

‘एक देश-एक निवडणूक’, ‘एक देश-एक रेशन कार्ड’, ‘एक देश-एक कर’ यानंतर आता ‘एक देश-एक वेळ’ या संकल्पनेची चर्चा जोरदार सुरू आहे. देशात सगळीकडे एकच वेळ असावी, यासाठी भारतीय प्रमाणवेळेचा वापर करणे आता बंधनकारक करण्यात येणार आहे. बँकिंग, टेलिकम्युनिकेशन, 5-जी, संरक्षण, एआय आदी नव्या टेक्नॉलॉजीसह महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेळेचे पालन निश्चित करण्याचा एक प्रयत्न म्हणून ग्राहक मंत्रालयाने हा प्रस्ताव मांडला आहे.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत. या भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेळेचा वेगवेगळा प्रमाणमान वापरण्यात येतो. सध्या भारतात अधिकृत वेळ ‘भारतीय प्रमाण वेळ’ म्हणून वापरली जाते, जी ग्रीनविचच्या प्रमाणवेळेपेक्षा (जीएमएटी) +5.30 तास पुढे आहे. मात्र, भारतात वेगवेगळ्या राज्यांतील दिवसातील सूर्योदय आणि वेळेचा प्रभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे ‘एक राष्ट्र-एक वेळ’ ही संकल्पना चर्चेत आली आहे. ब्रिटिश राजवटीदरम्यान भारतात दोन वेगवेगळ्या वेळा प्रचलित होत्या. मुंबई, कोलकाता आणि मद्रास यासाठी वेगवेगळे वेळापत्रक होते. स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने ‘भारतीय प्रमाण वेळ’ निश्चित केली, जी अलाहाबादजवळील नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमध्ये नियंत्रित केली जाते.
‘एक राष्ट्र-एक वेळ’ म्हणजे संपूर्ण भारतात एकच प्रमाणवेळ लागू करणे. सध्या ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये सूर्य उगवण्याची आणि मावळण्याची वेळ इतर भागांपेक्षा लवकर असते. त्यामुळे तिथे लोक वेगळ्या वेळेचे पालन करण्याचा आग्रह धरतात. हे लक्षात घेता आता भारतात संपूर्ण देशात एकच आणि अचूक वेळ लागू करण्यासाठी जीपीएसऐवजी स्वत:चे नाविक यंत्रणेचा वापर करण्याची तयारी सध्या प्रगतिपथावर आहे. या माध्यमातून प्रादेशिक केंद्रात बसविलेल्या अणू घड्याळांमध्ये ‘एक राष्ट्र-एक वेळ’ निश्चित करणे, परकी प्रणालीवरचे अवलंबित्व कमी करणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला चालना देणे हे उद्दिष्ट आहे. अणू घड्याळ मायक्रो सेकंदांपर्यंत वेळ मोजण्यात सक्षम आहेत. ही घड्याळे अणूच्या कंपनांचा वापर करतात. देशात अहमदाबाद आणि फरिदाबाद येथे अणू घड्याळे बसविली असून ती अचूक वेळ सांगण्याचे काम करतात.
देशातील कामकाज हे भारतीय प्रमाणवेळेनुसार (आयएसटी) चालत असले, तरी सध्या देशातील अचूक वेळ ही जीपीएस उपग्रहाच्या मदतीने निश्चित करण्यात येते. यात मिलिसेकंदांचा फरक असतो. ही वेळ को-ऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईमला (यूटीसी) जोडलेली आहे. आयएसटी 5.30 तास ऑफसेटसह यूटीसीवर आधारित आहे; पण पुढील काही महिन्यांत यात बदल होऊन एनपीएल लवकरच संदर्भ वेळ प्रदान करण्यासाठी नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशन (नाविक) प्रणालीला जोडण्यात येणार आहे.
फरिदाबाद येथील ‘एनपीएल’ला म्हणजेच राष्ट्रीय भौतिक शाळेला ‘नाविक’ म्हणजेच नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टिलेशनकडून डेटा मिळेल आणि तो ऑप्टिक फायबर लिंकद्वारे अन्य चार केंद्रांसह सामायिक केला जाईल. अहमदाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर आणि गुवाहाटी सारख्या इतर चार केंद्रांना तो पाठवला जाईल. या ठिकाणी अणू घड्याळे बसवली जातील. अणू घड्याळांचा वापर केल्याने डिजिटल घड्याळे, स्मार्ट फोन आणि लॅपटॉपवर दाखवला जाणारा टाईम सर्व्हिस प्रोवाइडर्सच्या जीपीएस-आधारित डेटावरून नव्हे, तर अणू घड्याळांमधून मिळवला जाईल याची खात्री होईल. लवकरच ही प्रादेशिक केंद्रे सर्व वापरकर्त्यांना वेळ उपलब्ध करून देतील, ज्यामुळे ‘एक राष्ट्र-एक वेळ’ ही प्रणाली लागू होईल.