

निवडणुका जर शांततेत पार पाडायच्या असतील तर त्या बिनविरोध झाल्या पाहिजेत. साहित्य संमेलनांना जे जमले नाही ते या वर्षीच्या महापालिका निवडणुकांमध्ये जमून आले. किती समजूतदारपणा म्हणायचा? अगदी एखादा प्रियकरसुद्धा आपल्या प्रेयसीला पत्र लिहिताना- ‘के तुम नाराज ना होना...’ म्हणत घाबरत घाबरत पत्र लिहित असतो; परंतु या खेपेला चांगले सत्तरच्यावर बिनविरोध निवडून आलेले हे कार्पोरेटर म्हणजे कट्टर प्रेमवीरच म्हणायला पाहिजेत.
त्यापैकीच एक आमचे भाऊ बिनविरोध निवडून आलेले! अजून मतदान नाही, मतमोजणी नाही तोवर आमचे भाऊ निवडून आले. रे माझ्या कर्मा, हे कसे काय घडले? भाऊंचे कार्यकर्ते म्हणीत होते की, ‘यिवून यिवून येणार कोण आणि भाऊशिवाय हाय कोण?’ पण अशाप्रकारे भाऊ निवडून येतील, असे कुणाला वाटत नव्हते. खरं तर रितसर निवडणूक तरी हुयाला पाहिजे हुती. निवडणुकीशिवाय मज्जा नाही. हेच्या परास अवकाळी पाऊस बरा. द्राक्षे गेली तरी डाळिंबं तरी मागं र्हात्यात. भाऊनं मात्र सगळ्यांचा अगदी सुपडासाफ केला.
बाकी भाऊची ताकद मोठी म्हणा. दिसायला अगदी गव्यासारखा तगडा आणि त्याची कोयता ही त्याची निशाणी बघून निम्मे उमेदवार घरात जाऊन बसले. त्यात भाऊ उघडे बाबांचे भक्त! उघडेबाबांनी भाऊंच्या विरोधातले अकरा उमेदवार अक्षरशः उघडे पाडले. अंदरकी बात वेगळीच हाये म्हणतात. भाऊंनी थेट उमेदवारांबरोबरच सौदा केला. म्हणजे मतदाराला प्रत्येकी पाच-दोन हजार, कोंबडी-क्वार्टर द्यायची, अपार्टमेंटी रंगवून द्यायच्या... त्या परास डायरेक्ट उमेदवारच ताब्यात. हा फंडा यंदाच सुचला तोही भाऊंना! ‘मातीविना शेती तसे निवडणुकीविना कार्पोरेटर!’ आता हा पॅटर्न विदर्भ मराठवाड्यातही गाजणार म्हणतात.
ईव्हीएम विनाकारण बदनाम झालं. दहा-बारा जेसीबी सांगितल्यात भाऊंच्या विजयी मिरवणुकीला! भाऊंच्या गळ्यात जेसीबीने हार घालणार आहेत. बॉलीवूडचा हिरो मिरवणुकीत नाचायला येणार म्हणतात. भाऊंचा डायलॉग प्रसिद्ध आहे, ‘मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो नहीं बोलता हूँ वो भी करता हूँ...’ सगळेच बिनविरोध विजयी कार्पोरेटर भाऊंच्या सारखे असतीलच असे नाही; परंतु बिनविरोध कार्पोरेटर हा भविष्यात राष्ट्रीय नारा ठरू शकतो...