महामार्गांवरील टोल वसुलीचे नवे ‘तंत्र’

'जीएनएसएस' तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जाणार
 toll collection
टोल वसुलीचे नवे ‘तंत्र’
Published on
Updated on
महेश कोळी, संगणक अभियंता

महामार्गांवरील टोल आकारणीबाबत ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम अर्थात जीएनएसएस ही नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. सध्या बंगळूर-म्हैसूर आणि पानिपत-हिसार महामार्गावर याची चाचणी सुरू झाली असून त्याचे सकारात्मक परिणाम हाती पडत आहेत. कालांतराने संपूर्ण देशभरात ही पद्धत लागू होणार आहे. सध्या नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाला सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा महसूल टोलच्या माध्यमातून मिळतो आणि ही सिस्टीम लागू झाल्यानंतर हे उत्पन्न 1 लाख 40 हजार कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.

महामार्गांवर ठरावीक अंतरावर दिसणार्‍या टोल नाक्यांच्या जाळ्यातून वाहनधारकांची लवकरच सुटका होणार असल्याची चर्चा आहे. याचा अर्थ टोल वसुली बंद होणार नाहीये, तर वाहनधारकांना टोल भरावाच लागेल; पण त्यासाठी टोल नाक्यांवर थांबण्याची गरज उरणार नाही. यासाठी जीएनएसएस तंत्रज्ञान पद्धतीचा वापर केला जाणार आहे. सध्या देशातील दोन महामार्गांवर ही प्रणाली लागू केली आहे. टोल संकलनाची ही नवी व्यवस्था आहे. महामार्गावरून प्रवास करत असाल, तर गाडीचा टोल आपोआप कापून घेतला जाईल. ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) जीपीएस आधारित काम करेल. यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने नियम जारी केले आहेत. ‘जीएनएसएस’युक्त वाहनांना 20 किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहने वगळता अन्य जीपीएसयुक्त वाहन राष्ट्रीय महामार्गाचा एखादा भाग वापरत असेल, तर त्या गाडीला एका दिवसात एका दिशेने वीस किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत राहील आणि कोणताही टोल आकारला जाणार नाही. याशिवाय वाहन जेवढा लांबचा पल्ला गाठेल, तेवढ्या प्रमाणात टोल भरावा लागेल. गाडी ‘जीएनएसएस’ तंत्रज्ञानयुक्त असेल, तरच लाभ मिळणार आहे. वाहनात ऑन बोर्ड युनिट ‘ओबीयू’ किंवा ट्रॅकिंग उपकरण बसवावे लागेल. हे उपकरण चार हजार रुपयांना असून ते मालकाला स्वत:च बसवावे लागेल. सध्या या व्यवस्थेची अंमलबजावणी हायबि—ड मोड म्हणजेच कॅश, फास्टॅग अणि ऑटोमेटिक नंबर प्लेट रिकॉग्निशन-एनपीआरवर काम करेल.

जीएनएसएसमध्ये पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहांच्या समूहाचा समावेश असून ते अवकाश आणि वेळ यांचा समन्वय साधत स्थानाची माहिती देत असतात. ग्राऊंड कंट्रोल स्टेशनवरील नेटवर्क आणि रिसिव्हर हे ट्रायलेटरेशनच्या माध्यमातून ग्राऊंड पोजिझशनचे आकलन करतात. जीएनएसएस तंत्रज्ञानाचा वापर सर्व प्रकारच्या वाहनांत केला जातो. जीएनएसएस हे अवकाश स्थानक, विमान, सागरी मार्ग, रेल्वे, रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक, स्थान, नेव्हिगेशन आणि दूरसंचार, भूमी सर्वेक्षण, सक्तवसुली संचालनालय, आपत्कालीन प्रतिसाद, कृषी उत्पादन, खाण, आर्थिक व्यवहार, शास्त्रीय संशोधन आदी महत्त्वाच्या कामात भूमिका बजावते. याचा वापर कॉम्प्युटर नेटवर्क, हवाई वाहतूक, पॉवर ग्रीड आणि अन्य घटकांना नियंत्रित करण्यासाठी केला जातो.

‘जीएनएसएस’ या नव्या पद्धतीत टोल वसुलीमुळे प्रवास चांगला आणि वेगवान होण्याची शक्यता आहे, तरीही लोकांत या सिस्टीमवरून संभ—म आहे. कारण, सध्याची टोल भरणा प्रणाली फास्टॅग बंद होईल की सक्रिय राहील, यावरून स्पष्टता नाही. क्रिसिलने म्हटले, फास्टॅगला बदलले जाणार नाही; मात्र कदाचित फास्टॅगच नव्या पद्धतीसह लागू केले जाईल. सध्या अंमलात आणलेले नवे नियम कोठे लागू होतील, हेही उघड झालेले नाही. जीएनएसएस टोल असणार्‍या सिस्टीमला देशभरात लागू कण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जात आहे. काम पूर्ण होताच ही सिस्टीम सुरू होईल. प्रारंभीच्या टप्प्यात जीएनएसएस टोल सिस्टीम केवळ व्यावसायिक गाड्यांवरच लागू होईल. देशातील कोणतेही महामार्ग व एक्स्प्रेस वेवर दररोज वीस किलोमीटरपर्यंतचा प्रवास (ये-जा) करण्यासाठी टोल आकारला जाणार नाही; पण एखाद्याने 21 किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला असेल, तर पहिल्या किलोमीटरपासून टोल आकारला जाईल.

जीएनएसएस हे दोन तंत्रज्ञानावर आधारित आहे. पहिले तंत्रज्ञान वाहनांतील जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीवर आधारित आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने महामार्गावरील उपग्रहाद्वारे वाहन मालकाच्या खात्यातून थेट टोलचे पैसे कापले जातील. दुसरे तंत्रज्ञान नंबर प्लेटवर आधारित आहे. नंबर प्लेटवर टोलसाठी संगणकीकृत प्रणाली असेल आणि ती सॉफ्टवेअरच्या मदतीने टोल वसूल करण्यात मदत करेल. या तंत्रज्ञानात महामार्गावर वाहन कोणत्या पॉईंटवरून प्रवेश करेल, त्याची माहिती नोंदविली जाईल. यानंतर गाडी ज्या पॉईंटवर जाईल, तिथेही नोंदणी केली जाईल. यादरम्यान महामार्गावर वाहनाने किती किलोमीटर प्रवास केला, या आधारे गाडी मालकाच्या खात्यातून टोल काढून घेतला जाईल.

महामार्ग तज्ज्ञांच्या मते, जीएनएसएस लागू झाल्यानंतर महामार्गावर प्रवेश करणे हाच टोलचा एंट्री पॉईंट असेल. महामार्गाचा स्पर्श होताच मीटर सुरू होईल. स्थानिक लोकांना टोल गेटने वीस किलोमीटरपर्यंत जाण्याची मुभा आहे. 21 किलोमीटरपासून टोलची गणना सुरू होईल. प्रत्येक टोल नाक्यावर एक राखीव मार्ग जीएनएसएस डेडिकेटेड असेल आणि त्या गेटमधून केवळ जीएनएसएसच्या गाड्या जातील. नव्या सिस्टीमसाठी सर्व गाड्यांत जीएनएसएस ऑनबोर्ड युनिट असणे गरजेचे आहे. सध्या नवीन गाड्यांत ही सुविधा दिली जात आहे. यात तत्काळ मदतीसाठी पॅनिक बटण आहे. अन्य गाड्यांत ही सिस्टीम बसवावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news