

व्होटचोरी, निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा आणि लोकशाहीचा संकोच या नेहमीच्या आरोपांकडे दुर्लक्ष करत, बिहारमधील जनतेने भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच ‘एनडीए’ला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. राजकारणातील एका यशस्वी प्रयोगावर नव्याने शिक्कामोर्तब केले. जेडीयूचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात आल्या. 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला तर जेडीयूला 85, लोकजनशक्ती पक्षाच्या 19, हिंदुस्थानी अवामी मोर्चाच्या पाच आणि राष्ट्रीय लोक मोर्चाच्या चार जागा आल्या. महागठबंधनचा खुर्दा उडाला. काँग्रेस आणि आरजेडीत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीमध्ये आणि घरातही यादवी माजली. या पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्यावर कुटुंबातूनच तोफ डागली गेली. विरोधी आघाडीची ही स्थिती. नितीश कुमार यांना निवडणुकीपूर्वीच भाजपने शब्द दिला होता आणि तो पाळला गेल्यामुळे ते दहाव्यांदा मुख्यमंत्री बनले. स्वातंत्र्योत्तर काळात इतक्या वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ इतर कोणीही घेतली नसेल. महाराष्ट्रात वसंतराव नाईक दीर्घकाळ मुख्यमंत्रिपदी होते आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांनी 2001 पासून ते 2014 पर्यंत सलगपणे पद भूषवले.
ज्या ऐतिहासिक गांधी मैदानावर लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला, तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत नितीश कुमार यांनी शपथ घेतली. या सोहळ्यास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नितीश कुमार यांचे हे यश उल्लेखनीय याचसाठी की, त्यांनी राज्यात आपल्या पक्षाची वाढवलेली ताकद. भाजपसोबत युती टिकवताना त्यांनी राजकीय शहाणपण आणि चातुर्य दाखवलेच; विरोधकांचे पानिपत करण्यात त्यांचा वाटाही तितकाच महत्त्वाचा ठरला. त्यांना मुख्यमंत्रिपदावर पुन्हा संधी देत भाजपच्या नेतृत्वाने त्यांचे हे राजकीय योगदान मान्य करण्याचा मोठेपणा दाखवला. पुन्हा सत्ता आणण्याबरोबर जनाधार टिकवणे आणि नितीश कुमार यांना सोबत ठेवण्याचे आव्हान भाजपने पेलले. त्यामागे जेडीयूशी असलेली भक्कम युती होती हे नाकारता येणार नाही.
नितीश कुमार आजारी असून, त्यांना स्मृतिभंश झाला आहे, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना निवृत्त करण्यात येईल आणि त्यांचा पक्ष संपुष्टात येईल, अशा अनेक अफवा महागठबंधनच्या छावणीतून पसरवण्यात आल्या. प्रत्यक्षात महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपेल किंवा भाजप या पक्षाला खाऊन टाकेल, हा प्रचार खोटा ठरला, त्याचप्रमाणे बिहारमध्येही जेडीयू व नितीश कुमार यांच्या विरोधातील प्रचार तथ्यहीन असल्याचे स्पष्ट झाले.
आणीबाणीविरोधी लढ्यातील जयप्रकाश नारायण यांचे एक शिलेदार नितीश कुमार पन्नास वर्षांनंतरदेखील राजकारणात ‘रेलेव्हंट’ राहिले आहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य. अत्यंत मवाळ आणि सभ्य चेहर्याच्या नितीश कुमार यांना बिहारमध्ये ‘राजकारणातील अमोल पालेकर’ असे म्हटले जाते! जेपींच्या या चळवळीतील त्यांचे समाजवादी सहकारी लालूप्रसाद यादव आता थकले असून संदर्भहीनदेखील होत आहेत. लालूंची प्रतिमा चारा घोटाळा करणार्या भ्रष्ट राजकारण्याची असून त्यांच्या काळात बिहारमध्ये ‘जंगलराज’ होते. नितीश कुमार यांनी वेळोवेळी पलटी मारली होती. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला होता. तरीदेखील त्यांचे सकारात्मक राजकारण थांबलेले नव्हते. लालूंबरोबर जाण्यात आपली चूक झाली, याची मोकळेपणाने त्यांनी कबुलीही दिली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही काळ नितीश कुमार यांनी भाजपविरोधात इंडिया आघाडी बांधण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. परंतु या आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात काँग्रेसने टाळाटाळ सुरू केल्याबरोबर नितीश कुमार यांनी सफाईने आपला रस्ता बदलला. बिहारमधील ‘माफियाराज’ त्यांनी संपवले, त्याचप्रमाणे दारूबंदीचे धोरण बर्यापैकी यशस्वी केले. यामुळे महिलांना घराबाहेर आणि घरातदेखील अधिक सुरक्षित वाटू लागले.
बिहारमध्ये ग्रामपंचायतींपासून सर्व स्तरांवर महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचे क्रांतिकारी पाऊल नितीश कुमार यांनी खूप पूर्वीच टाकले होते. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवायला सुरुवात केलीच; परंतु 2018 सालीच ‘दीदी की रसोई’ योजनेअंतर्गत हजारो महिलांना सक्षम करण्यात आले. मुलींना सायकली देऊन शाळांमधील गळती कमी करण्यात आली. रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले. हे सर्व उपक्रम राबवत असताना नितीश कुमार यांना राज्यात आणि केंद्रात भाजपचे सहकार्य मिळत होते. मोदी सरकारच्या काळात तर या राज्याला मोठे आर्थिक पॅकेज देण्यात आले आणि प्रादेशिक अस्मिता जपली जाईल, याचे भानही ठेवले गेले. भाजपच्या विधिमंडळ दलाच्या बैठकीत सम्राट चौधरी यांची नेतेपदी आणि विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड झाली. विविध घटक पक्षांचे संतुलन ठेवत मंत्रिमंडळाची रचना केली जाणार, हे स्पष्टच होते. नितीश कुमार इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून, त्यांना सुरुवातीच्या काळात ‘इंजिनिअरबाबू’ म्हणून संबोधले जात असे. ‘नितीश कुमार द राईझ ऑफ बिहार’ या पुस्तकात त्यांचे वर्गमित्र असलेल्या अरुण सिन्हा यांनी ‘नितीश कुमार हे राज कपूरच्या चित्रपटांचे चाहते होते’, असा उल्लेख केला आहे. अर्थात असे असले तरी राजकारणात ते ‘अनाडी’ नाहीत! जॉर्ज फर्नांडिस आणि लालू यांच्या सावलीत राजकारणाचा श्रीगणेशा करणार्या नितीश कुमार यांनी काळाची पावले ओळखत, 1996 सालीच भाजपबरोबर युती केली. त्यावेळी जॉर्ज व नितीश यांच्या नेतृत्वाखाली ‘समता पार्टी’ होती. नितीश यांनी दलितांमध्ये ‘महादलित’ असा वर्ग बनवला आणि पुढे ईबीसी, म्हणजेच आर्थिक मागासवर्गीयांकडे लक्ष पुरवले. ते स्वतः कुर्मी जातीचे असून, आपल्या जातीची व्होटबँक नाही, याचे त्यांना आकलन आहे. म्हणूनच त्यांनी जेडीयूचा सामाजिक आधार वाढवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. मात्र विकासाच्या बाबतीत आजही बिहार अन्य राज्यांच्या तुलनेत मागास असून, येथे औद्योगिक विकास अजिबात झालेला नाही. इतर राज्यांत होणारे स्थलांतर रोखणे, हे आव्हान नव्या सरकारसमोर आहे. विरोधी पक्ष दुबळे असले म्हणून सत्ता कशीही राबवून चालणारे नाही. सध्या तरी नितीश कुमार यांचे पुनरागमन बिहारला एका नव्या दिशेला घेऊन जाईल, अशी अपेक्षा आहे.