‌’शक्तिपीठ‌’ची व्याप्ती रेड्डीपर्यंत

कोकणातील शेतजमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Shaktipeeth Highway
‌’शक्तिपीठ‌’ची व्याप्ती रेड्डीपर्यंत
Published on
Updated on

शशिकांत सावंत

नागपूर-रेड्डी शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या घोषणेमुळे कोकणातील शेतजमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

एका बाजूला 14 वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, दुसऱ्या बाजूला 22 वर्षे रखडलेला रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, तीन वर्षांपूर्वी घोषित झालेला ग््राीन फिल्ड महामार्ग आणि आता रत्नागिरी-नागपूर महामार्ग अशा असंख्य महामार्गांच्या यादीमध्ये आता नागपूर-रेड्डी शक्तिपीठ महामार्ग होणार, अशी नवी घोषणा गेल्याच आठवड्यात झाली आणि आपल्या शेतजमिनी जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. हजारो एकर शेतजमीन या महामार्गासाठी जाणार असल्याने आंबा, कोकम, काजूसह अशी महत्त्वाची फळपिके देणाऱ्या या प्रदेशामधील शेतकऱ्यांची अस्वस्थता ही स्वाभाविक उमटलेली प्रतिक्रिया होती. बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग आता कोकणचे महत्त्वाचे व्यापारी बंदर असलेल्या रेड्डीपर्यंत जोडले जाणार आहे. नागपूर ते गोवा अशा या शक्तिपीठ महामार्गावरून गेले अनेक दिवस राजकीय आणि सामाजिक स्तरावर विरोधाचे राजकारण तापलेले आहे.

माहूर, तुळजापूर, कोल्हापूर या शक्तिपीठांसह एकूण 21 धार्मिक स्थळे जोडणारा हा महामार्ग खरं तर व्यावसायिक कॉरिडॉर म्हणूनही ओळखला जात आहे. कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत झालेला विरोध लक्षात घेऊन हा महामार्ग काही गावे वगळून आता मार्गस्थ होणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी गेल्या आठवड्यात दिली आहे. एकूण 13 जिल्ह्यांमधून जाणारा हा मार्ग 856 किलोमीटरचा आहे. सिंधुदुर्गात सावंतवाडी, बांदा, माजगाव, दोडामार्ग अशा भागांतून हा मार्ग रेड्डीपर्यंत जाणार आहे. या मार्गावरील प्रवासासाठी 9 तास एवढा कालावधी लागणार आहे.

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केल्यानंतर मार्गाची दिशा बदलण्यात आली आणि रेड्डीपर्यंत हा मार्ग विस्तारित करण्यात आला. कोकणातील महत्त्वाच्या दहा बंदरांत रेड्डी बंदराचा समावेश होतो. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यात हे महत्त्वाचे बंदर आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवरील शेवटचे गाव म्हणून ते ओळखले जाते. या बंदराचे ‌‘रेवतीपट्टम‌’ हे ऐतिहासिक नाव असून लोहखनिजाच्या निर्यातीसाठी ते प्रसिद्ध आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करणे असा उद्देश असून रेवस-रेड्डी आणि नागपूर-गोवा अशा दोन महामार्गांनी ते जोडले जाणार आहे. रेड्डी बंदरातून आंबा नैसर्गिक वायू, कोळसा, लोहखनिज निर्यात होते. शक्तिपीठ महामार्ग व्यापारी कॉरिडॉर म्हणूनही महत्त्वाचा ठरणार आहे. 13 जिल्हे 84 तालुक्यांना जोडणारा हा महामार्ग रेड्डी बंदराला जोडण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग 14 वर्षे रडत रखडत सुरू आहे. दुसरा एक सागरी महामार्ग रेवस-रेड्डी हा 22 वर्षे रखडलेला आहे, तर तिसऱ्या ग््राीन फिल्ड महामार्गाची घोषणा राज्य सरकारने केली आहे. एका बाजूला नागपूर-रत्नागिरी या महामार्गाचे काम सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला नागपूर-गोवा हा शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. या असंख्य महामार्गाची झालेली घोषणा. त्यात जात असलेली शेतजमीन त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत आणि दुसऱ्या बाजूला महामार्गांची एका मागून एक घोषणा सुरूच आहे. त्यामुळे आधी घोषित झालेले महामार्ग कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कोकणासाठी महत्त्वाच्या मुंबई-गोवा महामार्गाची पूर्ण होण्याची शेवटची तारीख 30 मे आहे. ही सरकारने दिलेली दहावी डेडलाईन आहे. मात्र या डेडलाईनपर्यंतही हा मार्ग पूर्ण होण्याची आशा मावळलेली आहे. एका बाजूला हा महामार्ग पूर्ण होण्याआधीच टोल आकारणीची चर्चा सुरू झाली. टोल घेण्याची तयारीही झाली. त्यात पुन्हा एकदा शक्तिपीठची नवी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे भविष्यात विरोधाची धार तीव होण्याची शक्यता आहे. विदर्भाचा दगडी कोळसा आणि रेड्डीतील लोहखनिजाचा व्यापार असा शक्तिपीठ महामार्गाचा प्रवास आहे. त्यामुळे त्याचे व्यावसायिक सुसूत्रीकरणही समोर येणे स्वाभाविक झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news