

श्रीराम ग. पचिंद्रे
राष्ट्रकार्यासाठी आपली आयसीएसची सनद लाथाडणार्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती. त्यांच्या विराट अशा राष्ट्रकार्याची पायाभरणी शालेय जीवनापासूनच कशी झाली, याचा परिचय करून देणारा हा लेख...
सुभाषचंद्र बोस जात्याच बंडखोर. क्रांतिकारी विचार त्यांच्या नसानसातून प्रवाहित झाला होता. शालेय जीवनापासूनच ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. मानवजातीची सेवा करण्याची प्रेरणा त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या साहित्यातून घेतली. शाळेत असताना वैराग्य आणि क्रांतिकारी विचारांनी सुभाषबाबू भारून गेले. पुढे आयुष्यभर त्याच विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर राहिला. कोलकात्यातील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिकत असताना प्राध्यापकांशी मतभेद झाल्यामुळे सुभाषबाबूंना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. ज्या ओटेन या प्राध्यापकाशी संघर्ष होऊन सुभाषबाबूंना महाविद्यालय सोडावे लागले, तोच ओटेन पुढे त्यांचा चाहता बनला. बलाढ्य ब्रिटिशांच्या अवाढव्य साम्राज्याला दंड थोपटून आव्हान देणारे सुभाष समस्त भारतीयांना वंदनीय ठरले, ते त्यांच्या त्यागी, विरागी, निर्भय, क्रांतिकारी धगधगत्या विचार-आचारामुळे.
पुढे दोन वर्षांनी सुभाषबाबूंना स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. याच महाविद्यालयात सुभाषबाबूंना प्रादेशिक सेनेत प्रवेश घेतल्यानंतर लष्करी प्रशिक्षण मिळाले. भविष्यात आझाद हिंद सेना उभी करताना याच लष्करी प्रशिक्षणाचा त्यांना अत्यंत उपयोग झाला. सुभाषबाबूंचे वडील जानकीनाथ हे कोलकात्यातील नावाजलेले वकील. सुभाषबाबूंचे सगळ्यात मोठे भाऊ शरदचंद्र हे विलायतेला जाऊन बॅरिस्टर होऊन आले होते. तीक्ष्ण बुद्धीच्या सुभाषबाबूंनी इंग्लंडला जाऊन भारतीय प्रशासन सेवा (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस) परीक्षा उत्तीर्ण होऊन यावा, असे जानकीनाथांना वाटत होते. आयसीएस म्हणजे सर्व प्रकारच्या सुखविलासांची मोठी संधी होती. ब्रिटिशांच्या सेवेचा तो मानबिंदू मानला जात असे. पण, आयसीएस होण्याचा विचार, ब्रिटिश साम्राज्यविरोधी प्रखर विचार असणार्या सुभाषबाबूंच्या गळी उतरवणे हे महाकठीण कर्म होते. बॅरिस्टर शरदचंद्रांनी सुभाषबाबूंची समजूत घालून त्यांना इंग्लंडला जाऊन शिकण्यासाठी राजी केले. सुभाषबाबू आयसीएसच्या परीक्षेत चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एक आव्हान म्हणून दिलेली आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र त्या सेवेत सामील होण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती.
आयसीएस झाल्यानंतर ते मुंबईला आले. त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली. देशाचे सर्वमान्य नेते महात्मा गांधी यांनी तेव्हा एका वर्षात स्वराज्य ही घोषणा केली होती. 1921 हे वर्ष उजाडण्याच्या आत आपला देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होईल, ही घोषणा आकर्षक असली, तरी एक वर्षात स्वराज्य कसे मिळणार, हे सुभाषना समजले नाही. पण राष्ट्रकार्यात झोकून देण्याची इच्छा असल्याचे त्यांनी गांधीजींना सांगितले. गांधीजींनी त्यांना बंगालमधील थोर नेते बाबू चित्तरंजन दास यांची भेट घ्यायला सांगितले. चित्तरंजन दास हे देशबंधू म्हणून ओळखले जायला लागले होते. सुभाषबाबू कोलकत्याला पोहोचताच त्यांनी देशबंधूंची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. देशबंधूंचे विचार ऐकता ऐकताच सुभाषनी नकळतच त्यांचे शिष्यत्व पत्करले. त्यांनी प्राप्त केलेली आयसीएस ही पदवी आता त्यांच्या मार्गातील अडथळा ठरला होता. ज्यांनी मोठ्या अपेक्षा धरून आपल्याला इंग्लंडला पाठवले, त्या जानकीनाथांची समजूत कशी घालायची हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला होता. त्यांना आयसीएस परीक्षा देण्यासाठी ज्या शरदबाबूंनी त्यांचे मन वळवले होते, त्याच शरदबाबूंची आपल्या वडिलांचे मन वळवण्यासाठी सुभाषबाबूंनी विनवणी केली. क्रांतिकारक विचाराच्या आपल्या या जगावेगळ्या पुत्राचे मन ओळखून जानकीनाथांनी आयसीएसचा त्याग करण्याची संमती सुभाषबाबूंना दिली. सर्व सुखे हात जोडून समोर उभी असणारी असणारी आयसीएसची मानाची सनद सुभाषचंद्रांनी सहजपणे ब्रिटिशांकडे भिरकावली आणि ते राष्ट्रकार्यात सहभागी झाले.