

डॉ. विजय ककडे
आपण घेतलेला म्युच्युअल फंड हा व्यवस्थित आहे का, याचे मूल्यमापन केल्याशिवाय तो चांगला किंवा बदलण्यास आवश्यक हे ठरत नाही.
भारतात म्युच्युअल फंड हे आता सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना गुंतवणुकीचे सुरक्षित व चांगला परतावा देणारे साधन ठरले आहे. त्यामुळेच दरवर्षी भरघोस गुंतवणूकही या फंडात होत असते. त्यातूनच भारताचा शेअर बाजारदेखील चांगला झाला. परकीय गुंतवणूकदारांनी शेअर्स विकले, तरी बाजारात मोठी पडझड दिसत नाही. ही स्थिरता महत्त्वाची आहे. म्युच्युअल फंडाचे मूल्यमापन करण्यासाठी काही महत्त्वाचे निकष माहीत असणे आवश्यक आहे.
परतावा
म्युच्युअल फंडाच्या बाबतीत परतावा हाच महत्त्वाचा निकष साधारणपणे मांडला जातो; परंतु त्याचबरोबर इतर महत्त्वाचे निकषदेखील आवश्यक असतात. केवळ परतावा पाहून केलेली गुंतवणूक अडचणी निर्माण करू शकते. हा परतावा गेल्या तीन ते पाच वर्षांत कसा आहे, हे पाहूनच गुंतवणूक ठरवावी. केवळ अलीकडच्या काळात मोठा परतावा दिला म्हणून त्यात गुंतवणूक करणे टाळावे. परतावा हा जोखीम किती प्रमाणात घेतला, यावरून मोजणे आवश्यक आहे. त्यासाठी जोखीम समायोजित परतावा अभ्यासणे योग्य ठरते, तसेच परताव्यामध्ये फार मोठे चढ -उतार नसावेत, यासाठी स्टँडर्ड डिव्हिएशन हे तंत्र वापरतात.
आर्थिक उद्दिष्टे
म्युच्युअल फंड घेत असताना आपली गुंतवणुकीची उद्दिष्टे कोणती आहेत, हे स्पष्ट हवे. परतावा, स्थिर उत्पन्न तसेच गुंतवणुकीचा कालखंड कोणता, जोखीम क्षमता कोणती, करांचे परिणाम कसे होतात आणि रोखतेची गरज म्हणजेच पैसे कधी लागणार, हेदेखील प्रथम ठरवणे आवश्यक असते. अल्पकालीन उद्दिष्टासाठी दीर्घकालीन फंड चुकीचा ठरतो.
खर्च विश्लेषण
म्युच्युअल फंडासाठी असणारा गुंतवणूकदारांचा खर्च म्हणजेच एक्स्प्रेस रेशो महत्त्वाचा असतो. हा जितका कमी असेल तेवढे अधिक चांगले. साधारणपणे एक टक्क्यापेक्षा अधिक असेल, तर त्याने तशा प्रकारचा उत्तम परतावा दिलेला असणे आवश्यक असते, तसेच गुंतवणूक करत असताना किंवा काढून घेत असताना कोणत्या प्रकारचे भार किंवा एक्झिट लोड, एन्ट्री लोड आहेत, ते पाहावे लागते. बर्याचदा छुपे खर्च असतात, तेही तपासून पाहावे.
फंड मॅनेजर
हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. त्याचा अनुभव शक्यतो पाच वर्षांपेक्षा जास्त असावा तसेच बाजाराच्या चढ-उतार परिस्थितीत त्यांनी केलेले कार्य हे फक्त पासून पाहावे, त्या म्युच्युअल फंडात एकूण गुंतवणूक किती आहे म्हणजेच अॅसेट अंडर मॅनेजमेंट हे पाहावे. 100 कोटींपेक्षा आत असणारे अतिलहान व पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त असणारे अतिमोठे म्युच्युअल फंड शक्यतो निवडू नयेत.
गुंतवणूक रचना
आपण केलेली गुंतवणूक कोणत्या कंपनीमध्ये केली जात आहे तसेच मोजक्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे का, गुंतवणूक केलेल्या कंपन्या गुणवत्तेने चांगल्या आहेत का म्हणजेच त्यांचा कर्जभार कमी असावा. सातत्याने उत्पन्न मिळवणारे असावेत आणि त्यांच्याकडे रोख प्रवाह चांगला असावा.
तुलना
आपल्या म्युच्युअल फंडाचा परतावा व एकूण त्या गटातील परतावे कसे आहेत तसेच बेंच मार्क परतावे यापेक्षा अधिक आहेत का, हेही पाहणे महत्त्वाचे असते. यासाठी तीन ते पाच वर्षांचे चक्र्रीय परतावे किंवा रोलिंग रिटर्न्स पाहावीत. ‘म्युच्युअल फंड सही हैं’ ही जाहिरात आपण ऐकत असतो; पण आपण घेतलेला म्युच्युअल फंड आपल्यासाठी सही आहे का, हे मात्र तपासत नसू, तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आंधळी गुंतवणूक ठरू शकते. यासाठी अर्थातच तज्ज्ञ मार्गदर्शक किंवा आपला पोर्टफोलिओ सल्लागार हा महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, तेथे प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा करून आवश्यकतेप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडात बदल करणे हेच आवश्यक असते. कोणतीही गोष्ट सातत्यपूर्ण व अभ्यास न करता घेतल्यास नुकसान होऊ शकते. जागरूकता अत्यंत आवश्यक असते. आपली गुंतवणूक जागेपणाने करावी, शहाणपणाने करावी, हेच महत्त्वाचे!