

आशिष शिंदे
आजकालच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणे किंवा एखाद्या अनोळखी ठिकाणी गाडी पार्क करणे म्हणजे एक मोठे टेन्शनचे काम असते. गाडी पार्क करून गेल्यावर कोणी गाडीला ओरखडा तर काढणार नाही ना किंवा ट्रॅफिकमध्ये मागून येऊन कोणी धडक तर देणार नाही ना, अशी भीती सतत सतावत असते. यावर उपाय म्हणून अनेकजण गाडीत डॅशकॅम लावतात; पण ते फक्त पुढच्या बाजूचेच रेकॉर्डिंग करतात. बाजूला किंवा मागे काय घडले, याचा थांगपत्ता लागत नाही; पण आता ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये तुमच्या गाडीच्या सुरक्षेसाठी एक भन्नाट उपाय आला आहे. जगातील पहिला 360 अंशांमध्ये फिरणारा डॅशकॅम बाजारात आला असून, तो तुमच्या गाडीचा एक स्मार्ट सुरक्षा रक्षक बनून काम करेल.
हा काही साधासुधा कॅमेरा नाही, तर कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज असा एक हायटेक डोळा आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे 360 अंशात फिरणारे लेन्स डिझाईन! यामध्ये पुढे 4-के रिझोल्यूशन आणि मागे 1080 पी रिझोल्यूशन देणारा ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामुळे गाडीच्या आजूबाजूला एकही ब्लाईंड स्पॉट राहत नाही. यात एआय मोशन डिटेक्शन 2.0 हे अत्यंत प्रगत फिचर दिले आहे. जेव्हा तुमची गाडी पार्क केलेली असते, तेव्हा गाडीच्या आजूबाजूला कोणी संशयास्पद हालचाल करत असेल, तर हा कॅमेरा आपोआप त्या व्यक्तीच्या दिशेने वळतो आणि त्याचे रेकॉर्डिंग सुरू करतो. थोडक्यात, कोणी गाडीची तोडफोड करण्याचा किंवा चोरीचा प्रयत्न केला, तर तो या कॅमेर्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटू शकणार नाही.
अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा अंधार्या पार्किंगमध्ये डॅशकॅमचे फुटेज इतके अस्पष्ट येते की, गाडीचा नंबरही वाचता येत नाही; पण या डॅशकॅममध्ये लुमी व्हिजन आणि नाईट आऊल व्हिजन हे तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे अगदी मिट्ट काळोखातही हे डिव्हाईस अत्यंत स्पष्ट आणि चमकदार व्हिडीओ रेकॉर्ड करते. यासोबतच अपघात होण्यापूर्वीचे 10 सेकंद आणि नंतरचे 20 सेकंद असा इमर्जन्सी बफर हा कॅमेरा सेव्ह करून ठेवतो, जो कधीही डिलिट होत नाही. सुरक्षिततेसाठी यात ‘अॅडास’ म्हणजेच अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम दिली आहे. जी गाडी लेनच्या बाहेर गेल्यास किंवा पुढच्या गाडीला धडकण्याची शक्यता असल्यास तुम्हाला वेळेवर अलर्ट करते. शिवाय, 4-जी इंटरनेटची जोड दिल्यास तुम्ही जगाच्या पाठीवर कुठूनही मोबाईल अॅपवर तुमच्या गाडीचे लाईव्ह लोकेशन आणि व्हिडीओ पाहू शकता. याशिवाय हा डॅशकॅम इन्स्टॉलेशनला सोपा असून, मोबाईल अॅपद्वारे सेटिंग्ज सहज नियंत्रित करता येतात तसेच क्लाऊड स्टोअरेज सपोर्टमुळे महत्त्वाचे व्हिडीओ सुरक्षित राहतात. वाहनमालकांसाठी हा एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय ठरू शकतो; कारण सुरक्षा सुविधा तंत्रज्ञान आणि सोयी यांचा उत्कृष्ट मिलाफ यात पाहायला मिळतो. त्यामुळे प्रवास अधिक निश्चिंत आणि सुरक्षित होतो. या अत्याधुनिक डॅशकॅमची किंमत 264 डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 21 ते 22 हजार रुपये इतकी आहे.