

गणेश काळे, संगणकतज्ज्ञ
भारतीय स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘द़ृष्टी’ या उपग्रहाने भारतीय अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षमतेविषयी जागतिक पातळीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय अंतरिक्ष क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे परिवर्तन घडताना दिसत आहे. एकेकाळी केवळ सरकारी संस्थांच्या कक्षेत मानले जाणारे हे क्षेत्र आता खासगी उद्योग, नवउद्योग आणि तरुण संशोधकांसाठीही नवी दारे उघडत आहेत. भारतीय स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘द़ृष्टी’ या उपग्रहाने या बदलाला नवे परिमाण मिळवून दिले आहे. अमेरिकेतील स्टारलिंकच्या रॉकेटद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले आणि त्यानंतर भारतीय अंतरिक्ष तंत्रज्ञान क्षमतेविषयी जागतिक पातळीवर नव्याने चर्चा सुरू झाली. ‘द़ृष्टी’ ही एक मोठी वैज्ञानिक उपलब्धी आहे. भारतीय तरुण संशोधकांच्या कल्पकतेचा आणि स्वावलंबी तंत्रज्ञान क्षमतेचा महत्त्वपूर्ण पुरावा म्हणून याकडे पाहिले पाहिजे.
या उपग्रहाचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रथम पारंपरिक उपग्रह संवेदकांची कार्यपद्धती समजून घेणे आवश्यक ठरते. सामान्यतः पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणारे उपग्रह दोन प्रमुख तंत्रज्ञानांवर आधारित असतात. पहिले म्हणजे, ऑप्टिकल संवेदक आणि दुसरे म्हणजे सिंथेटिक अपार्चर रडार अर्थात एसएआर तंत्रज्ञान. ऑप्टिकल संवेदक हे साधारण कॅमेर्याप्रमाणे कार्य करतात. सूर्यप्रकाशाच्या परावर्तनाच्या आधारे ते पृथ्वीची छायाचित्रे टिपतात. त्यामुळे मिळणारी चित्रे स्पष्ट आणि मानवी डोळ्यांना सहज समजणारी असतात; मात्र या तंत्रज्ञानाची मर्यादा म्हणजे ढगाळ वातावरण, धूर किंवा अंधारात ते प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. याउलट एसएआर तंत्रज्ञान मायक्रोवेव्ह संकेतांचा वापर करते. हे संकेत ढग, धूर आणि पावसाच्या थरांमधून सहज जाऊ शकतात. त्यामुळे दिवस-रात्र आणि कोणत्याही हवामानात पृथ्वीचे निरीक्षण करणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापन, सीमावर्ती भागांवरील लक्ष, कृषी निरीक्षण आणि पर्यावरणीय बदलांचा अभ्यास यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त मानली जाते; मात्र एसएआरमधून मिळणारी चित्रे सामान्य छायाचित्रांसारखी नसतात. ती अधिक तांत्रिक स्वरूपाची असल्याने त्यांचे विश्लेषण करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असते.
‘द़ृष्टी’चे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही तंत्रज्ञानांचा एका उपग्रहात यशस्वी संगम घडवून आणला आहे. ऑप्टिकल आणि एसएआर संवेदक एकाच वेळी एकाच स्थळाचे निरीक्षण करतात. गॅलेक्सीआयने या तंत्रज्ञानाला ‘ऑप्टोएसएआर’ असे नाव दिले आहे. पूर्वी या दोन तंत्रज्ञानांतील माहिती एकत्र करण्यासाठी वेगवेगळ्या उपग्रहांकडून वेगवेगळ्या वेळेला मिळालेल्या चित्रांचा आधार घ्यावा लागत असे. त्यामुळे अनेकदा माहितीमध्ये विसंगती निर्माण होत असे. ‘द़ृष्टी’ने ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. एखाद्या वेळी ढग किंवा अंधारामुळे ऑप्टिकल संवेदक कार्य करू शकत नसल्यास एसएआर डेटाच्या आधारे ऑप्टिकलसद़ृश चित्रे तयार करण्याची क्षमता या प्रणालीत विकसित केली आहे. त्यामुळे उपग्रहातून मिळणारी माहिती अधिक सुलभ आणि व्यापक वापरासाठी उपयुक्त ठरू शकते. चेन्नईस्थित अग्निकुल कॉसमॉसने थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजिन विकसित करून लक्ष वेधले, तर हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेसने खासगी रॉकेट प्रक्षेपणाच्या दिशेने मोठी प्रगती साधली आहे. त्याचबरोबर पिक्सेल (नवी दिल्ली), ध्रुवा स्पेस (हैदराबाद) आणि बेलाट्रिक्स एयरोस्पेस (बेंगळुरू) यांसारख्या कंपन्याही उपग्रह आणि प्रणोदन तंत्रज्ञानात नवे प्रयोग करत आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे भारतात वेगाने विकसित होणारी एक मजबूत अंतराळ अर्थव्यवस्था आकार घेत आहे. ‘द़ृष्टी’चे प्रक्षेपण हे भारतीय स्टार्टअप क्षेत्राच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. मर्यादित साधनसंपत्ती असूनही कल्पकता, संशोधन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करता येतो, हे या यशाने सिद्ध केले आहे. भारतासाठी हा नव्या अंतराळयुगाचा प्रारंभ मानला जात आहे.