Mumbai Konkan water transport | जल वाहतुकीचा नवा अध्याय

Konkan vartapatra
कोकण वार्तापत्रpudhari file photo
Published on
Updated on

शशी सावंत

मुंबई ते कोकण दरम्यान जलमार्गांचा नवा अध्याय उलगडत असून, वाढवण बंदर ते रेडी बंदरापर्यंत विस्तारणारी जल वाहतूक योजना राज्याच्या दळणवळण नकाशात मोठा बदल घडवू शकते.

कोकणात अगदी मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत जल वाहतुकीचे नवे मार्ग तयार होऊ लागले आहेत. वसई-विरार, कल्याण, मीरा भाईंदर आणि पालघर, डहाणूपर्यंत जल वाहतूक मार्गांचे सर्वेक्षण एका बाजूला सुरू आहे; तर दुसर्‍या बाजूला रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, मांडवा, दिघी ते जयगड, जयगड ते विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले असे जलमार्ग सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. एकूण 21 जलमार्ग सुरू करण्यासाठी विविध करारही झाले आहेत. 2500 कोटींची त्यासाठी गुंतवणूक आणण्यात येणार असून रायगड, रत्नागिरी आणि पालघर येथे जहाज बांधणी प्रकल्प सुरू करण्याचे नियोजनही राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने सुरू केले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, वसई येथील खाडी किनारा येथेही जल वाहतुकीचा पर्याय विकसित केला जात आहे. दर परवडणारे असल्याने जल वाहतुकीचा विस्तार करण्याचे सरकारचे नियोजन आहे. यासाठीच नॉर्वे येथील जल वाहतूक तज्ज्ञ कंपनी हायके यांना याबाबतचा अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी सामंजस्य करारही झाला आहे.

जल वाहतुकीसाठी कोकणात 24 टर्मिनल उभारले जातील आणि 21 जलमार्ग सुरू होतील असे राज्य सरकारनेच स्पष्ट केले आहे. तिसर्‍या, चौथ्या मुंबईचा नवा विस्तारणारा प्रदेश पाहता वाहतुकीसाठी जलद सुविधा आवश्यक आहे. मुंबई महानगर क्षेत्रात 125 कि.मी. अंतराची जल वाहतूक सध्या सुरू आहे. भविष्यातील गरज ओळखून ती 215 कि.मी.ने विस्तारली जाणार आहे. यासाठीच 21 नवे जलमार्ग आणि आधुनिक टर्मिनस एकूण 3 टप्प्यात पूर्ण केले जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत जल वाहतुकीच्या सर्व पर्यायांवर विचार करून ते मार्ग खुले केले जाणार आहेत.

मुंबई जल मेट्रोसाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्तीही झाली आहे. केरळममधील कोची शहरात हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या जल मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही नवे प्रकल्प आकार घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मीरा भाईंदर ही शहरे जलमार्गाने जोडली जातील; तर मुंबई महानगर क्षेत्रातील 21 जलमार्गांवर एकूण 200 कि.मी. जल वाहतुकीचे जाळे निर्माण केले जाणार आहे. हा जल दळणवळणाचा एक नवा टप्पा ठरणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या सध्या तीन कोटींच्या जवळ आहे. त्यामुळे दळणवळण साधने गतिमान करणे अनिवार्य आहे. म्हणूनच जल मेट्रो हा सर्वात सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे आला आहे. महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीचा वापर दळणवळणासाठी सक्षमपणे करता यावा म्हणूनच बोटीच्या निर्मितीपासून टर्मिनसच्या उभारणीपर्यंत सर्व पर्यायांवर अधिक गांभीर्याने शोध सुरू आहे.

मुंबईपासून कोकणात विस्तारणारी जल वाहतूक पर्यटनालाही हातभार लावणारी आहे. नुकतीच सुरू झालेली मुंबई-विजयदुर्ग रो रो सेवा अल्पावधीतच बंद पडली. त्याच्या कारणांचा विचार करावा लागणार आहे. नवे सुरू करताना जुन्याचा विसर पडून चालणार नाही. हा जलमार्ग अधिक महागडा असल्याने तो बंद पडला. त्यामुळे स्वस्त दारात जल वाहतूक सुरू करणे गरजेचे आहे.

पुढील तीन वर्षांत मुंबईच्या आजूबाजूला जल वाहतुकीचे नवे मार्ग सुरू होतील. मुंबई महानगर क्षेत्रात सर्वाधिक वाहतूक कोंडी पाहायला मिळते. त्यामुळे या भागात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याची पावले उचलली जात आहेत. जलमार्गाचा प्रभावी वापर केल्यास मुंबईला आणखी गती मिळेल. यासाठी स्वीडनची मदतही घेतली जात आहे. याबाबतचे एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पार पडले. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यातूनच जलमार्ग विकासाचा नवा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात जहाज बांधणी सुविधा निर्माण व्हावी यासाठी इंडिया मेरिटाईम मंडळाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळानेही सागरी क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी सामंजस्य करार केले आहेत. या सर्व प्रयत्नातून कोकणच्या जल वाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news