Nuclear fusion technology | न्युक्लियर फ्युजन : नव्या सूर्याचा उदय

Nuclear fusion technology |
Nuclear fusion technology | न्युक्लियर फ्युजन : नव्या सूर्याचा उदय
Published on
Updated on

तानाजी खोत

मानवी इतिहासात काही शोध असे असतात जे संपूर्ण इतिहास आणि माणसाचे भविष्यच नव्याने लिहितात. अग्नीचा शोध, चाकाचा शोध आणि वाफेचे इंजिन हे असे क्रांतिकारक शोध होते. अशाच एका क्रांतीच्या उंबरठ्यावर मानवी समाज आज उभा आहे. या क्रांतीला विज्ञानाच्या भाषेत ‘न्युक्लियर फ्युजन’ म्हटले जाते. हे केवळ एक तंत्रज्ञान नसून, पृथ्वीवर ‘छोटा सूर्य’ निर्माण करण्याचा मानवी जिद्दीचा कळसाध्याय आहे.

तार्‍यांना ऊर्जा कशी मिळते, हा प्रश्न माणसाला खूप आधीच पडला होता; पण हे कोडे 1920 मध्ये आर्थर एडिंग्टन या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम उलगडले. 1950 पासून त्यावर प्रत्यक्ष काम सुरू झाले होते; मात्र सूर्यासारखे 15 कोटी अंश सेल्सिअस तापमान पृथ्वीवर नियंत्रित करणे अशक्य वाटत होते. शास्त्रज्ञांना वाटायचे हे यश 2050 पूर्वी शक्य नाही. ‘फ्युजन ऊर्जा नेहमीच 30 वर्षे दूर असते,’ अशी एक उपरोधिक म्हणही विज्ञान वर्तुळात रूढ झाली होती.

पण, आज हे चित्र पूर्ण बदलले आहे. फ्युजन ऊर्जेचे हे स्वप्न 2030-32 मध्येच सत्यात येईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटत आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात लागलेले नवे शोध. ‘एजेंटिक एआय’मुळे मानवी मेंदूला जे अशक्य होते, ते एआयने करून दाखवले आहे. फ्युजन प्रक्रियेतील अतिउष्ण वायूला (प्लाझ्मा) मायक्रो सेकंदाच्या गतीने संतुलित ठेवण्याचे गणित एआयने सोडवले असून, एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात ‘खढएठ’ प्रकल्पातील मॅग्नेटिक फिल्डच्या निर्णायक चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. सोबतच नव्या ‘सुपरकंडक्टिंग मॅग्नेटस्’मुळे या यंत्रांचा आकारही आटोक्यात आला आहे.

आज अमेरिका, चीन आणि युरोप या शर्यतीत अब्जावधी डॉलर्स ओतत आहेत. चीनने नुकताच 10 कोटी अंश तापमान 403 सेकंदांपेक्षा जास्त काळ टिकवण्याचा जागतिक विक्रम केला आहे, तर भारत ‘आयटीईआर’ प्रकल्पाद्वारे यात मोलाची भूमिका बजावत आहे. ‘आंतरराष्ट्रीय औष्णिक-केंद्रकीय प्रायोगिक भट्टी’ (खढएठ) हा जगातील 35 देशांनी एकत्र येऊन फ्रान्समध्ये उभारलेला सर्वात मोठा ‘फ्युजन ऊर्जा’ प्रकल्प आहे. अलीकडे या प्रकल्पात ‘एजेंटिक एआय’चा समावेश करण्यात आला आहे, जो रिअ‍ॅक्टरमधील अत्यंत अस्थिर अशा प्लाझ्मावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार आहे. यामुळे संशोधनाचा वेग प्रचंड वाढला आहे. या प्रकल्पात भारत हा एक प्रमुख भागीदार असून, भारताने या रिअ‍ॅक्टरचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेला ‘क्रायोस्टॅट’ (जगातील सर्वात मोठे व्हॅक्यूम वेसल आणि रेफ्रिजरेटर) यशस्वीरीत्या बनवून दिला आहे.

हा प्रयोग अंतिम टप्प्यात असून या यशामुळे तेलावर आधारित जागतिक सत्ताकारण इतिहासजमा होऊ शकेल. अरब देशांची मक्तेदारी संपून ‘ऊर्जा सार्वभौमत्व’ येईल. शून्य प्रदूषण, स्वस्त वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची क्षमता या तंत्रज्ञानात आहे. या ऊर्जेमुळे माणूस एका अशा प्रकाशाच्या युगात प्रवेश करत आहे, जिथे ऊर्जा टंचाई उरणार नाही. सूर्याकडे ऊर्जा मागायला जाण्याऐवजी आता आपण सूर्याला आपल्या अंगणात आणले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news