Nithya Raman Los Angeles mayor- केरळची लेक लॉस एंजेलिसच्या महापौर

Nithya Raman Los Angeles mayor
 Nithya Raman Los Angeles mayor
नित्या रामन
Published on: 
Updated on: 

अमेरिकेतील राजकारण आणि सत्तेच्या अवर्तुळात भारताचा आणि विशेषतः केरळचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या नित्या रामन यांच्या प्रवासाची चर्चा सध्या जगभरात होत आहे. लॉस एंजेलिस शहराच्या महापौरपदाची निवडणूक जिंकून त्यांनी एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली. त्या लॉस एंजेलिसच्या पहिल्या आशियाई-अमेरिकन आणि हिंदू महापौर बनल्या आहेत.

नित्या रामन यांचा जन्म २८ जुलै १९८१ रोजी केरळमधील त्रिशूर शहरात एका सामान्य मळ्याली कुटुंबात झाला. त्यांचे वडील केलट्रेन कंपनीत नोकरी करत होते तर आई इंडियन ओव्हरसीज बँकेत कार्यरत होती. सहा वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब उच्च शिक्षणासाठी आणि चांगल्या भविष्याच्या शोधात अमेरिकेत स्थलांतरित झाले. नित्या यांनी प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून सोशल स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर एमआयटीमधून अर्बन प्लॅनिंग विषयात मास्टर ग्रॅज्युएशन केले. बाविसाव्या वर्षी त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

नित्या रामन यांचे लग्न वली चंद्रशेखरन यांच्याशी झाले असून, ते हॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक आणि निर्माते आहेत. त्यांच्या पतीला 'मॉडर्न फॅमिली' आणि 'थर्टी रॉक' सारख्या लोकप्रिय सिटकॉम्ससाठी तब्बल पाच वेळा 'एमी' पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे. या सुखी संसारासोबतच नित्या यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजकारण आणि लोकांच्या हक्कांसाठी समर्पित केले आहे.

अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी थेट राजकारणात उडी घेतली नाही, तर तळागाळातील समस्यांवर काम करण्यास सुरुवात केली. हार्वर्डमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या काही काळ भारतात परतल्या होत्या. दिल्लीत राष्ट्रकुल खेळांपूर्वी विस्थापित होणाऱ्या अनधिकृत वस्त्यांमधील रहिवाशांच्या हक्कांसाठी त्यांनी ग्राऊंड लेव्हलवर लढा दिला. तसेच चेन्नईमध्ये 'ट्रान्सपरंट चेन्नई' नावाच्या संशोधन संस्थेची स्थापना करून कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि शहरी गरिबांच्या समस्यांवर प्रभावी डेटा मॅपिंगद्वारे प्रशासनाला जाब विचारला. अमेरिकेत परतल्यावर त्यांनी लॉस एंजेलिसमधील बेघरांच्या गंभीर समस्येवर काम करण्यासाठी 'सेला' नावाच्या संस्थेची स्थापना केली. हॉलीवूडमधील 'मी-टू' चळवळीदरम्यान त्यांनी 'टाइम्स अप एन्टरटेनमेंट'चे कार्यकारी संचालक म्हणूनही महत्त्वाची कामगिरी बजावली.

या अनुभवाच्या जोरावर त्यांनी २०२० मध्ये लॉस एंजेलिसच्या नगरपरिषद निवडणुकीत तत्कालीन प्रभावी नगरसेवकाला पराभूत केले. हा विजय अमेरिकन माध्यमांनी 'राजकीय भूकंप' म्हणून वर्णन केला होता. नगरसेविका म्हणून काम करताना त्यांनी परवडणारी घरे, बेघरांचे पुनर्वसन आणि हवामान बदलासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने काम केले. याच कर्तृत्वाची पावती म्हणून २०२४ मध्ये त्या पुन्हा नगरसेविका म्हणून निवडल्या गेल्या आणि आता महापौर पदापर्यंतचा टप्पा त्यांनी गाठला आहे.

भारतातील एका छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास जगातील सर्वात प्रभावी शहरांपैकी एका शहराचे नेतृत्व करण्यापर्यंत पोहोचणे ही केवळ नित्या यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाची नव्हे, तर भारतीय महिलांच्या दृढ इच्छाशक्तीची आणि आत्मविश्वासाची मोठी साक्ष आहे.

- मुरलीधर कुलकर्णी