

शशिकांत सावंत
‘महापालिकांचा जिल्हा’ अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत सेना-भाजप युती झाली असली, तरी उर्वरित मिरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगरमध्ये हे दोन पक्ष आमने-सामने असल्याने जिल्ह्याच्या वर्चस्वासाठी सत्तारूढ पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महापालिका निवडणुकीचे रणांगण आता अखेरच्या टप्प्यात आले आहे. राज्यात 29, तर कोकणात 9 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा यात समावेश आहे. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजप आमने-सामने ठाकले होते. त्यावेळी दोन पक्षांमध्ये जोरदार वाक्युद्ध रंगले होते. त्याची अखेर खासदार नारायण राणे यांनी घेतलेल्या कणकवलीतील शक्ती प्रदर्शनाच्या मेळाव्याने झाली. आताही नवी मुंबई, मीरा-भाईंदर, उल्हासनगर या महापालिकांमध्ये महायुतीतील पक्ष आमने-सामने ठाकले आहेत. कल्याण-डोंबिवली, ठाणे, पनवेल, भिवंडी या महापालिकांमध्ये महायुतीतील पक्ष सोबत आहेत. महाविकास आघाडीतही मनसे, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे पक्ष बहुतांश महापालिकेत एकत्र आले आहेत. काँग्रेसचा मात्र सवता सुभा पाहायला मिळत आहे. परिणामी, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींमध्येे फाटाफूट असल्याने प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी झगडत आहे.
ठाण्यामध्ये युती करू नये, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची सुरुवातीपासूनची इच्छा होती. भाजपने स्वतंत्र लढाईसाठी उमेदवारही तयार केले होते, तर शिवसेनेचे ठाणे हे बलस्थान असल्याने त्यांच्याकडे एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवार होते. त्यामुळे महायुती जाहीर होताच बंडखोरीला ऊत येणे स्वाभाविक ठरले. ठाण्याबरोबर कल्याण-डोंबिवलीतही अशीच स्थिती आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी अनेक ठिकाणी एकत्र लढत असल्या, तरी कार्यकर्त्यांची मने मात्र दुभंगलेली आहेत. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक नेतृत्वाचाही कस लागला आहे. भाजपने ठाण्यासाठी पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे धुरा दिली असली, तरी या शहराचा भाजपचा चेहरा म्हणून आमदार संजय केळकर यांनाच अधिक पसंती आहे.
शिंदे शिवसेनेच्या बाजूने खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक हे महत्त्वाचे चेहरे आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या महापालिकांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. अखंड शिवसेना असताना 1984 मध्ये शिवसेनेकडे पहिली महापालिका जी आली ती ठाणे होती. त्यामुळे ठाणे म्हणजे शिवसेना असे समीकरण त्या काळापासून चालत आलेले आहे. सुरुवातीला आनंद दिघे आणि आता एकनाथ शिंदे हे या शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत. शिवसेना-भाजप एकत्र आल्याने या दोघांना हा गड सोपा वाटला असला, तरी उद्धव ठाकरे शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची तिरंगी आघाडी एकत्र आल्याने नवे आव्हान उभे राहिले आहे.
कल्याण-डोंबिवली ही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रवासाची जन्मभूमी आहे. त्यामुळे भाजपसाठी ही लढाई प्रतिष्ठेची आहे. दुसर्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील ही महापालिका असल्याने शिवसेनेलाही हा लढा प्रतिष्ठेचा वाटत आहे. त्यामुळे महायुती करूनच हे दोन पक्ष निवडणुकीला सामोरे गेले आहेत. दुसर्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये मनसे, ठाकरे शिवसेना एकत्र आहेत, तर तिसर्या बाजूला वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी तिसरी आघाडी रिंगणात आहे; मात्र या बहुपर्यायी उमेदवारांच्या लढतींमध्ये महायुतीतील शिवसेना विरुद्ध या पक्षांमध्ये खरी लढत असणार आहे. भिवंडीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होत आहे. उल्हासनगरमध्ये भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेने स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करत येथील निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तिसर्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे अशी आघाडी निवडणूक लढवत आहे; मात्र येथेदेखील खरी लढत शिंदे शिवसेना-भाजपमध्येच होणार आहे. त्यामुळे एकंदरीत ठाणे जिल्ह्यात होणार्या महायुतीमधीलच एकमेंकाविरुद्धचे सामने रंजक ठरणार आहेत.