विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर ‘मोबाईलघाव’

फोनच्या वापराचे नकारात्मक परिणाम
Negative effects of students' use of mobile phones
विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर ‘मोबाईलघाव’Pudhari File Photo
Published on
Updated on
संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

विद्यार्थ्यांच्या हाती असलेला मोबाईल हा शिकण्यासाठी आधार मिळावा म्हणून पालकांनी उपलब्ध करून दिला आहे; मात्र खरंच मोबाईलमुळे शिक्षण होते आहे का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. फोनच्या वापराचे नकारात्मक परिणाम सध्या विविध संशोधनातून आणि अहवालांतून समोर येताहेत. ते टाळण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. जगातील सरासरी चारपैकी एका शाळेने मोबाईल फोनवर बंदी घातल्याने त्याचा नकारात्मक परिणाम कमी झाल्याचे समोर आले आहे.

जागतिक स्तरावरील युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन अर्थात युनोस्कोद्वारे नुकताच शिक्षणातील तंत्रज्ञानाचा उपयोग यासंदर्भाने अहवाल प्रकाशित करण्यात आला. अहवालातील निष्कर्ष शिक्षणातील कार्यरत प्रत्येकाला चिंता करायला लावणारा आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि वाढविण्यासाठी जगभर प्रयत्न होत आहेत. देशभर शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. शाळा स्मार्ट करण्याच्या नावाखाली शिक्षण तंत्रज्ञानाद्वारे करण्यावर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके दिसण्याऐवजी मोबाईल दिसत आहेत. विद्यार्थी ग्रंथालयात नाही, तर कट्ट्यावर तासन्तास मोबाईलमध्ये गुंतून पडले आहेत. मैदानावर खेळासाठी वेळ खर्च करण्याऐवजी मोबाईलवर असलेल्या समाजमाध्यम, रील्स, आंतरजालच्या माध्यमाच्या विविध संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणावर व्यतीत केला जात आहेत. दुसरीकडे देशातील विविध सर्वेक्षणात शिक्षणाची गुणवत्ता ढासळत असल्याचे चित्र समोर येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये हिंस्रता वेगाने वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चिंतेचा विषय बनत आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा प्रश्नही डोके वर काढत आहे. मूल्य शिक्षणाची स्थिती गंभीर बनत आहे.

अभ्यासासाठी लागणार्‍या मनाच्या एकाग्रतेची वेळ कमी होते आहे. शाळा, महाविद्यालयांत बेशिस्तीचा प्रश्न गंभीर आहे. असे सारे प्रश्न शिक्षणाभोवती निर्माण होत आहेत. त्याचवेळी युनोस्कोचा हा अहवाल समाजमनाला अधिक चिंताजनक स्थितीची जाणीव करून देत आहे. अहवालात म्हटले आहे की, सध्या लहान मुलांमध्ये वाढता मोबाईलचा वापर चिंतेचा विषय बनत आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध आहेत, त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवर आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होत आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या महत्त्वाच्या प्रक्रियेलाच धक्का बसत असल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेची भविष्याची वाट कठीण बनत जाण्याचा धोका आहे. आज विद्यार्थ्यांच्या हाती असलेला मोबाईल दूर लोटला नाही, तर उद्याची सामाजिक, शैक्षणिक स्थिती गंभीर बनण्याचा धोका आहे. काही संशोधनानुसार जो विद्यार्थी मोबाईल फोनचा वापर करत होता, त्यांची शिकण्याची आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमकुवत झाल्याचे समोर आले आहे. कोरोना काळात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला होता. अहवालानुसार डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने शिक्षण आणि शिकण्याच्या प्रक्रियेत अनेक बदल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मूल्यांकन अर्थात ‘पिसा’च्या संकलित माहितीतून असे दिसून येत आहे की, अधिक प्रमाणात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अर्थात, तो परिणाम होत असल्याचे भारतातही चित्र आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाला तो परिणाम स्पष्ट दिसत आहे. अहवालानुसार 14 देशांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार, मोबाईल साधनामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. त्यांच्या शिकण्यावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. स्मार्ट फोन आणि कॉम्प्युटरचा वापर वर्गात आणि घरात शिकण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आणत असल्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र सध्या तरी आपले शिक्षण या दोन साधनांच्या भोवती केंद्रित झाले आहे. त्यामुळे भविष्यात त्याचा आणखी काय परिणाम होणार आहे, याची प्रतीक्षा करण्याऐवजी आजच योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

सॅपियन लॅब्सच्या अहवालानुसार, लहान मुलांना खूप लवकर स्मार्ट फोन दिला गेला, तर ते वयात येईपर्यंत त्यांच्या मेंदूवर मोबाईलचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. हा अहवाल 40 देशांतील 27 हजार 969 तरुणांशी बोलून तयार करण्यात आला होता. 40 देशांत भारताचाही समावेश होता. वयाच्या सहाव्या वर्षी स्वतःचा स्मार्ट फोन देण्यात आलेल्या 74 टक्के मुलींना त्यांच्या तारुण्यात मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. ज्या मुलींना 10 व्या वर्षी स्मार्ट फोन देण्यात आला, त्यापैकी 61 टक्के मुलींचे मानसिक आरोग्य वाईट होते. 15 वर्षांच्या 52 टक्के मुलींचीही काहीशी अशीच स्थिती आढळून आली. 18 व्या वर्षी ज्या मुलींना स्वत:चे स्मार्ट फोन मिळाले, त्यांच्यापैकी 46 टक्के मुलींना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या. दुसरीकडे, जेव्हा मुलांना सहाव्या वर्षी स्मार्ट फोन हाती देण्यात आले, तेव्हा त्यापैकी 42 टक्के मुलांना मानसिक समस्या आढळून आल्या होत्या, ज्यांना 10 व्या वर्षी स्मार्ट फोन देण्यात आले, त्यांच्यापैकी केवळ 43 टक्के मुलांचे मानसिक आरोग्य खालावलेले दिसून आले. ज्या मुलांना 18 व्या वर्षी फोन दिले होते, त्यांच्यापैकी 36 टक्के मुले मानसिक आरोग्याच्या समस्येने ग्रस्त होती. ज्यांना फोन उशिरा देण्यात आले त्या तरुणांमध्ये समाजात वावरण्याचा आत्मविश्वास दिसून आला. आत्महत्येचे विचार, चिडचिडेपणा, वास्तवापासून दुरावणे तसेच भास होणे या गोष्टीही त्या तरुणांमध्ये जास्त दिसून आल्या. ज्यांच्या हाती फार कमी वयातच फोन सोपवण्यात आले होते, त्यांच्यावरील परिणाम सर्वेक्षणात आले आहेत. वर्तमानात आपल्या अवतीभोवतीही असे परिणामाने ग्रस्त असल्याचे अनेकजन आढळून येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news