

यात्रा असो अथवा कोणताही महोत्सव, बर्याचवेळा एखादी दुर्घटना घडत असते. मग विनाकारण याचा फटका अनेक निष्पाप लोकांना बसत असतो. हे वारंवार घडत असताना लोक त्यापासून काहीच धडा घेत नसल्याचे दिसून येते. कोणत्याही कार्यक्रमात हौसे, नवसे, गवसे यांच्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही वावरत असतात. अशीच एक धक्कादायक दुर्घटना फ्रान्समध्ये नुकतेच पार पडलेल्या फेते डे ला म्युझिक या वार्षिक संगीत महोत्सवात घडली आहे. त्याचे झाले असे की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांनी गर्दीचा फायदा घेत महोत्सवातील अनेक लोकांना इंजेक्शन खुपसले.. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. बर्याचवेळा सुईद्वारे होणारे हे हल्ले अचानक आणि लपूनछपून केले जात असतात.
फ्रान्सच्या या संगीत महोत्सवातील या इंजेक्शनमध्ये रोहिप्नोल अथवा जीएचबी नावाचे डेट-रेप ड्रग्ज असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, पण त्याबाबत अद्याप काही स्पष्टता झालेली नाही. विशेष म्हणजे या ड्रग्जचा वापर लोकांना बेशुद्ध करण्यासाठी अथवा नशा चढण्यासाठी केला जातो. आता फेतेडेलातील काही पीडितांना टॉक्सिकोलॉजी चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक संशयितांनी तोडफोडही केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. इंजेक्शन दिल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबतची एक पोस्ट एका महिलेने केली होती अशी चर्चा आहे, पण त्याबाबत काहीच समोर आले नसल्याचे सांगण्यात येत आहे हे विशेष! देशातील 145 लोकांनी सुई टोचल्याची तक्रार केली आहे, यामध्ये पॅरिसमधील 13 प्रकरणांचा समावेश आहे. पॅरिसमध्ये एका 15 वर्षीय मुलीला आणि 18 वर्षीय मुलासह तीन जणांनी सुई टोचल्याची तक्रार केली आहे. यापूर्वी फ्रान्समध्ये 2022 मध्येही क्लब, बार आणि संगीत सोहळ्यात सुईने हल्ला झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावेळी सरकारने लोकांना सतर्क राहण्याचा आणि सुईद्वारे ड्रग्ज दिल्याचा संशय आल्यास तत्काळ पोलिसांत तक्रार करून टॉक्सिकोलॉजी चाचणी करण्याचा सल्ला दिला होता. यंदाच्या या उत्सवात विविध आरोपांखाली 370 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये पॅरिसमधील 90 जणांचा समावेश आहे. या घटनेत 14 जण गंभीर जखमी झाले असून, एका 17 वर्षीय मुलाच्या पोटात चाकूचे वार झाल्याचे आढळून आले. इतकेच नाही तर 13 पोलिसही जखमी झाल्याचे समोर आले आहे. वारंवार होत असलेल्या संगीत इंजेक्शन अॅटॅकवरून फ्रान्स सरकार काय कारवाई करते, हे पाहणे औत्युक्याचे ठरेल.