बदलत्या भारताचा ‘अचूक’ तडाखा

Operation Sindoor airstrike
बदलत्या भारताचा ‘अचूक’ तडाखा file photo
Published on
Updated on
डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संरक्षण विश्लेषक

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत करण्यात आलेले एअरस्ट्राईक हे बालाकोटप्रमाणेच भारताच्या या बदललेल्या धोरणाचे दर्शन घडवणारे आहेत. हा प्रिएम्प्टिव्ह अ‍ॅटॅक असून त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यांची मान्यता आहे. त्यामुळे अत्यंत नियोजनबद्ध, अचूकतेने, अत्यंत कमी कालावधीत, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचा वापर करत आणि कायद्याच्या चौकटीत राहून भारताने पहलगाममधील हल्ल्याचा प्रतिशोध घेतला आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. विशेषतः भारताने सिंधू नदी पाणी रोखण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धाची भाषा सुरू झाली होती. सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. त्यामुळे भारताने 1971 नंतर प्रथमच देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रील होणार असल्याची घोषणा केली. या द़ृष्टीने तयारी सुरू असतानाच 6 मे रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर जबरदस्त एअरस्ट्राईक करून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीरीत्या पार पाडले आणि संपूर्ण देशाला दिलासा दिला.

‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ 25 मिनिटांच्या कालावधीत पार पडले. या काळात 7 शहरांतील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. हे यश भारतीय लष्कराच्या नियोजन, समन्वय आणि अचूकतेचा स्पष्ट पुरावा आहे. हा केवळ सैनिकी विजय नाही, तर भारताच्या धोरणात्मक, कूटनीतिक आणि तांत्रिक क्षमतेचे प्रतीक ठरणार आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देऊन करण्यात आलेला हा एअरस्ट्राईक भारतीय लष्कराचे ‘इंटिग्रेटेड ऑपरेशन’ होता. वायुदल आणि भूदल यांनी एकत्रितरीत्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पार पाडले. या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराने कुठेही सामान्य पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य केलेले नाही. तसेच पाकिस्तानच्या लष्करी अड्ड्यांवरही हल्ला झालेला नाही. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीत राहून दहशतवाद्यांना उद्देशून केलेली ही कारवाई आहे. भारताने कोणत्याही सार्वभौम राष्ट्रावर हल्ला केला नसून, दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे.

मागील काळात झालेल्या उरी किंवा बालाकोटमधील हल्ल्यांनंतर पाकिस्तानने अशा प्रकारची कारवाई झालीच नाही असा कांगावा केला होता. यावेळी मात्र पाकिस्तानने स्वतः अधिकृतरीत्या झालेल्या नुकसानीची माहिती सादर केली आहे. यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विश्वासार्हतेत भर पडली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ पहलगाममधील हल्ल्याचे प्रत्युत्तर नाही, तर दहशतवादाचा पाया हादरवणारे पाऊल आहे.

पाकिस्ताननेच ओसामा बिन लादेनसह अनेक दहशतवाद्यांना आश्रय दिला, हे जगाला माहीत आहे. त्यामुळे या कारवाईने केवळ भारतातील नव्हे, तर दहशतवादाने त्रस्त असलेल्या सर्व देशांना संदेश मिळाला आहे. तसेच भारतात हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न करणारे दहशतवादी पीओकेमध्ये लपलेले असोत वा पाकिस्तानात, भारतीय सैन्य तुम्हाला शोधून काढेल आणि निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत असणार्‍यांना शिक्षा नक्की मिळेल, हा संदेश या कारवाईने दहशतवाद्यांना व त्यांच्या म्होरक्यांना दिला गेला आहे.

यावेळी भारताने थेट पाकिस्तानच्या अंतर्गत भागांतील दहशतवादी तळांवर हल्ले केले. पंजाबमधील बहावलपूर आणि एलओसीपासून 30 कि.मी. आत असलेल्या मुरीदका येथील दहशतवादी तळ नष्ट केले. बहावलपूरमध्ये लष्करे तैयबाच्या सर्वात मोठ्या मदरशांना आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. याच ठिकाणी आयसिस, अल कायदा, तालिबान यासारख्या संघटनांसाठीही दहशतवाद्यांची भरती केली जात होती. तथापि, ही कारवाई करताना भारतीय लढाऊ विमाने एलओसी पार न करता शत्रूंवर अचूक मारा करण्यात यशस्वी ठरली. यावरून भारताची क्षेपणास्त्र क्षमता, तोफगोळ्यांची अचूकता, वायुदलाची सज्जता आणि लष्करी तंत्रज्ञान किती अत्याधुनिक आणि भेदक आहे, हे स्पष्ट झाले.

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत झालेला हा हल्ला ‘प्रिएम्प्टिव्ह अ‍ॅटॅक’ आहे. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ देखील मान्यता देतो. एखाद्या शत्रूकडून धोका असल्याचे ठोस पुरावे असतील, तर त्याच्या कारवाईपूर्वीच उपाययोजना करणे हे आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत मान्य आहे. अमेरिका, इस्रायल यासारख्या देशांनीही अशा हल्ल्यांचा आधार घेतला आहे. भारताने ही पद्धती बालाकोटमध्ये पहिल्यांदाच वापरली होती. बालाकोटातील दहशतवादी अड्ड्यांमध्ये 250 प्रशिक्षित दहशतवादी होते. त्यांनी भविष्यात भारतात येऊन हिंसाचार घडवून आणलाच असता. त्यापूर्वीच आपण त्यांना कंठस्नान घातले. आताच्या कारवाईमध्येही भारताने पाकिस्तानच्या लष्करावर किंवा नागरिकांवर हल्ला केलेला नाही. केवळ भारताविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत असणार्‍या दहशतवाद्यांना टिपले आहे. आता जर पाकिस्तानने भारतावर कोणतीही कारवाई केली, तर ती आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग ठरेल.

1998 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांचे अण्वस्रीकरण झाले. यानंतर पाकिस्तानने सातत्याने या अणस्रांचा बागुलबुवा केला. दहशतवादी हिंसाचाराला प्रत्युत्तरादाखल भारताकडून पाकिस्तानवर एखादा जरी हल्ला झाला, तरी आम्ही त्याविरोधात अण्वस्रांचा वापर करू शकतो अशा धमक्या पाकिस्तान गेली 20-25 वर्षे सातत्याने देत आला आहे. या धमक्यांमुळेच आपण आजवर असंख्य हल्ले सहन करत राहिलो; पण त्यातून पाकिस्तानची तशी मानसिकताच बनत गेली. आपण हल्ले करत राहू आणि भारत सहन करत राहील असा पाकिस्तानचा समज बनत गेला. उरी आणि बालाकोटमधील हल्ल्यांनी या मानसिकतेला भारताने छेद दिला होता.

आता भारत थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करू शकतो, हा संदेश ताज्या कारवाईने दिला आहे. अशा पलटवारांमुळे दहशतवादी कारवाया थांबतील असे नाही; पण आपण भारताविरोधात कुरघोडी केल्यास भारत गप्प बसणार नाही, हा संदेश पाकिस्तान लष्कराला आणि आयएसआयला गेला आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद, जमात उद दवा, हिज्बुल मुजाहिद्दीन आदी दहशतवादी संघटनांनाही यातून योग्य तो इशारा भारताने दिलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news