

देशभरातून नक्षलवादाचे जलदगतीने उच्चाटन होत असून, 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपणार, असा ठाम विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन वर्षांपूर्वीच व्यक्त केला होता. नक्षलवादाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या जिल्ह्यांची संख्या कमी होऊन, आता ती फक्त तीनवर आली आहे. देशातील केवळ 11 जिल्ह्यांमध्येच नक्षलवादाचा किंचित प्रभाव उरला आहे. एकेकाळी दहा राज्यांमधील 126 जिल्हे नक्षलप्रभावित होते. गेल्या ऑक्टोबरात गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तब्बल 60 नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवली. त्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सक्रिय असलेला कुख्यात नक्षलवादी आणि नक्षल्यांच्या पॉलिट ब्यूरोचा सदस्य सोनू ऊर्फ भूपती याचाही समावेश होता. अनेक नक्षलवादी नेत्यांना घडवण्यात त्याची मोठी भूमिका होती.
भूपतीने इतर साथीदारांसह आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले. आता चळवळीची धुरा सांभाळणार्या सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या संघटनेचा सरचिटणीस थिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी तसेच संग्राम हे 16 साथीदारांसह तेलंगणा पोलिसांसमोर शरण आले. यात केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डीचाही समावेश आहे. यामुळे नक्षलवाद्यांचा कणाच मोडला गेल्याचे अधोरेखित झाले आहे. मूळचा करीमनगरचा रहिवासी असलेल्या देवजीवर महाराष्ट्र व तेलंगणासह विविध राज्यांत एकूण दहा कोटी रुपयांचे बक्षीस होते. आठ महिन्यांपूर्वीच त्याची संघटनेच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली होती. दहा महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांनी बसवराजूला चकमकीत ठार केल्यानंतर देवजीकडे संघटनेचे नेतृत्व आले होते. त्याच्या बरोबर तेलंगणाचा केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी याने 15 ते 20 सदस्यांसह आपली शस्त्रे खाली ठेवली, ही दिलासादायक बाब म्हणावी लागेल. गनिमी काव्याने धमाके घडवण्यात तरबेज असलेल्या आणि हिडमासारखे कट्टर नेते तयार करणार्या देवजीला ‘संजीव’ किंवा ‘पल्लव’ या टोपण नावांनीही ओळखले जाते. तो 62 वर्षांचा आहे.
देवजीची शरणागती महाराष्ट्रासाठी यासाठी महत्त्वाची की, गडचिरोली हिंसाग्रस्त करण्यात त्याचा वाटा होता. 35 वर्षांपूर्वी अहेरीचे आमदार धर्मरावबाबा अत्राम यांचे त्यानेच अपहरण केले होते. 2008 मधील दंतेवाडा येथील 76 जवानांच्या भीषण मृत्युकांडास देवजीच कारणीभूत होता. अशी अनेक भीषण कृत्ये त्याने घडवून आणली. देवजीनंतर नक्षल चळवळीत आता केवळ मुप्पाला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती आणि मिशिर बेसरा हे दोन नेतेच शिल्लक आहेत. गणपती याची तब्येत बिघडली असून, तो भूमिगत आहे. 1970च्या दशकात सामाजिक शोषणाच्या विरोधात नक्षलवादी चळवळ सुरू झाली. 1946 ते 1951 या काळातील तेलंगणा सशस्त्र लढ्याची शिदोरीदेखील या नक्षलवाद्यांबरोबर होती. आमचा लढा पोलिसांबरोबर नसून, तो व्यवस्थेच्या विरोधात आहे, अशी या मंडळींची भूमिका होती; मात्र हा आदर्शवाद पुढे राहिला नाही. उलट धरणे, कालवे, रस्ते, पूल, इस्पितळे, शाळा यांच्यावर हल्ले केले गेले. मुख्यतः आदिवासी भागात राहून काम करणारे नक्षलवादी क्रांती करून त्यांच्या जीवनात विकासाचा प्रकाश आणण्याच्या गोष्टी करत असत.
प्रत्यक्षात सरकारने जेव्हा आदिवासींच्या प्रगतीसाठी वेगवेगळी विकासाची कामे हाती घेतली, तेव्हा त्या वाटेवर सुरुंग पेरण्याचे अथवा बॉम्ब हल्ले करण्याचे काम नक्षलवाद्यांनी केले. आदिवासी वस्त्यांत आश्रयाला जायचे, त्यांच्याकडून दाणापाणी घ्यायचे आणि त्यांचीच उन्नती होऊ नये, म्हणून आटोकाट प्रयत्न करायचे, हे या नक्षलवाद्यांचे वर्तन. गोरगरीब आदिवासी भयाच्या सावटाखाली काही बोलू शकत नव्हते. बाहेर देशांतून येणारा पैसा ऐषोरामासाठी खर्च करण्याच्यादेखील घटना समोर आल्या. मुळात क्रांतीची फसवी स्वप्ने दाखवून आणि अशा फसव्या क्रांतीच्या मागे लागून अनेक तरुण-तरुणांनी शस्त्रे हातात घेतली. निरपराध नागरिकांचे प्राण घेतले. सरकारी यंत्रणेला वेठीस धरले. अगदी लहान वयातही मुलामुलींच्या हातात शस्त्रे देऊन त्यांना शिक्षण व प्रगतीपासून वंचित ठेवले. वर्षानुवर्षे जंगलात राहून, कुटुंबापासून दूर राहून होणारी परवड असंख्य नक्षल्यांना असह्य होऊ लागली, हेही वास्तव आहे.
2013 पासून गडचिरोलीत वा तेलंगणात संघटनेत नवीन भरती होत नव्हती. नक्षलवादी नेते जनतेपासून लांब गेले होते. जेव्हा संघटना जनतेपासून तुटते, तेव्हा तिचा अंत निश्चित असतो. नोव्हेंबर 2024 मध्ये आता शस्त्रांसह काम करणे अशक्य आहे, असे मत भूपती याने गणपती, बसवराजू, देवजी प्रभृती संघटनेच्या नेत्यांसमोर मांडले होते. अनेकांनी त्याला चुकीचे ठरवले; परंतु देशातील परिस्थितीचा विचार करूनच भूपतीने सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडण्याचा विचार मांडून दाखवला होता. एप्रिल 2025 मध्ये बसवराजूदेखील मुख्य प्रवाहात येण्यास तयार होता; पण नंतर त्याने निर्णय बदलला आणि तो चकमकीत ठार झाला. संघटनेत दबदबा असलेला हिडमा समाजमाध्यमांमुळे तरुण पिढीत लोकप्रिय झाला होता.
शेकडो सुरक्षा जवान आणि नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार असलेला पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा प्रमुख माडवी हिडमा आणि त्याची पत्नी यांना ठार करण्यात गेल्या नोव्हेंबरात सुरक्षा दलांना यश आले होते. महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा पोलिसांनी समन्वय ठेवून आखलेले डावपेच, धाडसी कारवाया आणि टप्प्याटप्प्याने माओवाद्यांना घेरून त्यांचा केलेला खात्मा यामुळे ही चळवळ आता आचके देत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीत तर आता अब्जावधींची गुंतवणूक होत आहे. तेथे नवे उद्योग उभारले जात आहेत. छत्तीसगड व तेलंगणातही तरुण-तरुणींना शिक्षण व रोजगार मिळू लागला आहे; मात्र बेसावध राहून चालणार नाही. शिवाय केवळ खनिजांवर आधारित मोठे उद्योग आणून सर्वंकष विकास होईल, असे नाही. आदिवासी पट्ट्यातील विकास निसर्गपूरक असणे आवश्यक आहे. मुख्यतः तेथे शिक्षण व आरोग्यसेवांचा अगदी दुर्गम भागांपर्यंत विस्तार होणे आवश्यक आहे. आदिवासींच्या मनात सरकार, समाज आणि व्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण झाला, तर कोणीही हातात बंदूक घेणार नाही.