गरज नियंत्रणाची आणि नियोजनाची

गरज नियंत्रणाची आणि नियोजनाची
pudhari editorial
pudhari editorialpudhari editorial
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर

जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून भारताची ओळख जगाला होणे याचा विचार आव्हाने आणि संधी या दोन्ही द़ृष्टिकोनातून होण्याची गरज आहे. त्या द़ृष्टीने मोदी 3.0 सरकारला येणार्‍या पाच वर्षांच्या काळात धोरणात्मक आखणी करावी लागणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे एका बाजूला नैसर्गिक संसाधनांवर वाढणारा ताण, तर दुसरीकडे वाढत्या विषमतेमुळे हिंसाचार, गुन्हेगारी यासारखे निर्माण होणारे प्रश्न याची चिंता समाजाला आणि देशाला भेडसावणार आहे.

उपलब्ध सांख्यिकीय माहितीनुसार भारताची लोकसंख्या 141 कोटींच्या पुढे गेली आहे. भविष्यात दरवर्षी होणारी सव्वा कोटी लोकसंख्येची वाढ पाहता भारतापुढे अनेक आव्हाने आवासून उभी आहेत. या समस्येचा गुंता वैशिष्ट्यपूर्ण असून त्यामध्ये काही आव्हाने आहेत आणि सोबत काही संधीही आहेत. आव्हानांचे ढग मोठ्याने घोंगावत आहेत आणि संधींच्या चंदेरी रेखा आपल्याला खुणावत आहेत. अशावेळी या आव्हानांचा वेध घेतानाच संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर कसे करावे, हा भारतासमोरील मोठा बिकट प्रश्न आहे. वर्तमानसंदर्भात भारतापुढे नियोजनाच्या द़ृष्टीने आणि एकूणच भविष्यकालीन वाटचालीचा विचार करता आपल्या आर्थिक विकासाचा डोंगर कशा पद्धतीने उचलायचा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. भविष्यात आर्थिक विकासाचा महामेरू उचलण्याचे सामर्थ्य भारतामधील नेतृत्वामध्येे किती आहे, यावरच या प्रश्नाचे महत्त्व अवलंबून आहे.

राजीव गांधी पंतप्रधान असताना भारतातील शिक्षण विभागाचे नाव बदलून मनुष्यबळ विभाग असे नाव देण्यात आले. म्हणजेच शिक्षणाच्या पलीकडे जाऊन मनुष्याच्या क्षमतांचा विकास करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरवले गेले; पण केवळ नाव बदलले, तरी उपक्रम मात्र बदललेला नाही. आज शिक्षणात संस्थात्मक शिक्षणापेक्षा निरंतर शिक्षणाला महत्त्व आहे. त्याहीपलीकडे शालाबाह्य शिक्षणालाही महत्त्व आले आहे. या द़ृष्टीने विचार करता भारतातील अधिकाधिक लोकसंख्येला साक्षर नव्हे, तर जागरूक आणि कार्यक्षम बनवणेे आवश्यक आहे. लोकसंख्या ही भूभागावर दबाव अथवा भार नसून ते वरदान आहे, हे लक्षात ठेवून कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. प्रत्येक हाताला काम द्यावे लागेल. त्याचप्रमाणे माणसांच्या सर्वांगीण गुणांचा, व्यक्तिमत्त्वाचा स्वबळाचा, कौशल्याचा वापर निर्मितीसाठी करता आला पाहिजे. आपल्या देशात वाहनांची बांधणी करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शेती, बागकाम यासाठीही मनुष्यबळ उपलब्ध आहे. आज जगामध्ये पर्यटन, उपहारगृह, मनोरंजन उद्योगात मोठ्या मनुष्य बळाची आवश्यकता आहे. हे मनुष्यबळ भारत जगाला देत आहे. कपड्यांची निर्मिती करणारा वस्त्रोद्योग असो, रुग्णसेवा करणारा शुश्रूषा करणारा नर्सिंग उद्योग याबाबतीत भारत आघाडीवर आहे. ज्या ज्या ठिकाणी प्रगत, प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे त्याठिकाणी भारताने प्रशिक्षित मनुष्यबळ दिले आहे. त्यामुळे आपली शाळा, महाविद्यालये यांचा अधिकाधिक चांगला विकास करून मनुष्यबळाच्या विकासाच्या द़ृष्टीने आदर्श प्रयत्न करावे लागतील. कृषी क्षेत्राचा विकास झपाट्याने घटत आहे. शेतीमध्ये मनुष्यबळ कमी होत आहे. उत्पादकता कमी होत आहे. नापिकी आणि पडीक जमीन मोठ्या प्रमाणात आहे. या सर्वांचे उत्पादकतेत रूपांतर कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे. शेतावर काम करणार्‍या लोकांना प्रशिक्षण देणे, शेतीवर त्यांचे अवलंबित्व कमी करून त्यांना शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करून देणे गरजेचे आहे. तसेच छोटे आणि लघुउद्योगही सुरू करणे आवश्यक आहे. समाजाचे उद्यमीकरण केले नसल्यामुळे आज हाताला काम नाही म्हणून लोक बेरोजगारीच्या नावाने ओरड करतात. जागतिक विकास बँकेच्या अहवालानुसार कामाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देण्याची गरज आहे. स्वतच स्वतःचा रोजगार निर्माण करा आणि आपल्याला हवे ते काम स्वतःच विकसित करा, हा आजच्या काळाचा मूलमंत्र आहे. त्याआधारे रोजगारनिर्मितीच्या प्रश्नाकडे पाहावे लागेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news