पहिला चहा | ‘नीट’चा मुन्नाभाई!

NEET paper leak
पहिला चहा | ‘नीट’चा मुन्नाभाई!
Published on
Updated on

मुन्नाभाईस पत्र,

आपला चित्रपट पाहून (मुन्नाभाई एमबीबीएस) जोर चढल्याने 22 लाख विद्यार्थ्यांना कॉपी करायला लावून नीट चुना लावत तोतया मुन्नाभाईने स्वतःचे मुंडण केले. खैर (आडनाव मुंडणकर्त्याचे) डोक्यावरचे केस परागंदा झाल्याने सीबीआयला केस अवघड वाटू लागली. ‘तो मी नव्हेच’ हा खैरनारने पवित्रा घेतल्याने सीबीआय कन्फ्युजून गेली. आता या खैरनारचा अनुपम खेर कसा काय झाला असावा या भलत्या शोधात पोलिस असताना प्रकरणात सामील झालेल्यांची यादी आणि पालकांची यादी याची पडताळणी सुरू झाली.

मुन्नाभाईने भाईगिरी करत तब्बल 15 लाखाला नीट पेपर नारळागत फोडला. म्हणजे पेपरफोड्यांसाठी हा श्रीगणेशाच होता. इथून पुढे अशी क्रांती कोण ना कोण तरी करणार याची धास्तीच लागून राहिली, नीटचा अभ्यास नीट करणार्‍यांना. नीट कसलं, या नीट पेपरफुटीनं क्लीन चिट दिली अभ्यासू वर्गाला. गणेशाने मातेलाच पृथ्वी मानून प्रदक्षिणा घालणं आणि असा शॉर्टकट मारत अभ्यासाविना पोरांना डॉक्टर करणं यातली तफावत किती आहे हे आजच्या पिढीला समजेल असे वाटत नाही. कशाला हवाय हा शॉर्टकट देव जाणे. या पद्धतीने परीक्षा पास होऊन मुन्नाभाईच सगळीकडे निर्माण होतील. पेपरफुटीमुळे नीट परीक्षेस गळती लागली. राज महोदय केरलाचे अनुकरण करत महाराष्ट्रात नीट बंद झाली पाहिजे या घोषणाबाजीत दंग. सगळेच कुदळ फावडे घेऊन शैक्षणिक क्षेत्र नांगरायला निघाले तर पेरणी कोण करणार. बियाणे (नीटचे विद्यार्थी) पण निम्मे अर्धे खतपाण्याला प्रतिकूल.

सगळी टरफलं निघाली तर उगवणार ते काय म्हणा. तर मुद्दा असा आहे, कोणीही मुन्नाभाई होऊन पेपर फोडत असेल तर भविष्यात कोणते डॉक्टर पेशंटचे शिवणकाम (सर्जरी) करणार हा विचारच खुनी वाटतो. असे डॉक्टर नीटमुळे पैदा झाले तर रीतसर खून करण्याचा परवानाच घेऊन दवाखाने उघडले जाणार. प्रश्न असा आहे या न उगवणार्‍या बिया पेरायच्या कुठे? अर्थात निवडुंग असेल तर निवडुंग म्हणून उगवावे. यात शिक्षकाला, मुन्नाभाईला आणि पेपर विकत घेणार्‍या बापाला लाज वाटली नसली पाहिजे की निवडुंगच उगवणार आपल्याकडून. खाण तशी माती, मती तशी कृती. काय म्हणता यावर आपण मुन्नाभाई? आपल्या तोतया मुन्नाभाईस आपणच ताब्यात घेऊन ऑपरेशन कसे करावे हे शिकवावे किंवा जादू की झप्पी सरकारकडून घ्यावी ही विनंती. आपला नम्र!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news