

साक्षरता वाढलेली असल्यामुळे प्रत्येक जण कधी ना कधी तरी शाळेमध्ये गेलेला असतोच. शाळेमध्ये विषयाचे जसे तास असतात तसे चित्रकलेचे, संगीताचे आणि खेळाचेही तास असतात. विद्यार्थी तंदुरुस्त राहावा, यासाठी खेळाचा तास असतो आणि त्यासाठी विशिष्ट अर्हताप्राप्त शिक्षकांचीही नेमणूक केलेली असते. या सर्वांचा उद्देश विद्यार्थ्याला लहानपणापासून खेळण्याची पण गोडी लागली पाहिजे असा आहे. बरेच विद्यार्थी कधी एकदा विषयाचे वर्ग संपतात आणि खेळाचा तास सुरू होतो, याची वाट पाहत असतात. खेळ करणे हा मराठीतील एक वाक्प्रचार आहे. यालाच इंग्रजीमध्ये गेम करणे असे म्हणतात.
खेळ आणि गेम हे तसे समानार्थी शब्द आहेत. एखाद्या व्यक्तीने दुसर्या एखाद्या व्यक्तीला काही त्रास दिला, तर दुसरा व्यक्ती, ‘थांब, आता बघच त्याचा कसा खेळ करतो किंवा गेम करतो’ असे म्हणत असतो. ‘काय सांगू यार वेगळाच खेळ झाला आणि पार वाट लागली’ असेही वाक्य आपण नेहमी ऐकतो. इथे ‘खेळ’ हा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे खेळात काहीही होऊ शकते. उदाहरणार्थ, क्रिकेटचा खेळ घेतला आणि शेवटच्या तीन बॉल मध्ये 15 रन पाहिजे असतील, तर बॅटिंग टीम जिंकण्याची शक्यता खूप कमी असते. एक चौकार आणि दोन षटकार मारून सामना खिशातपण घालता येतो.
असेच खेळ राजकारणामध्ये होत असतात. जंगली रमीच्या खेळामुळे नुकतीच काही खात्यांची आलटापालट झालेली आहे. मंत्री महोदयांनी विधानभवनात मोबाईलवर खेळ खेळण्याचा आरोप झाला आणि त्यांच्या राजकीय करिअरचा खेळ खंडोबा होऊन बसला. एखाद्याचे नुकसान होणे ही दुसर्या कोणासाठी लॉटरी असू शकते, हे या निमित्ताने सिद्ध झाले. मंत्रिमंडळामध्ये 70 टक्के मंत्री आपल्याला मिळालेल्या खात्यावर नाराज असतात. क्रीडा खात्याचे मंत्री असेच नाराज होते. या खेळखंडोबा प्रकरणामध्ये एका मंत्र्यांनी कृषी खाते गमावले आणि ते खाते अलगदपणे क्रीडा मंत्र्याच्या गळ्यात पडले. क्रीडामंत्र्याचे क्रीडा खाते विधानभवनात खेळ खेळणार्या मंत्र्याच्या गळ्यात पडले. अशी ही खांदेपालट झाली. एकाच वेळी कोणावर वाईट प्रसंग असेल, तर तो वाईट प्रसंग इष्टापत्ती म्हणून दुसर्यासाठी आनंदाचा प्रसंग होत असतो.
क्रीडामंत्र्यांनी हसत आणि उत्साहाने नवीन कारभार स्वीकारला आणि ज्यांचे खाते गेले आहे त्यांनी पर्याय नाही म्हणून क्रीडा खाते स्वीकारले, अशी ही राजकारणाची गंमत-जंमत असते. घडलेला प्रकार पाहून इतर मंत्री मात्र निश्चित सावध झाले असतील. विधानभवनामध्ये मोबाईल उघडायला पण त्यांना भीती वाटत असेल. आज अवघे जग मोबाईलमध्ये आल्यामुळे तुम्ही मोबाईल उघडल्याबरोबर स्क्रीनवर काय येईल ते काही सांगता येत नाही. नको ते द़ृश्य स्क्रीनवर आले आणि त्याचवेळी कुणी त्याचे व्हिडीओ शूटिंग घेतले, तर राजकीय करिअरचा खेळ खंडोबा होऊ शकतो, हा धडा आता सगळ्यांनी घेतला असेल.