Narayan Surve | मन्वंतराचा शब्द कोरणारा प्रतिभावंत

Narayan Surve |
Narayan Surve | मन्वंतराचा शब्द कोरणारा प्रतिभावंत
Published on: 
Updated on: 

श्रीराम ग. पचिंद्रे

आधुनिक मराठी कवितेचे जनकत्व कवी केशवसुतांना द्यावे लागते. पुढे बा. सी. मर्ढेकर हे नवकवितेचे जनक मानले जातात. पांढरपेशा वर्गाच्या कथित कवितेच्या सर्व प्रचलित संकल्पनांना छेद देत स्वतःचं ‘विद्यापीठ’ कोणतं याचा शोध घेऊन, तिथं ‘शिकून’ कामगार वर्गाची कविता मराठीत प्रथमच घेऊन येणारे थोर कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीची सांगता आज होत आहे.

अनाथ म्हणून जन्माला आलेले, एका कामगार जोडप्यानं ज्यांचा सांभाळ केला, त्या कविवर्य नारायण सुर्वे यांनी अगदी बालपणापासूनच कामगारांचं जग जवळून पाहिलं आणि अनुभवलं. त्यातूनच त्यांची कविता जन्माला आली. महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये सुर्व्यांची ‘शब्दांचे ईश्वर’ ही कविता अभ्यासाला होती. ‘कवितेऐवजी रद्दी विकली असती, तर बरे झाले असते. निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकविता आले असते’ या ओळी वाचताना थरारून जायला होत असे. नारायण सुर्वे यांच्या कवितेचं एक वेगळंच विश्व तेव्हा जाणकारांसमोर खुलं झालं होतं. कामगारांचं जग कसं असतं, हे सुर्वे यांची कविता वाचून पांढरपेशा वर्गाला पहिल्यांदा समजलं.

समाजात वावरताना, लहानथोरांसोबत बोलताना आपण एक श्रेष्ठ कवी असल्याचा कसलाही तोरा ते मिरवत नव्हते. ‘मर्ढेकरांशी एक बातचीत’ त्यांची कविता आहे, ‘... कवीचा अहंकार खूप मोठा असतो म्हणतात!’ ही त्या कवितेतील शेवटची ओळ आहे; पण कवीचा म्हणून जो अहंकार असतो, त्याचा लवलेशही त्यांच्यात नव्हता. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ (तसेच अतिसामान्य) कवी-लेखकांचा क्षुद्र अहंकार मी जवळून पाहिलेला, अनुभवलेला आहे. कामगारांच्या जीवनवेणा कवितेत प्रथमच प्रकट करणारा हा कवी ‘अनाथ’ ही जळजळीत मुद्रा कपाळावर मारून घेऊनच या जगात आला.

श्रमाशिवाय गमावण्यासारखं दुसरं काहीही नसणार्‍या म्हणूनच लढाऊ आणि श्रम विकून जगणार्‍या कामगारवर्गातून पुढे येत झोतभट्टीत शेकून निघावं तसं आयुष्य भाजून घेत नारायणाचं बालपण सरलं. कविता हा केवळ मध्यमवर्गीय जाणिवांचा प्रांत असल्याची समजूत असलेल्या समाजात कष्टकर्‍यांच्या वर्गातून नारायण सुर्वे कवी म्हणून पुढे आले. कळ्या, फुले, चंद्र, सूर्य, तारे, नद्या, झरे, वारे इत्यादी प्रतिमांच्या वेढ्यात गुरफटलेल्या कवितेला ‘भाकरीचा चंद्र’ नारायण सुर्वे यांनी दाखवला. क्रांतिकारक कामगारवर्गाशी जोडल्या गेलेल्या नारायणाची कविता ही यंत्रातून कापड निघावं, तशी जन्माला येत गेली. मुंबईच्या कामगारजगात ते समाविष्ट झाले, एकरूप झाले.

रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे

कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे...

एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे

सावध असा तुफानाची हीच सुरुवात आहे

कामगार आहे मी तळपती तलवार आहे

सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे.

असे रोखठोकपणे सांगत नव्या युगाची, कामगारांची कविता सुर्वे यांनी एखाद्या लढवय्या सैनिकासारखी उभी केली. सुर्वे हे रूढ अर्थानं ‘सारस्वत’ म्हणजे सरस्वतीचे नव्हे, तर कामगारांचे पुत्र होते. म्हणूनच स्वत:ला सरस्वतीचे पुत्र म्हणवून घेणाऱ्या लेखक, कवींना ते आव्हान देऊ शकत होते. रोकडा सवाल करू शकत होते.

‘गिरगावचं साहित्य’ आणि ‘गिरणगावचं साहित्य’ असा भेद साहित्यविश्वात निर्माण झाला. कामगारांचं विश्व हे गोरगरिबांचं आणि अडाण्यांचं विश्व आहे, अशी मध्यमवर्गीय, पांढरपेशांच्या जगाची समजूत होती; पण कामगारवर्गाचं ‘विद्यापीठ’च निराळं होतं. हे 'माझं विद्यापीठ' सुर्व्यांनी शोधलं. ‘याचसाठी माझे जग राजमुद्रा घडवीत आहे...’ असं म्हणत ते स्वतःला घडवीत गेले.

एकेकाळी कापड गिरण्या हाच प्रमुख धंदा होता. मुख्य संघटनाही गिरणी कामगारांचीच होती. कष्ट विकून जगणं, शोषणाविरुद्ध लढणं एवढंच कामगारांना माहीत होतं. राजकीय आणि आर्थिक पिळवणुकीविरुद्ध लढणारा कवितेचा नायक नारायण सुर्वे यांना या गिरणगावातच सापडला.

पिळवणुकीनं गांजलेल्या घ्या नायकाचं वर्गचरित्र भीषण होतं; मात्र तो उद्याच्या भवितव्यासाठी लढत होता. गिरणीचे मालक कामगारांना बारा-बारा तास राबवून घ्यायचे. कामगारांच्या बाजूनं कसलाही कायदा नव्हता. कामाचे तास आठ व्हावेत, यासाठी कामगार लढत होते. सगळ्या धर्म-जाती-जमातींची मिळून ‘कामगार’ ही एकच जात होती. शोषणाविरुद्ध लढणार्‍या या कामगाराची कविता नारायण सुर्वे यांनी समर्थपणे लिहिली.

विकता, विकता त्यांनी सूर्य बाजारात आणला!

घर फुंकून निघालेले लोक पाहतच राहिले

अशावेळी स्वस्त बसून कसे चालेल?

बघता, बघता त्यांनी हातही बाजारात आणला

हाताची घडी घालूनच कसे चालेल?

असे अनेक प्रश्न सुर्व्यांच्या मनात निर्माण झाले. ते स्वतःला आणि कामगारांना सूर्यकुलातील लोक समजत. याच जाणिवेतून त्यांची कविता जन्माला आलेली आहे.

‘माझ्या देशाच्या नोंदबुकात माझा अभिप्राय’ देताना

ते म्हणतात,

सूर्यकुलाचे आपण सभासद म्हणून म्हणतोय;

हे जे आकाश आहे ना -

त्याला रंगाचे चार ब्रश मारायला हवेत,

तांबडा सूर्य गोल

भिलाईच्या झोतभट्टीकडे वळवायला हवा.

चंद्र तर नारायण सुर्वे यांच्या कवितेतही येतो; पण कसा येतो?

भरल्या पोटाने अगा पाहतो जर चंद्र

आम्हीही कुणाची याद केली असती

आभाळीचा चंद्र पाहण्यासाठी पोट भरलेलं असावं लागतं, असं ते सांगतात.

सुर्वे हे तरुण वयातच कम्युनिस्ट चळवळीत ओढले गेले. वैश्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून ते जीवनाला सामोरे गेले. आधी स्वतःत अंतर्बाह्य बदल घडवून त्यांनी कवितेतून परिवर्तनाची साद घातली. मार्क्स-लेनिनवादाचा तिसरा नेत्र आपल्याला लाभला आणि या नेत्रानेच आपण समाजात वावरायला लागल्याचं ते सांगतात. कोणताही भ्रम न बाळगता वास्तवाला थेट जाऊन भिडण्याची आणि ज्याचं आकलन झालेलं आहे, त्या सर्व प्रश्नांची संगती लावण्याची सवय त्यांच्या बुद्धीला लागली. त्यातून त्यांची कविता टोकदार झाली. त्यांची कविता गझल आणि शेरोशायरीपासून बरीच दूर होती. तथापि, त्यांना उर्दू गझलांची चांगली जाण होती. शेकडो उर्दू गझला त्यांना मुखोद्‌गत‌ होत्या. बोलता-बोलता ते अनेक शेरांचे दाखले देत.

बदल मागू पाहणार्‍या निकराच्या झुंजीतील लढाऊ कार्यकर्ता म्हणून सुर्वे समाजात ठामपणे उभे राहिले. विचारांच्या ताठ कण्यानं ते लढत राहिले. समाजाला गुलामासारखं राबवणार्‍या व्यवस्थेशी त्यांनी कवितेचे शस्त्र बनवून लढा दिला.

कारखान्याशी त्यांचं एवढं अभेद्य नातं होतं की, आपल्या आरंभीच्या लेखनाला ते ‘वाड्.मयीन कारखान्यातील’ उमेदवारी मानतात. त्यांनी चळवळीला भाषेचा रंग देऊन शब्दांना चळवळीचं रूप दिलं. लेखन ही स्वतःशीच सुरू असलेली लढाई मानून ते लिहीत राहिले.

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले

हिशेब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले

असं म्हणत म्हणत नारायण सुर्वे नावाचा हा कामगारांचा कवी ‘नेहरू सोविएत लँड पुरस्कारा’सह अनेक मानाच्या पुरस्कारांचा मानकरी ठरला. मराठीला वैश्विक पातळीवर घेऊन गेला. मराठी साहित्यविश्वात ‘सुर्वेमास्तर’ अशी स्वतःची तप्त नाममुद्रा त्यांनी उमटवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news