

डॉ. राहुल रनाळकर
जळगाव, धुळे, मालेगाव आणि नाशिक या चार महापालिकांपैकी भाजपसमोर खरे आव्हान केवळ नाशिकमध्येच उभे ठाकले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांनी संपूर्ण राजकीय वातावरण तापवले असून नाशिक हे या रणधुमाळीचे केंद्रबिंदू ठरलेआहे. जळगाव, धुळे, मालेगाव आणि नाशिक या चार महापालिकांपैकी भाजपसमोर खरे आव्हान केवळ नाशिकमध्येच उभे ठाकले आहे. मालेगावमध्ये पारंपरिक मुस्लीम मतदारांची समीकरणे भाजपसाठी अनुकूल नाहीत. जळगावमध्ये महायुतीचा फॉर्म्युला आकाराला आल्याने भाजप तुलनेने सुरक्षित आहे, तर धुळ्यात स्वबळावर लढत असूनही भाजपला फारसे गंभीर आव्हान दिसत नाही; मात्र नाशिकमध्ये चित्र पूर्णपणे वेगळे आहे.
नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय केंद्र, औद्योगिक व शैक्षणिक शहर असल्याने येथील महापालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित राहत नाही. तिचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटतात. याच कारणामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात येथे कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. भाजपने ‘शंभर प्लस’चा नारा देत मोठ्या प्रमाणावर आयाराम-गयाराम नेत्यांना पक्षात प्रवेश दिलाय; मात्र या धोरणामुळे पक्षातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत; मात्र डॅमेज कंट्रोलचा भाजपचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकीट वाटपातील गोंधळ, एका घरात दोन तिकिटे देणे, एबी फॉर्मचे वाद यामुळे भाजपची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली आहे. सिडको आणि सातपूरसारख्या भागात उमेदवारीवरून निर्माण झालेले वाद हे भाजपसाठी डोकेदुखी ठरले आहेत. याउलट शिवसेनेने भाजपमधील नाराज घटकांना कुशलतेने सामावून घेत ताकद वाढवली आहे.
भाजपची जमेची बाजू म्हणजे, तळागाळात पसरलेले मजबूत संघटन जाळे. बूथ व्यवस्थापन आणि प्रचार यंत्रणा ही भाजपची खरी ताकद आहे. त्यामुळे काही उमेदवार अडचणीत असले, तरी संघटनेच्या जोरावर परिस्थिती सावरण्याची क्षमता भाजपकडे आहे; मात्र ही निवडणूक एकतर्फी होणार नाही. या निवडणुकीला आणखी धार येण्याचे कारण म्हणजे, भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यातील जुना सुप्त संघर्ष. पालकमंत्रिपदावरून वेळोवेळी उफाळून येणारा हा वाद आता थेट निवडणूक रणांगणात दिसून येत आहे. महायुती न होण्याची जबाबदारी भाजपवर असल्याचा आरोप दादा भुसे यांनी जाहीरपणे केला असून हा मुद्दा प्रचारात प्रभावीपणे मांडण्याची तयारी शिवसेनेची आहे.
पुण्यात जसा राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा सामना रंगतो आहे, तसाच नाशिकमध्ये भाजपविरुद्ध शिवसेना असा थेट संघर्ष उभा राहत आहे. पुढील आठ दिवसांत प्रचाराचा जोर वाढेल, आरोप-प्रत्यारोप तीव— होतील आणि राजकीय समीकरणे झपाट्याने बदलतील. अखेरीस नाशिककरांच्या मनात विश्वासाची जागा कोण निर्माण करतो, संघटन विरुद्ध असंतोष या लढतीत कोण बाजी मारतो आणि महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो, हेच या निवडणुकीचे निर्णायक सूत्र ठरणार आहे.
गिरीश महाजन हे भाजपमधील ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जातात आणि नाशिकमधील राजकीय गुंतागुंत त्यांनी वेळीच हेरल्याचे चित्र सध्या दिसून येते. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून त्यांनी नाशिकमध्ये ठाण मांडले असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकचे असलेले राजकीय, प्रशासकीय आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता तसेच आगामी कुंभमेळ्याची मोठी जबाबदारी भाजपकडे असल्याने ही महापालिका निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. ‘शंभर प्लस’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून संघटनात्मक यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाली आहे. आतापर्यंत पक्षातील अंतर्गत हेवेदावे, गटबाजी आणि सुप्त संघर्ष तात्पुरते का होईना बाजूला ठेवले गेले आहेत. महाजन यांच्या रणनीतीनुसार भाजप कोणत्याही स्थितीत नाशिक महापालिका ताब्यात घेईल, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचाच परिणाम म्हणून केडर बेस भाजप अधिक शिस्तबद्ध, सक्रिय आणि आक्रमक पद्धतीने रिंगणात उतरलेला दिसत असून, ही निवडणूक भाजपसाठी शक्तिप्रदर्शन ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.