Operation Sindoor : एअरस्ट्राईकने उजळली भारताची प्रतिमा

operation-sindoor-india-precision-airstrike
Operation Sindoor : एअरस्ट्राईकने उजळली भारताची प्रतिमाPudhari File Photo
Published on
Updated on

व्ही. के. कौर, ज्येष्ठ विश्लेषक

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि गेल्या तीन दशकांपासून भारतात दहशतवादी कारवाया करणार्‍या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने केलेला एअरस्ट्राईक हा पाकिस्तानसाठी नामुष्कीजनक ठरला आहे. दुसरीकडे या हल्ल्याने भारताची आंतरराष्ट्रीय पटलावरील प्रतिमा उजळण्यास मदत झाली आहे. या स्ट्राईकनंतर चीन व तुर्कस्तान वगळता एकाही देशाने पाकिस्तानची साथ दिलेली नाही. तसेच भारतावर टीकाही केलेली नाही. तथापि, भारतासाठी चीन व बांगला देश यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे.

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांनी परस्पर हवाई क्षेत्र बंद करणे, तसेच सिंधू जल करार निलंबित करणे यांसारखी तीव्र पावले उचलली होती. यामुळे आधीच दक्षिण आशियाई प्रदेशात अस्थिरता निर्माण झाली होती. पण ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणून ओळखल्या गेलेल्या पाकिस्तानातील भारतीय हवाई हल्ल्यांमुळे भारताची उभरती जागतिक शक्ती म्हणून प्रतिमा अधिक बळकट होणार आहे. आताची हवाई कारवाई मुरिदके आणि बहावलपूर येथील लक्ष्यांवर स्टँड ऑफ शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पाकिस्तानने या कारवाईला ‘युद्धाची उघड घोषणा’ असे संबोधले असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय शक्तींना प्रतिक्रिया देणे भाग पडू शकते. अमेरिका भारताचा सामरिक भागीदार आहे. अमेरिका क्वाड आणि इंडो पॅसिफिक धोरणात भारताला एक महत्त्वाचा भागीदार मानतो. त्यामुळे भारताची कारवाई दहशतवादाच्या विरोधातील कृती म्हणून अमेरिका पाठिंबा देऊ शकतो. दुसरीकडे, चीन पाकिस्तानचा पारंपरिक सहकारी आणि सीपेक प्रकल्पात गुंतवणूकदार आहे. त्यामुळे चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहील यात शंका नाही. पण चीनने अतिहस्तक्षेप केल्यास भारत-चीन तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत या घटनेमुळे तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे. भारत ही कारवाई आत्मरक्षण म्हणून सादर करेल; तर पाकिस्तान याला आक्रमकतेचा भंग म्हणत भारताविरोधात कारवाईची मागणी करू शकतो. आर्थिकदृष्ट्या या कारवाईमुळे आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर ताण येणार आहे. त्यामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीयद़ृष्ट्या अधिक एकाकी पडणार आहे. यामुळे दक्षिण आशियातील दीर्घकालीन अस्थिरतेचा धोका संभवतो.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कूटनीतीच्या पातळीवर कठोर प्रतिसाद दिला होता. यामध्ये पाकिस्तानी विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करणे आणि सिंधू जल करार तात्पुरता निलंबित करणे यांचा समावेश होता. पाकिस्तानने ही पावले ‘युद्धासारख्या कृती’ म्हणून संबोधले आणि हवाई हल्ल्याला ‘सार्वभौमत्वाचा भंग’ मानत उत्तर देण्याचा इशारा दिला. ऐतिहासिक द़ृष्टिकोनातून पाहता 2019 मधील बालाकोट स्ट्राईकनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तरादाखल हवाई कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता 2025 मध्ये जर पाकिस्तानने लष्करी पाऊल उचलले तर परिस्थिती पूर्ण युद्धात रूपांतर होऊ शकते. तसे झाल्यास त्याचा जागतिक शांतता आणि स्थैर्यावर सखोल परिणाम होईल. याशिवाय पाकिस्तान जैश ए मोहम्मदसारख्या दहशतवादी गटांना चिथावणी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भारतात आणखी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता आहे.

युद्धाच्या शक्यतांच्या दृष्टीने जागतिक परिस्थितीचा विचार करता अमेरिकेची भूमिका महत्त्वाची राहील. अलीकडेच झालेले 31 प्रिडेटर ड्रोन विक्रीचे करार भारत-अमेरिका संबंधांच्या बळकटीचा पुरावा आहेत. तरीही अमेरिका युद्ध टाळण्यासाठी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला देईल. या स्ट्राईकमुळे अणुसंघर्षाचा धोका वाढला, तर अमेरिका संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे चीन पाकिस्तानला लष्करी आणि राजनैतिक पातळीवर पाठिंबा देऊ शकतो. रशिया हा भारताचा पारंपरिक संरक्षण भागीदार आहे. पण तरीही रशिया तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. खरे पाहता भारताला एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि अन्य संरक्षण सामग्री पुरवण्यात रशिया आघाडीवर आहे. पण रशियासाठी पाकिस्तानबरोबरचे संबंध टिकवणेही महत्त्वाचे आहे, विशेषतः ऊर्जा आणि क्षेत्रीय प्रभावाच्या द़ृष्टीने. त्यामुळे रशिया दोघांनाही संवादासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करेल. आपण हेही विसरता कामा नये की, भारत आणि चीन यांच्यातील संवाद प्रक्रिया खंडित झालेली असताना रशियाने ब्रिक्स परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन व फ्रान्स या स्थायी सदस्यांच्या परस्परविरोधी हितसंबंधांमुळे कोणताही ठोस प्रस्ताव संमत होण्याची शक्यता कमी आहे. इस्लामिक सहयोग संघटनेमध्ये पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा उचलून पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र भारताचे सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिरातीसारख्या इस्लामिक राष्ट्रांबरोबर द़ृढ संबंध असल्यामुळे पाकिस्तानचा प्रभाव मर्यादित राहील यात शंका नाही. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना म्हणजेच सार्क ही या स्ट्राईकनंतर आणखी दुर्बळ होण्याची दाट शक्यता आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा आणि सार्क देशांमार्गे प्रवासावर निर्बंध घातले होते. त्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अधिक ताणले जातील. बांगला देश, श्रीलंका आणि नेपाळ हे देश तटस्थ भूमिका घेण्याचा प्रयत्न करतील का हे पाहणे महत्त्वाचे आहे. विशेषतः बांगला देशात अलीकडील काळात चीनचा वाढत चाललेला प्रभाव भारताची काळजी वाढवणारा आहे. केंद्राने गुप्तचर यंत्रणा अणि सुरक्षा दलांना बांगला देश आणि म्यानमारच्या सीमेवर अतिदक्षता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. प्रामुख्याने बांगला देशात पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि लष्करी अधिकार्‍यांचा हस्तक्षेप वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. भारत आणि बांगला देशची सीमा ही पूर्वीपासूनच अधिक संवेदनशील राहिलेली आहे. काही दिवसांपूर्वी वक्फ कायद्यावरून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसाचार झाला आणि यामागे बेकायदा बांगला देशी नागरिक असल्याचे म्हटले गेले. तत्पूर्वी बांगला देशात अल्पसंख्याक हिंंदूवर हल्ले झाले आणि त्यानंतर सीमेवर तणाव दिसून आला. एकंदरीतच महंमद युनूस यांचा पाकिस्तानकडे अधिक कल दिसून येत असल्याने केंद्र सरकार सावध आहे अणि भारतीय यंत्रणा देखील खबरदारी घेत आहेत.

अफगाणिस्तानचा विचार करता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील धुमश्चक्री पहलगाम हल्ल्याच्या आधीपासूनच तीव्र झालेली आहे. भारताच्या एअरस्ट्राईकनंतर तालिबान पाकिस्तानी लष्करावरील हल्ले तीव्र करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची आधीच डगमगती अर्थव्यवस्था या स्ट्राईकमुळे मोठ्या संकटात सापडलेली आहे. अशा वेळी भारताने आंतरराष्ट्रीय संबंधांचा वापर करून आयएमएफकडून पाकिस्तानला मिळणार्‍या 7 अब्ज डॉलरच्या कर्जाच्या पुनरावलोकनाची मागणी करून त्यामध्ये खोडा आणण्यात यशस्वी झाला तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे पाकिस्तानला आग्नेय आशियाई देशांपर्यंतचे मार्ग वळवावे लागत आहेत. त्यामुळे त्यांच्या विमान कंपन्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. भारत-पाकिस्तान व्यापार व हवाई संपर्क थांबल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊ शकतो. या स्ट्राईकमुळे दहशतवादी गटांच्या हालचाली वाढू शकतात. त्यामुळे जागतिक दहशतवादविरोधी सहकार्यावर ताण येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अमेरिका व युरोपियन युनियन भारतासोबत भागीदारी अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करू शकतात. भारताच्या हवाई स्ट्राईकला 24 तास उलटून गेल्यानंतर जगभरातून आलेल्या प्रतिक्रियांचा अदमास घेतल्यास पाकिस्तानचा भ्रमनिरास झाला आहे हे स्पष्ट होते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पटलावर एकाकी पडला आहे याची नव्याने साक्ष या घटनेनंतर मिळाली आहे. दुसरीकडे दहशतवादाविरुद्ध ठोस कारवाई केल्यामुळे भारताची जागतिक शक्ती म्हणून प्रतिमा बळकट होण्यास मदत मिळाली आहे. दक्षिण आशियामध्ये चीनच्या विस्तारवादामुळे भयभीत झालेल्या देशांना यातून योग्य तो संदेश गेला आहे. आज पाकिस्तानचा शेअर बाजार ‘लोअर सर्किट’मुळे भयभीत झाला आहे. चहूबाजूंनी झालेली आर्थिक कोंडी पाहता पाकिस्तान युद्धाची भूमिका घेईल का याबाबत साशंकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news