

प्रत्यक्षात नवग्रह म्हणजे नऊ ग्रह असतात आणि आपल्या भारतीय पुरातन शास्त्राप्रमाणे या नवग्रहांचे चांगले-वाईट परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतात. मुला-मुलींचे लग्न ठरवताना त्यांच्या पत्रिका जुळतात का, यासाठीसुद्धा ग्रहमान महत्त्वाचे असते. कोण कोणत्या मुहूर्तावर जन्मला आहे, त्याप्रमाणे त्याचे ग्रहमान असते, असे म्हणतात.
या नऊ ग्रहांसोबत जावई या व्यक्तीला दशमग्रह म्हणजे दहावा ग्रह, असे म्हटले जाते. राजकीय क्षेत्रामध्ये आपला वारसदार म्हणून शक्यतो आपल्या मुलाला आणले जाते. तरुणपणापासून मित्र मंडळाची स्थापना करून मुलगा बापाची जागा घेण्यास सज्ज होतो. दरम्यानच्या काळात बापाने मतदारसंघात कोणीही मोठा होणार नाही, याची काळजी घेतलेली असते. ज्येष्ठ नेतृत्व थकल्यानंतर त्यांच्याच घरातील उभरते आणि तरुण नेतृत्व पुढे येते आणि राजकारणामध्ये घराणेशाहीची सत्ता वर्षानुवर्षे चालत राहते. ज्यांना मुलगा नाही आणि केवळ मुली आहेत अशा ठिकाणी काही धडाडीच्या मुली बापाचा वारसा पुढे चालवत असतात. मुली कर्तृत्वान नसतील किंवा राजकारणामध्ये येण्यास इच्छुक नसतील, तर जावयांचा शिरकाव होतो आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या दहाव्या ग्रहाचे आगमन होते.
बर्याचशा जावयांनी आपल्या सासर्यांना बाजूला सारून त्यांचे सिंहासन बळकावल्याचीही इतिहासात नोंद केली गेली आहे. उदाहरणार्थ, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा जावई चंद्राबाबू नायडू हे आपल्या सासर्याचे राजकीय वारसदार झाले आणि ते समर्थपणे आजही तो वारसा चालवत आहेत.
दरवेळी असे घडेलच, असे नाही. काही जावई नको त्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवतात आणि सासर्याची बदनामी होण्यास सुरुवात होते. दरम्यानच्या काळामध्ये सासरे बिचारे थकलेले असतात आणि जावयाचे प्रताप पाहून कपाळाला हात लावून बसलेले असतात. मुलीचा जीव जावयात म्हणजे स्वतःच्या नवर्यात आणि सासर्याचा जीव स्वतःच्या मुलीत असेल, तर साहजिकच सासर्याचा जीव जावयामध्ये असतो. सासर्याचे आणि एकंदरीत सासुरवाडीचे सुख-दुःख ठरवणारा एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणून जावई या व्यक्तीला दशमग्रह, असे म्हटले जाते.
याचा अर्थ नवग्रह तुमच्यावर प्रसन्न असतील किंवा नसतील तरी चालेल; पण हा दहावा ग्रह तुमच्यावर प्रसन्न नसेल तर मग तुमची खैर नाही. सध्याच्या काळात आपल्या राज्याच्या राजकारणात अशाच काही दशमग्रहांनी सासर्यांना अडचणीत आणले आहे. जोपर्यंत असे जावई आहेत, तोपर्यंत असे सासरेही नेहमी अडचणीत राहणार आहेत.