NASA library closure: ‘नासा‌’च्या लायब्ररीला कुलूप

एकीकडे महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जोरदार उत्साहात सुरू असताना तिकडे अमेरिकेत एका महत्त्वाच्या लायबरीला कायमचे कुलूप लावले जात होते
‌NASA library closure
‌NASA library closure: ‘नासा‌’च्या लायब्ररीला कुलूप Pudhari
Published on
Updated on
अक्षय निर्मळे

एकीकडे महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जोरदार उत्साहात सुरू असताना तिकडे अमेरिकेत एका महत्त्वाच्या लायबरीला कायमचे कुलूप लावले जात होते. ‌‘नासा‌’ हे जगातील आघाडीचे अंतराळ संशोधन केंद्र. नासाची सर्वात मोठी लायबरी 2 जानेवारी 2026 पासून कायमस्वरूपी बंद करण्यात आली. गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर, मेरीलँडमध्ये स्थित ही लायबरी 56 वर्षांपासून शास्त्रज्ञ, अभियंते आणि विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य खजिना होती. पुस्तके व जर्नल्ससह अंतराळ संशोधनाच्या प्रत्येक टप्प्याचे दस्तऐवजीकरण तिथे व्हायचे. अपोलो मिशन्सपासून ते हबल, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपपर्यंत, चंद्रावर उतरण्यापासून हवामान बदलाच्या अभ्यासापर्यंत, सर्व माहिती येथे संरक्षित होती.

नासाने खर्चकपात आणि डिजिटलीकरणाच्या धोरणांतर्गत, जुने फिजिकल स्रोत कमी करण्याचा निर्णय घेतला. लायबरीतील 1 लाखाहून अधिक पुस्तके, जर्नल्स आणि तांत्रिक अहवाल अशी सर्व माहिती आता ऑनलाईन डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 60 दिवसांत येथील काही दस्तऐवज सरकारी भांडारात जतन केले जातील, तर इतर न वापरलेल्या वस्तू नष्ट केल्या जातील. 63.8 दशलक्ष डॉलरच्या देखभाल खर्चात यामुळे बचत होईल. खर्च वाचवणे महत्त्वाचे आहे; पण ज्ञानाचा दरवाजा कधीच बंद व्हायला नको.

लायबरी म्हणजे केवळ पुस्तकांचा ढीग अथवा संग््राह नसतो. लायबरी संशोधनाचा आत्मा असते. अनेक दशकांचे अनुभव, अनोखा डेटा आणि संशोधन आता दुर्लभ होऊ शकतात. भविष्यातील संशोधकांसाठी या स्रोताची अनुपस्थिती गंभीर परिणाम घडवू शकते. भविष्यातील वैज्ञानिकांसाठी ही जागा एक अदृश्य शिक्षक आणि प्रेरणास्रोत होती, आती ती इतिहासजमा झाली आहे. जगभरातील संशोधनासाठी विश्वकोश आणि वैज्ञानिक संवादाचे केंद्र असलेली ही जागा होती.

वैज्ञानिक समुदाय आणि इतिहासकार या निर्णयावर चिंतेत आहेत. ऐतिहासिक माहिती गमावण्याची भीती व्यक्त होत आहे. फिजिकल कागदपत्रांमध्ये संदर्भ शोधणे, जुन्या नोटस्‌‍ व आकडेवारी तपासणे आणि संशोधनासाठी ती प्रत्यक्ष पाहणे आता कठीण होईल. तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल संग््राहणाची सुविधा आहे; पण जुनी कागदपत्रे, मिशन्सचे अहवाल, हाताने लिहिलेल्या नोटस्‌‍- हा जास्त अनमोल ठेवा आहे, जो डिजिटल रूपात कधीही पूर्णतः प्रतिबिंबित होत नाही.

हा निर्णय फक्त एका लायबरीचा नाही, तर ज्ञानाच्या रूपांतरणाचा प्रतीकात्मक टप्पा आहे. एकीकडे विज्ञानाची झपाट्याने वाढ होतोय, दुसरीकडे ज्ञान साठवण्याची पारंपरिक माध्यमे बदलत आहेत. लायबरी फिजिकल स्वरूपात बंद झाली असली तरी तिचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य कायम राहिल. प्रश्न विचारणारे असतील तोपर्यंत अनंत आकाशाकडे घेऊन जाणारी उत्सुकता राहणार आहे. ज्ञान जतन करणे, ते सामायिक करणे आणि नव्या पिढीसाठी उपलब्ध करणे याच्यात विज्ञानाची खरी ताकद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news