

तुकाराम मुंढे हे महाराष्ट्राचे सुपरमॅन आहेत. एफडीए आयुक्त म्हणून कार्यभार स्विकारल्यापासून त्यांच्या कामाच्या झपाट्याने भेसळखोरांना जरब बसलीय. सामान्य माणसांचे आणि जेनझीचेही ते लाडके बनलेत. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या प्रत्येक घडामोडी आता व्हायरल होतात. पण, नुकतेच त्यांच्या एका विधानाने महाराष्ट्रातील लाखो पालकांच्या छातीत धडकी भरली असेल. ‘मला कधीही ७० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळाले नाहीत. पण तरीही आयएएस झालो,’ असे ते म्हणाले. त्यावर, आतापर्यंत मुलांच्या मार्कशीटवरून त्यांचं भविष्य ठरवणाऱ्या पालकांना आता मुलांनीच मुंढेंचं उदाहरण दाखवायला सुरुवात केली तर घराघरांत प्रशासकीय पेच निर्माण होईल की नाही?
मुंढेंचा संदेश स्पष्ट आहे. मार्क महत्त्वाचे नाहीत, कर्तृत्व महत्त्वाचं! पण, हे कर्तृत्व नोकरीत दाखवायचं असतं आणि ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. पोस्टिंग कुठेही मिळो, तिथे नियमांच्या पुस्तकाला झटकून जागं करायचं, अधिकाऱ्यांना घाम फोडायचा, भेसळखोरांना सळो की पळो करून सोडायचं आणि बदली झाली की पुढच्या ठिकाणी पुन्हा नव्या जोमाने धडाका लावायचा!
हल्ली भेसळखोर खूप सावध झालेत. मुंढे साहेबांची बदली झाली की नाही ते सारखं चेक करत असतात. मुंढेंच्या नावानेच काहींच्या पोटात गोळा येत असेल. कायद्याची अंमलबजावणी अशी असावी की गुन्हेगाराने गुन्हा करण्याआधीच आत्मपरीक्षण करावं! मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबतही मुंढे साहेबांनी भूमिका ऐकली. विशलिस्टवर अवलंबून राहत नाही, वास्तवात राहायला आवडंत, असं ते म्हणाले.
एक मात्र नक्की. मुलांना मार्कांच्या मागे पळवू नका, हा त्यांचा सल्ला योग्यच आहे. फक्त पालकांनी मुलांना एवढंच सांगावं, मार्क कमी पडले तरी चालतील; पण मोठे झाल्यावर मुंढेंसारखं काम करा. कारण ७० टक्के मार्कांनी आयएएस होता येतं, पण १०० टक्के कामाचा धडाका लावण्यासाठी मुंढेच व्हावं लागतं! मुंढेंची बदली झाली की भ्रष्ट व्यवस्था सुटकेचा निःश्वास टाकते आणि नवी पोस्टिंग मिळाली की पुन्हा तेथील व्यवस्थेच्या छातीत धडकी भरते. त्यांच्या बदलीच्या आदेशापेक्षा त्यांच्या पुढच्या कारवाईची धास्ती अधिक असते. महाराष्ट्रात सध्या भेसळखोरांना मुंढे साहेबांच्या रडारवर आपण किती दिवसांत येणार, याचंच टेन्शन जास्त असेल नाही?