

नोबेलच्या शांतता पुरस्कारांची घोषणा झाली तसे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प थोडे नाराज दिसू लागले. ट्रम्प यांच्या नाराजीची चिंता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना वाटू लागली. काळजीपोटी पुतीन यांनी ट्रम्प यांची विचारपूस केली.
पुतीन : हॅलो, मिस्टर प्रेसिडेंट. तुम्ही थोडे टेन्शनमध्ये दिसता. असं वाटतंय, तुम्हाला थोडी चिंता वाटू लागली आहे.
ट्रम्प : चिंता वाटण्यासारखेच आहे. शांततेचा नोबेल पुरस्कार कोण कुठल्या नवनीतम पिल्लई यांना जाहीर झाला. माझ्या नावाचा पत्ताच नाही. माझ्या शांततेचा त्यांना फायदा झाला असेल.
पुतीन : वर्णभेदाविरोधात नेल्सन मंडेला यांना मदत केली होती यांनी.
ट्रम्प : म्हणून काय झालं.. आम्ही गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वाट पाहत होतो पुरस्काराची. मला नोबेल नाही हा तर शांततेचा अपमान आहे. माझ्याइतकी शांतता जगात कुणी आणलीय?
पुतीन : जाऊ दे की, मिस्टर ट्रम्प. सगळं आपल्या मताप्रमाणे होतंच असं नाही.
ट्रम्प : तसे नाही, आम्ही अगदी तयारी करून ठेवली होती. यंदा नोबेल आम्हालाच मिळणार म्हणून काय भाषण करायचे हेही ठरवले होते. त्यासाठी आधीच्या पुरस्कार विजेत्यांनी काय भाषणे केली, त्याचाही अभ्यास करून ठेवला होता.
पुतीन : किती युद्धे तुम्ही मिटवली होती (की पेटवली होती... मनातल्या मनात...) हे सगळ्या जगाला माहिती आहे.
ट्रम्प : तेच म्हणत होतो. जगात सर्वाधिक युद्धे मिटवणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला नाही. मला असेच वाऱ्यावर सोडले.. हे बरोबर केले नाही. जगात न्याय नाही...
पुतीन : जे झाले ते बरे नाही झाले. परंतु, नवनीतम पिल्लई यांचे वर्णभेदविरोधी कार्यही महान आहे हेही तितकेच खरे.
ट्रम्प : जसं व्हेनेझुएलात घुसून त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला उचलले तसे नोबेल समितीत घुसून तिथल्या सदस्यांना उचलू काय? मी जगाला शांत केलेय. आता नोबेल समितीला शांत करणार.
पुतीन : शांत राहा. पुढच्या वर्षी प्रयत्न करा.
ट्रम्प : पुढच्या वर्षी? मला तर रोज नोबेल मिळायला हवा!!
पुतीन : (मनातल्या मनात- होय, सर्वात शांततेत नाराज होणारा जागतिक नेता म्हणून देतील...)