Neuro Earbuds | मन रिफ्रेश करणारे न्यूरो इयरबडस्‌!

Neuro Earbuds |
Neuro Earbuds | मन रिफ्रेश करणारे न्यूरो इयरबडस्‌!
Published on
Updated on

आशिष शिंदे

दिवसभराचा कामाचा प्रचंड रेटा, डोक्यात सतत फेर धरणारे विचारांचे मोहोळ, अपुरी झोप आणि परिणामी शरीरावर दाटून येणारा अदृश्य थकवा... आजच्या डिजिटल युगातील ही प्रत्येक माणसाची रोजची कहाणी बनली आहे. मनात साचणारा हा ताण पळवून लावण्यासाठी कोणी ध्यानधारणा करते, तर कोणी मोबाईल ॲप्सचा आधार घेते; पण शरीराची अंतर्गत मज्जासंस्था जेव्हा सतत ‘फाईट ऑर फ्लाईट’ मोडमध्ये असते, तेव्हा केवळ वरवरचे उपाय निष्फळ ठरतात. मज्जासंस्थेचा हाच अचूक ताळेबंद मांडून शरीराला आतून शांत करण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये न्यूरोसायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक अनोखा संगम स्मार्ट ‘न्यूरो इयरबडस्‌’ अवतरले आहे. आपण एरव्‍ही गाणी ऐकण्यासाठी किंवा कॉलिंगसाठी कानात जसे वायरलेस ब्लूटूथ इयरबडस्‌ अडकवतो, अगदी तशीच रचना असणारे हे छोटेशे न्यूरो इयरबडस्‌ थेट मज्जासंस्थेवर नियंत्रण मिळवून मनाला तत्काळ शांततेची अनुभूती देते.

वरवर पाहता म्युझिक इयरबडस्‌सारखे दिसणारे हे उपकरण कानात घालताच तुमचा मूड कोणत्या कारणामुळे खराब झाला आहे, तुमची चिडचिड नक्की कशामुळे होत आहे आणि शरीरावर ताणाचा कसा परिणाम होतोय, याचा क्षणार्धात छडा लावून त्यावर तत्काळ उपाय शोधून काढते. या छोट्याशा गॅजेटमध्ये सामावलेली भन्‍नाट फीचर्स तर कोणालाही थक्क करून सोडतील अशीच आहेत. या हायटेक गॅजेटचे काम केवळ गाणी ऐकवण्यापुरते मर्यादित नसून ते कानाच्या आतील अत्यंत संवेदनशील जैविक लहरींवर २४ तास करडी नजर ठेवते. आपण ऑफिसमध्ये काम करत असताना, प्रवास करताना किंवा रात्री झोपताना ताणतणाव, वेदना आणि झोपेचा दर्जा यांचा शरीरावर कसा परिणाम होत आहे, याचा मागोवा यातील सूक्ष्म सेन्सर्स अविरत घेत असतात.

यातील कृत्रिम बुद्धिमत्ता वापरकर्त्याच्या दैनंदिन सवयी आणि जीवनशैलीचा सखोल अभ्यास करते. माणसाचा मूड अचानक का बदलला, चिडचिड कशामुळे झाली किंवा रात्रीची झोप कोणत्या कारणामुळे खंडित झाली, याचे अचूक कारण शोधून हे एआय मॉडेल नेमके निदान करते.

केवळ शारीरिक स्थितीचे विश्लेषण करून हे उपकरण थांबत नाही, तर त्यावर प्रत्यक्ष उपायही करते. यासाठी यात ‘ट्रान्सक्योटेनियस ऑरिक्युलर व्हॅगस नर्व्ह स्टिम्युलेशन’ या जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. कानाच्या आतील भागातून जाणाऱ्या मज्जासंस्थेतील अतिशय महत्त्वाच्या ‘व्हॅगस नर्व्ह’ला हे इयरबडस्‌ अतिशय सूक्ष्म, सुरक्षित आणि हलक्या इलेक्ट्रॉनिक लहरी देतात. यामुळे शरीरातील ‘पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्‍टीम’ तत्काळ सक्रिय होते आणि मेंदूतील विचारांचे वादळ शांत होऊन शरीराला नैसर्गिक शांतता मिळते.

विशेष म्हणजे, यातील थेरपी प्रत्येकासाठी एकसारखी ठरलेली नसते, तर ती पूर्णपणे वापरकर्त्याच्या बदलत्या शारीरिक प्रतिसादानुसार स्वतःमध्ये बदल करते. दिवसभरातील ताणाचा स्तर किती वाढला आहे आणि शरीराचा प्रतिसाद कसा मिळतो आहे, यानुसार या लहरींची तीव्रता आणि कालावधी आपोआप बदलतो. त्यामुळे जेव्हा शरीराला खरोखर विश्रांतीची गरज असते, तेव्हाच नेमका आणि अचूक दिलासा मिळतो. हे उत्पादन सध्या तंत्रज्ञान विश्वात आले असून हे इयरबडस्‌ व्यावसायिक विक्रीसाठी लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news