

नजीकच्या काळात मुंबई, पुणे आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची नांदी म्हणून विविध प्रकारचे बॅनर शहरांमध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्या बॅनरवरील शीर्षके पाहिली असता उमेदवारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुक करावेसे वाटते. ‘सात वर्षे सेवा केली, आता फक्त मत द्या’ किंवा ‘केले सेवेचे सप्तसूर, आता येऊ द्या मतांचा पूर’, ‘बापू म्हणजे आपला माणूस’, ‘दादा म्हणजे घरातला माणूस’, ‘भैया म्हणजे वेळेला धावून येणारा माणूस’ अशा प्रकारची विविध शीर्षके बॅनरवर दिसण्यास सुरुवात झाली आहे.
याशिवाय बहुतांश बॅनरवर अद्याप कोणत्याही पक्षाचे चिन्ह टाकलेले नाही म्हणजे या लोकांना पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळेल, याची खात्री नाही. आपल्या पक्षाचे चिन्ह मिळो अथवा न मिळो; परंतु निवडणूक लढवायचीच असा बाणा घेऊन असंख्य महिला आणि पुरुष उमेदवार रिंगणामध्ये आधीच उतरले आहेत. गेल्या वर्षभरात यापैकी काही लोकांनी आपल्या वार्डातील मतदारांना काशी, अलाहाबाद किंवा अष्टविनायक सफरी घडून आणल्या आहेत. ‘घडवून आणले अलाहाबाद आता होऊ द्या मतांची बरसात’ असे आवाहनही करण्यात येत आहे.
मतदार विसरले असतील, तर त्यांना पुन्हा पुन्हा आठवण करून देण्यात येत आहे. ‘जिंकू किंवा मरू’या अविर्भावात आजकाल निवडणुका लढवल्या जातात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एकदा का निवडणूक झाली की, पुन्हा पाच वर्षे उभे राहण्याची संधी मिळत नाही. ज्येष्ठ उमेदवार असतील, तर त्यांच्यासाठी ते अधिकच कठीण असते. उदाहरणार्थ एखादा 65 वर्षे वयाचा उमेदवार यावर्षी उभा राहिला आणि पराभूत झाला, तर पुढच्या निवडणुकीच्या वेळेला तो 70 वर्षांचा झालेला असतो आणि बर्यापैकी थकलेला असतो. तरुण मतदार त्याला मतदान करण्याची शक्यता कमी होत जाते. या कारणामुळे जे काय होईल ते याच निवडणुकीत होईल, अशा निकराने लोक निवडणुका लढवत आहेत.
‘ज्या रस्त्यावर तुम्ही हे बॅनर वाचत आहात त्या रस्त्याचा शिल्पकार यावेळेला उमेदवार आहे. त्यालाच मतदान करा’ असे आग्रहाचे आवाहनही केले जात आहे. कार्यसम्राट नगरसेवक, भावी नगरसेवक अशा पद्धतीने स्वतःचा गौरव करून घेण्यात उमेदवार धन्यता मानत आहेत. एकंदरीत तुमची मजा आहे. लवकरच ‘क्रिकेटची बॅट’, ‘कपबशी’ अशी चिन्हे असणारे लोक त्या वस्तू घेऊन तुमच्या घरी येतील आणि मतदानाचा आग्रह करतील. ‘टीव्ही’, ‘पंखा’ असे भारी चिन्ह आले, तर मतदारही सुखावलेले असतात. राजकारणाचे काय व्हायचे ते होईल; परंतु तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य लोकांची मात्र चंगळ होणार आहे, यात शंका नाही.