे आंदोलन हे अमेरिकेविषयीच्या द्वेषाचे आंदोलन असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे म्हणणे आहे; पण वॉशिंग्टन डीसीपासून लॉसएंजलिसपर्यंत अडीच हजारांवर रॅलीतून सुमारे 70 लाखांवर निदर्शक ट्रम्प प्रशासनाच्या एकाधिकारशाहीविरोधात निर्भीडपणे जोखीम पत्करत उभे ठाकले, ते अमेरिकेवर प्रेम करणारे होते. लोकशाही आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी ज्यांनी बि—टिशांविरोधात लढा दिला, प्रसंगी प्राणाची आहुती दिली, त्यांच्या मूल्यांचा आदर राखून ही मूल्ये प्राणपणाने जतन करण्यासाठीची ही शांततापूर्ण लोकचळवळ होती. ट्रम्प सत्तेवर आल्यापासून अमेरिकेचा आत्मा असलेल्या लोकशाहीची पायमल्ली होत असून त्याचाच उद्रेक या आंदोलनातून व्यक्त झाला. ‘नो किंग्ज’ आंदोलनाची पहिली ठिणगी या वर्षीच्या मध्यास ट्र्म्प यांचा 79 वा वाढदिवस आणि अमेरिकन लष्कराच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य लष्करी परेडचा कार्यक्रम झाला, त्यादिवशी पडली.
व्यक्तिगत सत्तेच्या प्रदर्शनासाठी हा खर्चिक घाट घातल्याचे आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केले. त्यावेळच्या आंदोलनापेक्षाही यावेळचा उद्रेक तुलनेने मोठा होता. त्यातून ट्रम्प यांच्या लहरी, मनमानी कारभाराविषयीचा सार्वत्रिक असंतोष व्यक्त झाला. त्यातच सध्या अमेरिकन सरकारचे बरेच कामकाज शटडाऊनमुळे ठप्प आहे. संकुचित पक्षीय राजकारणाने कळस गाठलेला आहे. सर्वाधिक राग ज्या क्रूर पद्धतीने कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना बेकायदेशीर स्थलांतरितांची जी धरपकड होत आहे, त्यावर असल्याचे या आंदोलनातून दिसले. शांततापूर्ण आंदोलनाला देशद्रोह मानून दहशत निर्माण करणे, विरोधी राज्यांचे गव्हर्नर हटवणे, विरोधी पक्षाचे प्राबल्य असणार्या भागात नागरिकांना त्रास देणे, राजधानीसह मोठ्या शहरांत लष्कर तैनात करणे, लष्कराच्या नजरेत आपल्याच नागरिकांना अप्रत्यक्ष शत्रू ठरविणे, माध्यमांची गळचेपी करणे इत्यादी असंख्य उदाहरणे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यशैलीवर आणि बेताल वर्तनावर प्रकाश टाकणारी आहेत. त्यांना रोखणारेही आता कोणी नाही. अशा व्यक्तीशी वागायचे कसे, याचा जगातील अनेक देशांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
टॅरिफ तसेच एच वन बीचे शुल्क 1 लाख डॉलर करून भारताची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न उघड झाला. भारत-पाक युद्ध थांबविल्याचा दावा तब्बल 30 हून अधिकदा केल्याने त्यांना खोटे दावे करण्यापासून रोखणेही अवघड झाले. पाकिस्तानी राज्यकर्त्यांना जवळ करून भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचा त्यांचा डाव आहे. आपणच अमेरिकेचे तारणहार असल्याचा दावा करून ‘अमेरिका फर्स्ट’चा नारा देत आपल्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ समर्थकांना खूश करण्यावरच त्यांचा भर दिसतो.
अमेरिका आता पूर्वीची राहिलेली नाही. अमेरिकन ड्रीम संपल्यात जमा आहे, अशी भाषा ट्रम्प यांच्या या कारभारामुळे जगभर होत आहे. त्याविषयीची चिंता ‘नो किंग्ज’ आंदोलनातून प्रकट झाली. अमेरिकेचे दुंभगलेपणही त्यातून लक्षात येते. बेकायदेशीर स्थलांतरितविरोधी मोहिमेने ट्रम्प यांच्या कार्यकाळात दुसरे टोक गाठले. त्यांच्या कार्यशैलीने नेतृत्व आणि ‘व्यक्तीपूजा’ यांच्या सीमारेषा धूसर झाल्या. ते आता पूर्ण एकाधिकारशाहीकडे चालल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या समर्थकांना त्यांच्या चुकांशी, दोषारोपांशी घेणे-देणे नाही. ते कोणत्याही स्थितीत त्यांच्या पाठीशी राहणारच. या समर्थकांना ही निदर्शने ‘लिबरल इलिटस’ची खेळी वाटतात. त्यांच्या मते हे आंदोलन ‘डीप स्टेट’च्या विरोधाचा एक भाग आहे. या परस्पर संशयामुळे कटुता वाढली असून प्रत्येक पक्ष दुसर्याला विरोधक नव्हे, तर शत्रू मानतो. परिणामी, या राजकीय ध—ुवीकरणाने येथील संवाद संपुष्टात आला आहे.
विरोधी डेमोक्रॅटिक पक्ष सध्या निर्नायकी असून भावी धोरणांबाबत चाचपडताना दिसत आहे. म्हणूनच डेमोक्रॅटिक पक्षापुढील खरे आव्हान ‘नो किंग्ज’ आंदोलन हे केवळ ट्रम्पविरोधाचे साधन न राहता ते अमेरिकेची घटना, संस्थात्मक चौकट यांचे रक्षण करण्याचे राहील. लोक ट्रम्प यांच्या राजेशाही वर्तनाचा निषेध करीत आहेत; पण त्याचवेळी ज्या राजकीय व्यवस्थेने हे घडू दिले, त्याचाही निषेध करीत आहेत. हा विरोधाभास समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. ट्रम्प यांचा उदय याच राजकीय व्यवस्थेच्या अपयशातून झाला. जागतिकीकरणामुळे आणि सांस्कृतिक उदारमतवादामुळे लाखो लोकांमध्ये मागे राहिल्याची, हक्कांपासून वंचित राहिल्याची भावना निर्माण झाली. ट्रम्प या स्थितीत आपले तारणहार आहेत, हे त्यांना वाटले. ही संतापाची आणि दुरावलेपणाची भाषा समजावून घेतल्याशिवाय संवाद होऊ शकणार नाही, हे वास्तव या आंदोलनकर्त्यांनी समजावून घेतले पाहिजे. या आंदोलनामुळे राजकीय ध—ुवीकरण अधिक वेगाने होईल. त्यातच ट्रम्प यांनी आत्मपरीक्षणाऐवजी उपहासाची वाट निवडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांना जोम मिळेल; पण अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मात्र तडा जाईल. अमेरिकेतील लोकशाहीसाठी हा कसोटीचा क्षण ठरत आहे.