वर्णविद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या विदुषीचा सन्मान

Nobel Peace Prize
वर्णविद्वेषाविरुद्ध लढणाऱ्या विदुषीचा सन्मान
Published on: 
Updated on: 

प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

यंदाच्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नवनेथेम ‌'नवी‌' पिल्ले यांचे कर्तृत्व संघर्ष, समर्पण आणि मानवसेवेच्या मूल्यांनी समृद्ध आहे. शांतता, मानवी कल्याण, मानवाधिकारांचे रक्षण, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संवर्धनासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या योगदानाची ही पावती आहे.

नवी पिल्ले यांचे संपूर्ण जीवन संघर्ष, समर्पण आणि मानवसेवा या उदात्त मूल्यांनी व्यापलेले आहे. नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा जगभरात आश्चर्य व्यक्त झाले. मूळ भारतीय वंशाच्या, तमिळ कुटुंबात जन्मलेल्या या विदुषीने संपूर्ण मानवजातीची निष्ठेने सेवा केली आहे. त्यांनी नेल्सन मंडेला यांच्या मानवाधिकार चळवळीत वकील म्हणून मोलाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या अश्वेत महिला ठरल्या.

रवांडासाठी स्थापन केलेल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधीकरणाचे त्यांनी नेतृत्व केले. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बलात्कार हा नरसंहाराचा भाग ठरू शकतो, हे प्रस्थापित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. २००८ ते २०१४ या कालावधीत त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून काम पाहिले. त्यांच्या या कार्यामुळे नोबेल पुरस्कारासाठी त्यांची पात्रता अधिक ठळक झाली. आंतरराष्ट्रीय कायदा, मानवाधिकारांचे रक्षण, युद्धगुन्हे आणि नरसंहाराविरुद्ध त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. वर्णविद्वेष आणि रंगभेदाविरुद्ध बुलंद आवाज उठविणाऱ्या नवी पिल्ले यांचे कार्य इतिहासात अजरामर झाले. देशोदेशींच्या सीमा ओलांडून त्यांनी बजावलेली कामगिरी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी आहे.

एकोणिसाव्या शतकात पिल्ले यांच्या भारतीय तमिळ पूर्वजांनी ऊसतोड कामगार म्हणून दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर केले होते. डर्बन येथील युनिव्हर्सिटी ऑफ नातालमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीसाठी आवश्यक मूल्ये आत्मसात केली. ‘नवी‌’ या नावाशी शुभत्वाचा अर्थ जोडला जातो. सेवाभावी वृत्ती जोपासताना शील, चारित्र्य आणि सन्मान ही मूल्ये त्यांनी जपली. उच्च शिक्षणाची सातत्यपूर्ण वाटचाल आणि मानवाधिकार चळवळीतील सक्रिय सहभाग या दोन महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचे जीवनकार्य आधारलेले आहे. आई-वडिलांकडून मिळालेला कष्टाचा वारसा नवी पिल्ले यांनी कायद्याच्या क्षेत्रात पुढे नेला. नोबेल पुरस्कार मिळाल्यामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या; मात्र त्यांच्या कर्तृत्वाचा खरा ठसा विधी आणि न्याय क्षेत्रात उमटलेला आहे. विधी शिक्षण हे तत्त्व आणि व्यवहार यांच्या सुंदर समन्वयावर आधारलेले असते. हा समन्वय साधणारी व्यक्तीच या क्षेत्रात समर्थपणे वाटचाल करू शकते. याची जाणीव ठेवून नवी पिल्ले यांनी कायद्याच्या औपचारिक शिक्षणाबरोबरच त्याच्या व्यावहारिक उपयोगाचे ज्ञान संपादन करण्यावर सुरुवातीपासून भर दिला. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विकासात त्यांनी मोलाची भर घातली. केवळ सैद्धांतिक संशोधनापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात कायद्याचा प्रभावी उपयोग करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. त्यामुळे अनेक बाबतींत त्यांचे न्यायनिर्णय इतिहासाला नवी दिशा देणारे ठरले.

त्यांच्या तत्त्वांमध्ये निःस्वार्थ सेवा आणि समाजातील उपेक्षित व दुर्बल घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या दोन बाबींना विशेष महत्त्व दिले आहे. कायद्याच्या क्षेत्रात याचा अर्थ मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, सल्ला केंद्रे चालविणे आणि जनहित याचिकांसाठी आवश्यक सहकार्य करणे असा होतो. गरजूंच्या बाजूने न्यायालयात उभे राहणे आणि त्यांना मानवाधिकार मिळवून देण्यासाठी सदैव संघर्ष करण्यास सज्ज राहणे, ही या तत्त्वामागील भूमिका आहे. युक्तिवाद आणि कायदेशीर लढ्याच्या माध्यमातून वकील इतिहासाला कलाटणी देणारे न्यायनिर्णय घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे नवी पिल्ले यांनी सिद्ध केले आहे. वकिलांनी कायद्याकडे केवळ नियमांचे पुस्तक म्हणून न पाहता मानवतावादी सेवेचे प्रभावी माध्यम म्हणून पाहिले पाहिजे. संवेदनशीलता आणि तत्परता दाखवून कायद्याचा उपयोग मानवतावादी न्यायाच्या रक्षणासाठी केला पाहिजे, हे तत्त्वज्ञान नवी पिल्ले यांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारले.

वर्णविद्वेषाविरुद्ध त्यांनी दिलेल्या प्रखर लढ्यात त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे खरे दर्शन घडते. या लढ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे खटले लढविणे, तसेच रॉबेन बेटावर कैदेत असलेल्या नेल्सन मंडेला आणि इतर राजकीय कैद्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी संघर्ष करणे, यांचा त्यांच्या कार्यात समावेश होता. याशिवाय युद्धकाळातील लैंगिक हिंसाचार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे प्रस्थापित करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. युद्धगुन्ह्यांशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्याच्या क्षेत्रात त्यांचे हे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. २००३ ते २००८ या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणूनही काम केले. मानवाधिकारांचे रक्षण आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

लैंगिक भेदभाव आणि हिंसाचाराविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. युद्धकाळातील अत्याचार आणि नरसंहार यांचे कायदेशीर विश्लेषण करून त्यांनी नवा सैद्धांतिक दृष्टिकोन विकसित करण्यास हातभार लावला. संरचनात्मक भेदभावाचे निर्मूलन हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. वर्णविद्वेष, वंशवाद आणि उपेक्षित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी घेतलेली रोखठोक भूमिका इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. जगातील बलाढ्य सत्ता किंवा नेत्यांनी मानवाधिकारांचे उल्लंघन केल्यास त्यांनाही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या माध्यमातून जबाबदार धरले पाहिजे, असा त्यांचा ठाम दृष्टिकोन आहे. सामाजिक न्यायमूल्यांची प्रखर जाणीव हाच त्यांच्या जागतिक कार्याचा कणा आहे. वर्णविद्वेषविरोधी चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. या लोकलढ्यातील कार्यकर्त्यांचा त्यांनी हिरिरीने बचाव केला. नरसंहार आणि लैंगिक हिंसाचाराविरुद्ध त्यांनी ऐतिहासिक कामगिरी बजावली.

रवांडा न्यायाधीकरणातील त्यांचे योगदान इतिहासाला कलाटणी देणारे ठरले. १९९८ मध्ये रवांडा आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधीकरणाने बलात्कार हा नरसंहाराचा गुन्हा ठरू शकतो, असा ऐतिहासिक न्यायनिर्णय दिला. या न्यायनिर्णयात नवी पिल्ले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे जागतिक न्यायव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. संयुक्त राष्ट्राने गाझापट्टी आणि पॅलेस्टिनी भूभागातील हिंसाचाराच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती. २०२१ ते २०२५ या काळात त्यांनी या आयोगाचे नेतृत्व केले. या चौकशीच्या अहवालात त्यांनी आपली मते ठामपणे मांडली आणि संबंधित घटकांच्या जबाबदारीवर स्पष्ट भाष्य केले. म्यानमारमधील रोहिंग्या समुदायाशी संबंधित प्रकरणातही त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून भूमिका बजावली आहे.

नवी पिल्ले यांनी आपल्या संपूर्ण जीवनात वैयक्तिक हितापेक्षा सामाजिक हिताला प्राधान्य दिले. न्यायबुद्धीच्या आधारे प्रत्येक प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आफ्रिकेतील मानवी हक्कांच्या लढ्याला अधिक बळ मिळाले. नेल्सन मंडेला आणि इतर वर्णविद्वेषविरोधी कार्यकर्त्यांच्या कायदेशीर हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी योगदान दिले. संयुक्त राष्ट्रांनी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संघर्षग्रस्त परिस्थितीतील चौकशी आयोगाचे नेतृत्व किंवा तदर्थ न्यायाधीशपदाची जबाबदारी सोपवली, तेव्हा त्यांनी ती अत्यंत निष्ठेने आणि जबाबदारीने पार पाडली. आपल्या कार्यातून त्यांनी उत्तरदायित्वाची जाणीव सातत्याने सिद्ध केली. यामुळे त्यांना प्राप्त झालेला नोबेल शांतता पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा यथोचित गौरव करणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news