Political Defections News | मासे आणि गळ

municipal elections
Political Defections News | मासे आणि गळFile photo
Published on
Updated on

समजा तुम्ही एखाद्या जलाशयाच्या काठावर बसलेले आहात. तुम्हाला मासे पकडण्याची इच्छा आहे. मासे काही स्वतःहून उडी मारून तुमच्या पिशवीत येऊन पडणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला गळ लावावा लागेल. धारदार आकडा असलेल्या तारेला हा गळ बांधलेला असतो. हा गळ म्हणजे एखादा मांसाचा तुकडा किंवा अळी असते. गळाच्या मोहामध्ये मासा स्वतःला अडकवून घेतो आणि धारातीर्थी पडतो.

सध्या मनपा निवडणुकांचे वारे असल्यामुळे अमुक नेता तमुक पक्षाच्या गळाला लागला, अशा बातम्या पाहण्यात येत आहेत. दुसर्‍या पक्षात असलेले मोठे नेते आपल्या पक्षात यावेत, यासाठी विविध पक्ष वेगवेगळे गळ घेऊन बसलेले आहेत. काही मासे स्वतःच गळाला अडकण्यासाठी उत्सुक आहेत. या ठिकाणी प्रत्येकाच्या दोनच इच्छा आहेत. पहिली इच्छा म्हणजे विशिष्ट पक्षाचे तिकीट मिळावे आणि दुसरी इच्छा म्हणजे त्या पक्षाच्या पुण्याईवर आपण विनासायास निवडून यावे.

एका पक्षाचे नेते दुसर्‍या पक्षात येत असताना दुसर्‍या पक्षात असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची अडचण होत असते. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमांमध्ये मूळ पक्षाचे कार्यकर्ते गोंधळ करतात, निषेध नोंदवतात, क्वचितप्रसंगी जागोजागी राडेसुद्धा होत आहेत. नव्याने पक्षांतर केलेला नेता काहीतरी वचन घेऊन आलेला असतो. त्याला तिकिटाची हमी दिलेली असते किंवा क्वचितप्रसंगी आज पक्ष प्रवेश कर, तुझ्या मुलाला जिल्हा परिषदेचे तिकीट देतो अशी पण आश्वासने दिलेली असतात. पक्षाचे तिकीट, सभापतिपद, जिल्हा परिषदेचे तिकीट हे विविध प्रकारचे गळ आहेत आणि या गळाला अडकून अनेक मासे, नव्हे नव्हे नेते, आपल्याकडे ओढण्याची राज्यात सध्या जणू स्पर्धा सुरू झालेली आहे.

जुना पक्ष सोडताना काही ना काहीतरी कारण द्यावे लागते. त्या पक्षात घुसमट होत होती किंवा पक्षाने अन्याय केला म्हणून आपण पक्षांतर केले, ही कारणे फार गुळगुळीत झाली आहेत. सध्याच्या राजकारणात एक नवीनच कारण आलेले आहे आणि ते म्हणजे आपल्या भागाच्या विकासासाठी मी पक्षांतर केले, असे सांगणे होय. विकास करायचा असेल तर सत्ताधारी पक्षात गेले पाहिजे, हे प्रत्येकाला माहीत आहे. सत्तेत असणार्‍या पक्षाकडून भरघोस निधी मिळत असतो आणि त्याद्वारे जनतेचा, विभागाचा आणि स्वतःचा विकास करता येतो, हे चाणाक्ष कार्यकर्ते ओळखून असतात. याच कारणामुळे आज प्रत्येक जण विकासासाठी पक्षांतर करत आहे. विकासासाठी आसुसलेले इतके नेते असणे हे खरेतर राज्यासाठी भाग्याचे आहे; पण बरेचदा हे जनतेच्या लक्षात येत नाही. जनता बिचारी साधीभोळी असते. प्रत्येक पक्षांतर हे स्वतःचा विकास करण्यासाठी आहे, असे जनतेला वाटत असते. हे सर्व काही तुमच्या-आमच्या विकासासाठी चालले आहे, हे जनतेच्या लक्षात येईल तो खरा भाग्याचा दिवस म्हणावा लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news