Neha Bora | नेहा बोरा

२३ दिवसांच्या उपोषणामुळे नेहा बोरा हे नाव देशभर चर्चेत
Neha Bora |
Neha Bora | नेहा बोरा
Published on
Updated on

युवराज इंगवले

नीट पेपरफुटी आणि त्यानंतर जेन झीच्या जंतर-मंतर येथील आंदोलनामुळे अख्खा देश ढवळून निघाला. संतापाच्या ठिणगीची सुरुवात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे झाली आणि आंदोलनाला ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह अनेक तरुण विद्यार्थी प्रतिनिधींनी अभूतपूर्व यश मिळवून दिले. त्यातीलच एका नाव म्हणजे २९ वर्षीय नेहा बोरा! दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले आंदोलन आणि २३ दिवसांच्या उपोषणामुळे नेहा बोरा हे नाव देशभर चर्चेत आले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील २९ वर्षीय पीएचडी संशोधक असलेल्या नेहाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी दीर्घकाळ उपोषण केले. उपोषणानंतर तिची प्रकृती अजूनही पूर्णपणे सावरलेली नसली, तरी आपल्या विचारांवरील तिचा विश्वास कायम आहे.

उत्तराखंडमधील खटिमा येथील रहिवासी असलेली नेहा जेएनयूमध्ये ‘थिएटर अँड परफॉर्मन्स स्टडीज’ या विषयात डॉक्टरेट करत आहे. ती ऑल इंडिया स्टुडंटस्‌ असोसिएशनची (आयसा) अध्यक्ष आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मुद्द्यांवर सक्रिय भूमिका घेणारी विद्यार्थिनी नेता म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनात सोनम वांगचुक यांच्यासोबत उपोषण करणाऱ्या तीन जेएनयू संशोधक विद्यार्थ्यांमध्ये नेहाचाही समावेश होता. वांगचुक यांना आरोग्याच्या कारणास्तव रुग्णालयात हलवल्यानंतरही नेहाने उपोषण आणि आंदोलन सुरू ठेवले. तिने इतर आंदोलनकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला. २३ दिवसांच्या उपोषणानंतर तिला अशक्तपणा जाणवत असला, तरी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीचा तिचा संघर्ष आणि भूमिका कायम असल्याचे तिने स्पष्ट केले.

नेहाच्या आंदोलनाचा प्रवास अचानक सुरू झालेला नाही. दिल्ली विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत असताना रंगभूमीच्या माध्यमातून तिची सामाजिक प्रश्नांशी ओळख झाली. सामाजिक विषयांवरील नाट्यप्रयोग करताना तिला समाजातील विविध प्रश्न समजले आणि त्यातूनच तिच्या विचारविश्वाचा विस्तार झाला. विशेष म्हणजे, नेहाचे कुटुंब मात्र तिच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकांशी नेहमी सहमत नसते. तिचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. कुटुंबाची पार्श्वभूमी वेगळी असली, तरी आपल्या विचारांशी आणि विश्वासांशी मी प्रामाणिक राहिली आहे, असे नेहा सांगते.

वडिलांच्या नोकरीमुळे नेहाचे बालपण विविध शहरांमध्ये गेले; मात्र उत्तराखंडच्या डोंगराळ भागातील संस्कार आणि अनुभव तिच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असल्याचे ती सांगते. डोंगरातील महिला शांत आणि संकोची असतात, असा समज चुकीचा असून त्या खंबीर आणि संघर्षशील असतात, असेही नेहाने म्हटले आहे. नेहा बोरा हिचा संघर्ष हा केवळ एका आंदोलनापुरता मर्यादित नाही. शिक्षण व्यवस्थेतील बदल, विद्यार्थ्यांचे अधिकार आणि धोरणनिर्मिती प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग या व्यापक मुद्द्यांवर ती आपली भूमिका मांडत आहे. २३ दिवसांचे उपोषण, ठाम विचार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीचा लढा यामुळे नेहा बोरा ही आजच्या विद्यार्थी चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून समोर आली आहे. तरुणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यात तिची भूमिका निश्चितच महत्त्वाची ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news