Nargis Mohammadi | नर्गिस मोहम्मदी

Nargis Mohammadi
Nargis Mohammadi | नर्गिस मोहम्मदी
Published on
Updated on

इराण हे इस्लामिक राष्ट्र आहे. तेथे इतर इस्लामिक राष्ट्रांप्रमाणे महिलांवर अनेक निर्बंध आहेत. महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नाहीत. सरकारच्या धोरणाविरोधात महिलांनी आवाज उठविला, तर तो दाबून टाकला जातो. अशातच सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील राजकीय संघर्ष वाढला असताना इराणने नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी यांना साडेसात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे नर्गिस मोहम्मदी पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. इराणी सरकार आणि नर्गिस यांच्यात गेल्या अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. नर्गिस यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, या नव्या शिक्षेमुळे इराणी अधिकार्‍यांविरुद्ध सुरू असलेली त्यांची दशकांपासूनची लढाई आणखी तीव— झाली आहे.

53 वर्षीय नर्गिस या एक प्रसिद्ध इराणी मानवाधिकार कार्यकर्त्या, लेखिका आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आहेत. इराणमध्ये महिलांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात, तसेच राजकीय दडपशाहीविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. याचमुळे त्या इराणी सत्ताधार्‍यांच्या निशाण्यावर राहिल्या आहेत. त्यांनी सरकारविरोधी निदर्शने केली, देशाच्या विरोधात प्रचार केला आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवला, असा आरोप अधिकार्‍यांकडून केला जात आहे; पण नर्गिस आणि त्यांच्या समर्थकांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, शांततामय आणि अहिंसक मार्गाने केलेल्या मानवाधिकार चळवळीमुळेच त्यांना शिक्षा दिली जात आहे.

नर्गिस या पेशाने अभियंता असून, त्या एक संवेदनशील लेखिकाही आहेत. त्या मानवाधिकार रक्षक केंद्राच्या (डीएचआरसी) उपाध्यक्ष आहेत. या संस्थेची स्थापना नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या शिरीन एबादी यांनी केली होती. गेल्या दहा वर्षांपैकी बहुतांश काळ नर्गिस यांनी तुरुंगात घालवला आहे. नर्गिस फाऊंडेशनच्या माहितीनुसार, 2021 पासून त्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आरोपांखाली 13 वर्षांची शिक्षा भोगत आहेत. 2023 मध्ये इराणमध्ये महिलांवर होणार्‍या अन्यायाविरोधात लढा दिल्याबद्दल आणि सर्वांसाठी मानवाधिकार व स्वातंत्र्याचा पुरस्कार केल्याबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान केला होता. त्यावेळी नर्गिस या तेहरानमधील तुरुंगात बंद असल्यामुळे

हा पुरस्कार त्यांच्या मुलांनी स्वीकारला

होता.

12 डिसेंबर 2025 रोजी मशहद येथे मानवाधिकार वकील खोसरो अलीकोर्डी यांच्या स्मरणार्थ झालेल्या शोकसभेला उपस्थित राहिल्यामुळे नर्गिस यांना अटक केली. त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण करणे, नियमांचे उल्लंघन करणार्‍या घोषणा देणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचे आरोप ठेवले. नर्गिस यांना आतापर्यंत 13 वेळा अटक झाली असून,

5 वेळा दोषी ठरवले गेले आहे. इराणमधील मानवाधिकार परिस्थितीवर प्रकाश टाकणारा आवाज दाबण्यासाठीच त्यांच्यावर वारंवार खटले दाखल केले जात असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. नर्गिस सध्या केवळ एक व्यक्ती नसून, इराणमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, महिलांचे हक्क आणि मानवी सन्मानासाठी सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतीक बनल्या आहेत.

- युवराज इंगवले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news