

मित्रा, मला एक सांग, पूर्वी आपण कोणतीही खरेदी करायची असेल तर सर्वप्रथम बाजारात जात असू. उदाहरणार्थ, मला शर्ट घ्यायचा असेल तर मी बाजारात जात असे, शर्टच्या दुकानात जाऊन शर्ट निवडून मला ते येतात की नाही हे पाहून मगच ते खरेदी करत असे. आता मी पाहतो की, माझा तरुण मुलगा त्याची सगळी खरेदी ऑनलाईन करत असतो. हा ऑनलाईनचा मोह कशामुळे वाढत असेल काही समजायला मार्ग नाही.
हे बघ, झालं असं की कोरोना काळामध्ये प्रत्येकाला घरबसल्या सगळे मागवायची सवय लागली. कोरोना संपला, बाजार उघडला, दुकाने खुली झाली तरीही ती सवय काही गेली नाही. लोक ऑनलाईन मागवतात, घालून पाहतात आणि नाही आवडले तर दुसर्या दिवशी परत करायची पण सोय असते. शिवाय बर्याच गोष्टींना सीओडी सुविधा पण उपलब्ध असते.
अरे, सोपे आहे. सीओडीचा लाँगफॉर्म कॅश ऑन डिलिव्हरी आहे. बरेचदा सोशल मीडिया वरून तुम्ही काही मागवत असाल आणि प्रत्यक्षात ती वेबसाईट खोटी असेल, फेक असेल तर तुम्ही भरलेले पैसे गडप होऊ शकतात. पैसे गेले आणि सामानही मिळाले नाही, अशी परिस्थिती होऊ नये म्हणून कॅश ऑन डिलिव्हरी याचा अर्थ तुमच्या घरी तो माल पोहोचल्यानंतर तुम्ही त्याचे पेमेंट करायचे आहे. या प्रकारात पैसे सुरक्षित राहतात आणि आपण ऑर्डर केलेल्या वस्तू घेऊन माणूस घरी आल्यानंतर त्याला डायरेक्ट पेमेंट करायचे असते.
हो तर. म्हणजे एखादी वस्तू तुला मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर फार सुंदर वाटली आणि तू ती मागवलीस आणि ती घरी आल्यानंतर तुझा भ्रमनिरास झाला, कारण त्या वस्तूचा दर्जा सुमार होता. अशावेळी जरी तू पैसे भरले असतील आणि तुला ती वस्तू नाही आवडली तर परत केल्याची सूचना दिल्याबरोबर लगेच दुसर्या दिवशी त्यांचा माणूस येतो आणि तुला न आवडलेली वस्तू परत घेऊन जातो. यथावकाश तुझे पैसे तुझ्या अकाऊंटला जमा होतात. मला सांग, एवढी सगळी सुविधा असताना बाजारात जाणार कोण? गर्दीत पाहणार कोण आणि खरेदी करणार तरी कशी? लोकांना आज उत्पादकाकडून थेट ग्राहकापर्यंत वस्तू येत असल्यामुळे त्यामध्ये बर्याच लोकांचे कमिशन वाचते. सबब, ती वस्तू स्वस्तात पण मिळू शकते.
मला काय म्हणायचे आहे की, जर सगळ्याच वस्तू ऑनलाईन मिळायला लागल्या तर मग दुकानांची गरजच काय, अशी परिस्थिती निर्माण होणार नाही का? अगदी तुम्हाला टीव्ही घ्यायचा असेल तरी तुम्ही तो ऑनलाईन खरेदी करू शकता. फ्रीज, वॉशिंग मशिन किंवा वाटेल ते अगदी लहान मुलांची खेळणीसुद्धा ऑनलाईन मागवता येतात.