

मुंबई हे जगातील अफाट आणि अवाढव्य असे शहर. या महानगराची लोकसंख्या दरवर्षी 10 लाखांनी वाढत आहे. आजघडीला ती सव्वा कोटीवर गेली असून, मुंबई महानगर प्रदेशाची लोकसंख्या तर 2 कोटी 30 लाखांवर पोहोचली. या महानगरात रोज 75 लाख लोक उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनू लागला आहे. सोमवारी मध्य रेल्वेच्या मुंबई रेल्वेस्थानकाजवळ लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणारे 13 प्रवासी बाहेर फेकले गेले. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर नऊजण जखमी झाले. नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी असल्यामुळे लोकलमध्ये उभे राहण्यासही जागा नव्हती. त्यामुळे अनेक प्रवासी डब्याच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करत होते. कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली लोकल मुंबई रेल्वेस्थानकाजवळ आली असताना, बाजूच्या रुळावरून कर्जत लोकल जात होती.
एकदम तीव्र वळण आणि मार्गांमध्ये कमी अंतर असल्यामुळे, दोन्ही लोकलच्या दरवाजांत उभे असलेले प्रवासी, तसेच त्यांच्या बॅगा परस्परांवर आदळल्यामुळे ही भयंकर दुर्घटना घडली. वास्तविक, या मार्गिकांच्या ठिकाणी रेतीबंदर खाडीमार्गावर मोठे वळण आहे आणि यावरून अतिजलद लोकल धावत असेल, तर ती धोकादायक ठरू शकते, अशी भीती प्रवाशांनी वारंवार व्यक्त केली होती; पण त्याची दखल घेण्यात आली नाही. खासकरून, कसारा, कर्जत आणि खोपोली भागातून सकाळी लोकलला प्रचंड गर्दी असते. सकाळच्या वेळेत मुंबईत जाणार्या बहुतांशी प्रवाशांची अतिजलद गाड्यांना पसंती असते. अतिजलद उपनगरी लोकलसाठी पारसिक बोगद्यातील मार्ग आता बंद झाला आहे.
लोकल जोरात धावत असते, तेव्हा रेल्वे गाडी दोन्ही बाजूला हेलकावे खाते. अशावेळी दरवाजात उभ्या असणार्या प्रवाशांना धक्का बसतो. हाताच्या जोरावर प्रवाशांना मागे रेटता आले नाही, तर दरवाजातला माणूस खाली पडण्याची शक्यता असते. 12 डब्यांच्या एका लोकलची प्रवासी क्षमता 3 हजार 750 इतकी आहे; पण क्षमतेपेक्षा किती तरी जास्त प्रवासी प्रवास करतात. लोकलच्या फेर्या वाढवण्याऐवजी, मेल व एक्स्प्रेसच्या फेर्या वाढवल्या आहेत. सर्व निर्णय रेल्वेच्या दिल्ली कार्यालयातून घेतले जात असल्यामुळे, मुंबईतील लोकल प्रवाशांच्या समस्यांची तत्काळ आणि पुरेशी दखल घेतलीच जात नाही. रेल्वे गाड्यांच्या मर्यादित फेर्यांमुळे प्रत्येक गाडीत लोक मेंढराप्रमाणे कोंबले जातात. पश्चिम रेल्वेतून सुमारे 35 लाख आणि मध्य रेल्वेच्या लोकलमधून 35 ते 40 लाख लोक रोज प्रवास करतात.
मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांमधून तीन ते चार लाख प्रवासी रोज जात-येत असतात. त्यातही मध्य रेल्वेच्या गाड्यांमधून सकाळी आणि सायंकाळी 83 टक्के लोक प्रवास करतात. मध्य रेल्वेवरून रोज 1,810 लोकल फेर्या चालवल्या जातात, असा दावा रेल्वे प्रशासनाकडून केला जातो; पण त्यापैकी अनेक फेर्या आयत्यावेळी रद्द होतात वा बर्याचदा लोकल उशिराने धावतात. 2024-25 मध्ये जानेवारी 2025 पर्यंतच 35 हजार लोकल फेर्या विलंबाने धावल्या होत्या. गेल्या वीस वर्षांत मुंबईतील उपनगरीय प्रवासी प्रवासादरम्यान 51 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू टाळता येणार नाहीत का? यात रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू झाले असून, गर्दीच्या वेळी लोकलमधून पडल्यामुळे आणि प्रवासादरम्यान खांबाला आपटून खाली पडल्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाणही जास्त आहे. अपघातानंतर जखमींना अनेकदा वेळेवर उपचारही मिळत नाहीत. कित्येक रेल्वेस्थानकांवर रुग्णवाहिकेची व्यवस्था नसते. याबाबत उच्च न्यायालयाने रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले असूनही, ढिम्म यंत्रणा हलायला तयार नाही. एसी लोकल आणि वाढत्या प्रवासीसंख्येचा अभिमान बाळगू नका. सामान्य लोक ज्या भयानक अवस्थेत प्रवास करतात, ते लाजिरवाणे आहे. रोजच्या रोज होणारे मृत्यू कसे कमी होतील, याकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला यापूर्वीच सुनावले होते.
वास्तविक, मुंबईतील रेल्वे प्रवाशांच्या सुविधांचा व प्रश्नांचा विचार करण्यासाठी येथे स्वतंत्र रेल्वे बोर्ड निर्माण करण्याची गरज आहे. तसेच, प्रवासी संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांची गंभीरपणे दखल घेणे तितकेच गरजेचे आहे. लोकांनी शिस्त पाळली पाहिजे, असे उपदेशाचे डोस एका माजी खासदाराने या अपघातानंतर प्रतिक्रिया देताना पाजले! जोखीम घेऊन दरवाजात उभे राहून प्रवास करण्याची कोणाला हौस नसते. हातावर पोट असलेल्यांना रोज कामावर वेळेवर जावे लागते. नाही तर लेटमार्क पडतो किंवा पगार कापला जातो. या दुर्घटना टाळण्यासाठी उपाय म्हणून उपनगरीय रेल्वे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो तर रोगापेक्षा इलाज भयंकर अशातला प्रकार! कारण हे दरवाजे एकदम बंद केल्यामुळे प्रवासी जखमी होऊ शकतात, तसेच डब्यामध्ये मोठ्या संख्येत लोक असल्यामुळे ते गुदमरण्याचीही शक्यता आहे. प्रवाशांची नियंत्रित संख्या असेल, तर अशाप्रकारचे दरवाजे बसवणे योग्य ठरेल. शिवाय, हे दरवाजे चालू आणि बंद होण्यामुळे लोकलचा प्रवास काळ वाढवून फेर्या कमी होतील. रेल्वेस्थानकांवर चेंगराचेंगरीच्या घटना नव्या नाहीत. असे असूनही गर्दीचे नियोजन करण्यासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत.
वास्तविक, कार्यालयांच्या वेळा बदलून प्रवाशांची संख्या नियंत्रित करता येऊ शकेल. तसेच, कुर्ला ते कल्याण मार्गावर उपलब्ध सहा ट्रॅकपैकी चार लोकलसाठी आरक्षित असतानाही, रेल्वेतर्फे दूर पल्ल्याच्या गाड्या त्यावरून चालवण्यात येतात. हे आक्रमण थांबले पाहिजे. अनेक रेल्वेस्थानकांवरील सरकते जिने बंद असतात. प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी पुरेसे बाक नाहीत. स्वच्छतेच्या नावाने आनंदीआनंद! एसी लोकल आणि वंदे भारत एक्स्प्रेसपेक्षा नॉन एसी लोकल गाड्यांची व फेर्यांची संख्या वाढवणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व ते प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. ‘मरणास रोज आम्ही, लटकायचे किती?’ हा प्रत्येक मुंबईकराचा आर्त सवाल आहे.