October Heatwave | ‘ऑक्टोबर हीट‌’चा तडाखा

Temperature
Temperaturefile photo
Published on: 
Updated on: 

शेतात उभ्या पिकांवर वाऱ्याची मंद झुळूक लाटांसारखी पसरावी आणि पावसाच्या निरोपानंतर निर्माण होणारी प्रसन्न शांतता जनजीवनाला सुखावून जावी, असा आश्विन महिन्यातील निसर्गाचा अलिखित नियम. परंतु यंदा ऋतूंचे हे सगळे आराखडे पार धुळीस मिळाले आहेत. मान्सूनने माघार घेताच महाराष्ट्राच्या माथ्यावर आभाळ निरभ्र झाले खरे, पण बहुतांश ठिकाणी उष्णतेच्या तीव्र झळांनी कडक उन्हाळ्यासारखे वातावरण अनुभवास येत आहे. ऋतू परिवर्तनाच्या काळात वाढलेला हा उकाडा तात्कालिक आहे की, आगामी वर्षभरात राज्याला भेडसावणाऱ्या महाभीषण पर्यावरणीय आणि जलसंकटाची वर्दी देणारा इशारा आहे, असा प्रश्न निर्माण होतो. कारण अल निनो, सुपर अल निनोच्या चर्चा. विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा जास्त वाढते, तेव्हा वातावरणीय चक्रांमध्ये निर्माण होणाऱ्या या उष्ण स्थितीला हवामानशास्त्रात ‌‘अल निनो‌’ म्हटले जाते. हा प्रवाह संपूर्ण जगाच्या वातावरणीय अभिसरणाची चक्रे विस्कळीत करतो. यंदाच्या नैर्ऋत्य मान्सूनवर सुरुवातीपासूनच अल निनोचे दाट सावट होते. प्रशांत महासागरामधील या अतिरिक्त उष्णतेमुळे वाऱ्यांची दिशा बदलून भारतीय उपखंडावर उतरणाऱ्या कोरड्या हवेचे प्रमाण वाढले आणि पावसाचे ढग खेचून आणणारी प्रणाली कमकुवत ठरली.

आता ऑक्टोबर महिन्यात हा अल निनो अधिक तीव्र होत असल्यामुळे भूपृष्ठावरील उष्णता रात्रीच्या वेळी आकाशात उत्सर्जित होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. राज्यात सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस पडला असला तरी काही भागात पर्जन्यतूट ४० टक्क्यांहून अधिक आहे. खरिपाचे बहुतांश पीक करपून गेले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांच्यासाठी तापमानाचा वाढता पारा संकट ठरत आहे. ‌‘सुपर अल निनो‌’मुळे जगभरात उष्णतेचे बळी मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे. क्लायमेट इम्पॅक्ट लॅबच्या (सीआयएल) अहवालानुसार, अल निनो जूनमध्ये सुरू झाला असून, तो पुढील वसंत ऋतूपर्यंत टिकणार आहे. हवामान बदलामुळे जे तापमान २० वर्षांनंतर अपेक्षित होते, ते अल निनोमुळे अनुभवायला मिळेल, तसेच सामान्य वर्षाच्या तुलनेत अतिउष्ण दिवसांची संख्या ४४ टक्क्यांनी वाढेल. जून २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या काळात सामान्य वर्षाच्या तुलनेत सुमारे ४.५१ लाख अधिक मृत्यू होतील, असा अंदाज या अहवालात वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे मान्सूनने नेहमीच्या तारखेच्या पाच दिवस आधीच माघार घेतली. कमी पाऊस झाल्यामुळे किमान परतीचा पाऊस तरी कसर भरून काढेल, अशी आशा होती. परंतु पदरी निराशाच पडली आहे.

नैर्ऋत्य मोसमी वारे भारतीय उपखंडातून परतीचा प्रवास सुरू करतात, तेव्हा वातावरणातील हवेचा दाब आणि वाऱ्यांची दिशा आमूलाग्र बदलते. पावसाळ्यात अरबी समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे बाष्पयुक्त आणि शीतल वारे या काळात थंडावतात आणि त्यांची जागा पूर्वेकडून अथवा ईशान्येकडून वाहणाऱ्या कोरड्या, उष्ण वाऱ्यांनी घेतली जाते. आकाशातील पावसाळी ढगांचे आच्छादन विरळ झाल्यामुळे सूर्यकिरणांना जमिनीवर पोहोचण्यापासून रोखणारा कोणताही नैसर्गिक अडथळा शिल्लक राहात नाही. थेट भूपृष्ठावर येणाऱ्या अतिलख्ख सूर्यप्रकाशामुळे जमीन वेगाने तापते. पावसाळा संपताना उरलेले बाष्प आणि वरून पडणारे हे प्रखर ऊन यांच्या संयोगातून स्थानिक पातळीवर एक प्रकारचा ‌‘हरितगृह परिणाम‌’ आकारास येतो. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जास्त आणि तापमानही उच्च अशा विचित्र परिस्थितीत वातावरणात असह्य, गुदमरवून टाकणारा उकाडा निर्माण होतो.

किनारपट्टीच्या प्रदेशात समुद्राचे सान्निध्य आर्द्रता टिकवून ठेवत असल्याने आणि पूर्वेकडचे उष्ण वारे त्यावर येऊन आदळत असल्याने हा त्रास अधिकच दुप्पट होतो. यंदा या नैसर्गिक प्रक्रियेने सर्व जुन्या नोंदी मोडीत काढण्याची भयानक स्पर्धा सुरू केली आहे. विदर्भ आणि खानदेशात तापमानाचा पारा वाढत असून अकोला, चंद्रपूर, अमरावती, मालेगाव, धुळे, सोलापूर आणि जळगाव या पट्ट्यात तापमान ३८ ते ३९ अंशांपर्यंत नोंदवले जात आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवर पारा ३६ ते ३७ अंशांच्या वर जाऊन आर्द्रतेमुळे जाणवणारे प्रत्यक्ष तापमान चाळिशीच्या पार गेल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत. मुंबईत ऑक्टोबर महिन्यातील ऐतिहासिक उच्चांक हा ३८.६ अंशांचा आहे, तर किनारपट्टीवरील रत्नागिरीत १४३ वर्षांच्या हवामान इतिहासातील सर्वाधिक ३७.५ अंशांची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली होती. यंदाचा ऑक्टोबर त्या ऐतिहासिक उच्चांकांच्या दिशेने ज्या झपाट्याने कूच करत आहे, ते पाहता हवामानाची टोकाची स्थिती किती विक्राळ रूप धारण करू शकते, याची कल्पना येते.

राज्याच्या ७५ टक्के भागावर दुष्काळाची छाया असताना ऑक्टोबर हीटचे चटके ग्रामीण लोकजीवन त्रस्त करत आहेत. उरल्यासुरल्या पिकांना ऑक्टोबरचा तळपणारा सूर्य जमिनीत ओलावा नसल्यामुळे उभे जाळून टाकत आहे. ओलच शिल्लक नसल्याने रब्बीच्या पेरण्या करायच्या कशा, हा प्रश्न आहे. ज्वारी, हरभरा आणि गव्हाचे रब्बीचे क्षेत्र यंदा निम्म्याहून अधिक प्रमाणात घटण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भागात पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाणीसाठा ऑक्टोबर महिन्यातील उष्णतेमुळे आणि दुष्काळामुळे झपाट्याने खालच्या दिशेने सरकत आहे. अल निनोचा तीव्र प्रभाव हिवाळ्यावरही जाणवणार आहे. महाराष्ट्रात नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू होणारी गुलाबी थंडी आणि डिसेंबर-जानेवारीत कडाक्याची थंडी यंदा अनुभवास येणार नाही, असे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे. हरभरा, गहू या रब्बी पिकांना दाणे भरण्यासाठी रात्रीच्या कडाक्याच्या थंडीची नितांत गरज असते. पण हिवाळ्यात उष्ण वातावरण राहिले, तर या पिकांची उत्पादकता निम्म्यावर येईल.

बेसुमार शहरीकरण, डोंगर पोखरून उभी राहिलेली सिमेंटची जंगले आणि हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे बिघडलेला पर्यावरणाचा समतोल थेट आपल्या अस्तित्वावर घाला घालत आहे. मुंबई-पुण्यामध्ये काँक्रिट आणि डांबराचे थर दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती वातावरणात सोडतात. यामुळे ‘अर्बन हीट आयलंडस्‌’ तयार होत आहेत. ग्रामीण भागात जलसंधारणाचा अभाव दुष्काळाची धार अधिक तीव्र करत आहे. राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनाने पाणीसाठ्याचे कठोर आणि पारदर्शक ऑडिट, रब्बीसाठी पर्यायी कमी पाण्याच्या पिकांचे नियोजन, जनावरांसाठी चारा छावण्यांची मुबलकता आणि दुष्काळग्रस्त मजुरांच्या हाताला काम देणारी यंत्रणा काटेकोरपणे कामाला लावावी लागेल. पाण्याअभावी वीजटंचाई निर्माण झाल्यास औद्योगिक उत्पादनालाही फटका बसू शकतो. ग्रामीण भाग दुष्काळ, पाणीटंचाई, ऑक्टोबर हीट आणि भारनियमन अशा चहूबाजूंनी कोंडीत सापडला आहे. अशा दुष्टचक्रात केंद्राने सर्वतोपरी मदतीचा हात देऊन महाराष्ट्राला दिलासा देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news