

तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुमच्याकडे निश्चित अशी पार्किंग नसेल तर इथून पुढे तुम्हाला वाहन खरेदी करता येणार नाही, असे आदेश मुंबई आणि राज्यातील मोठ्या शहरांसाठी निघणार आहेत. हा नियम दुचाकीसाठी नसून चारचाकी वाहनांसाठी अस्तित्वात येणार आहे. किती बरे आपल्या देशाने प्रगती केली नाही? इतक्या प्रचंड संख्येने लोकांकडे इतके पैसे आहेत की, ते अनेक कार विकत घेऊ शकतात. या कार रस्त्यावर धावतात तेव्हा तिथेही प्रचंड गर्दी होत असते.
महाराष्ट्रात सध्या जवळपास चार कोटी वाहने आहेत आणि दरवर्षी यात 10 टक्के नव्या वाहनांची भर पडते. 2030 पर्यंत राज्यातील वाहनांची संख्या सात कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आता मोठ्या प्रमाणावर होणारी वाहनांची खरेदी थांबवणार तरी कशी? सध्या आहे ती व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. त्यात ही नवीन वाहने आणखी भर घालतील. या वाहनांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण किती होते आणि वाहतुकीचे कोंडीचे प्रमाण किती आहे याचा विचार न केलेला बरा.
शहरामध्ये लोक सर्वसाधारणतः सोसायट्यांमध्ये राहतात. पूर्वीपासून प्रत्येक फ्लॅटला एका कारची पार्किंग दिली जाते. अशात काही नवीन सोसायट्या आल्या, ज्यांनी आपल्या सदनिकाधारकांची सुधारणारी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन दोन पार्किंग दिले आहेत. एक कार असलेला माणूस निश्चितच परिस्थिती सुधारली की, दुसरी कार घेतो. दुसरी कार घेण्याचे कारण म्हणजे दरम्यानच्या काळात त्याचे दागिने खरेदी करणे, कुत्री पाळणे हे सर्व हौसेचे प्रकार संपलेले असतात. घेतली कार तरी ती ठेवायची कुठे हा एक मोठाच प्रश्न असतो. शहरांमध्ये रस्त्यालगत जी पार्किंग आहे, तेथील जागा जुन्या असंख्य गाड्यांनी ताब्यात ठेवलेल्या आहेत, असे तुमच्या लक्षात येईल. वर्षानुवर्षे धूळ खात या गाड्या तिथेच पडून असतात. कारण या सार्वजनिक जागेच्या पार्किंगमध्ये असतात आणि सदरील सद्गृहस्थाची नवी कार त्याच्या स्वतःच्या पार्किंगमध्ये असते.
एकंदरीत मुंबई, पुणे या शहरांमध्ये पार्किंग पद्धतीचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे, असे आपल्या लक्षात येईल. सध्याच्या गतिमान शासनाने शंभर दिवसांचा प्लॅन केला आहे. परिवहन विभागाला काही निश्चित असे प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले होते. या विभागाच्या प्रस्तावाप्रमाणे वाहनाची नोंदणी करताना पार्किंगची व्यवस्था आहे, असे सिद्ध करणे आवश्यक केले आहे. अगदीच नाईलाज झाला म्हणून शासनाने आधी पार्किंग दाखवा आणि मगच कार खरेदी करा, असा नियम आणला आहे. जुन्या गाड्यांना भंगारमध्ये काढण्याचेही आदेश निघत आहेत. एखादी कार पंधरा वर्षांची जुनी झाली तर तसे तिचे कार्यक्षम असे आयुष्य संपलेले असते. पण तरीही लोक तिची नव्याने नोंदणी करून एक एक वर्ष आयुष्य वाढवून घेतात. याही नियमात काही बदल होतो का हे पाहणे मनोरंजक असणार आहे. नवीन सोसायटी उभारताना खालील तीन किंवा चार मजले हे पार्किंगचे ठेवले जात आहेत आणि सदनिकांचे बांधकाम त्याच्यावर होत असते. आजूबाजूचे क्षेत्र वाढत आहे म्हणून आकाशाच्या दिशेने होत असलेली ही वाटचाल देशाची प्रगती दाखवत असेल तर देशापुढील भयाण चित्रही दाखवत आहे.
कलंदर