

यंदाच्या महादुष्काळाने राज्यातील ग्रामीण भागात भीषण परिस्थिती उद्भवलेली आहेच; पण देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबईही जलसंकटाचा सामना करत आहे. मुंबईत दिवसागणिक वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्न भविष्यात अतिगंभीर स्वरूप धारण करू शकतो याची झलक सध्याच्या दुष्काळाने दाखवून दिली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ३१० तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. यात मुंबईतील एकही भाग नाही. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा नोव्हेंबर अखेरीस सुमारे ७० ते ७९ टक्क्यांवर आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे दररोज सुमारे २५० दशलक्ष लिटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. मे महिन्याच्या मध्यापासून शहरात दहा टक्के पाणीकपात सुरू आहे. आता ती २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार आहे. महापालिकेने इमारतींच्या बांधकाम प्रकल्पांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. डिसेंबरनंतर जलतरण तलाव, बाटलीबंद पाणी आणि शीतपेये तयार करणाऱ्या कारखान्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासोबतच खासगी विहिरींतील अनियंत्रित पाणी उपशावरही कडक निर्बंध लादण्याचे नियोजन आहे.
तरीही आगामी उन्हाळ्यात मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. वाढती लोकसंख्या, विस्तारणारे महानगर आणि भविष्यातील औद्योगिक व नागरी गरजा लक्षात घेतल्या, तर मुंबईला पुढील काही दशकांसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधावे लागतील. याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शीपणाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती झाल्यानंतर समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न अनेक दशके चर्चेचा विषय राहिला. या धरणात साठणारे पाणी पूर्वेकडील कृष्णा खोऱ्यातील असले, तरी वीजनिर्मितीसाठी ते पश्चिमेकडे वळवले जाते. या प्रक्रियेत पोफळी आणि अलोरे येथील जलविद्युत केंद्रांतून वीजनिर्मिती केल्यानंतर हे अवजल (टेल रेस वॉटर) थेट वाशिष्ठी नदीत सोडले जाते आणि पुढे चिपळूणमार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळते.
एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना, दरवर्षी कोट्यवधी घनमीटर गोडे पाणी समुद्रात वाहून जाणे हा विरोधाभास आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आणि कृष्णा पाणी तंटा लवादाच्या (बचावत व ब्रिजेश कुमार लवाद) निर्णयानुसार, कोयना धरणाची एकूण साठवण क्षमता १०५.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) इतकी आहे. यापैकी ६७.५० अब्ज घनफूट पाणी हे पश्चिमेकडील जलविद्युत निर्मितीसाठी आरक्षित आहे. या पाण्याद्वारे दरवर्षी सरासरी १,९६० मेगावॅट वीजनिर्मिती होते. भारनियमन मुक्ती आणि उद्योगांसाठी ही वीज महत्त्वाची ठरते. मात्र, वीजनिर्मितीनंतर बाहेर पडणारे हे संपूर्ण ६७.५० अब्ज घनफूट पाणी समुद्रात विलीन होते. या पाण्याचा कोकणचा विकास आणि मुंबईची तहान भागवण्यासाठी वापर करण्याबाबत राज्य शासनाने विविध समित्या आणि अहवालांतून चाचपणी केली. हे पाणी कोकणातील सिंचन प्रकल्प किंवा मुंबई व रायगड जिल्ह्यातील औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्यासाठी वळवण्याचा प्रस्ताव होता. आता राज्य सरकारने मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या पुढील ५० वर्षांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हे पाणी मुंबईकडे वळवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली. कोयना धरणाच्या वरील पाणलोट क्षेत्रात कोणतेही मोठे औद्योगिक प्रकल्प नसल्याने हे पाणी शुद्ध मानले जाते.
वीजनिर्मितीनंतर हे पाणी दाभोळ खाडीमार्गे अरबी समुद्रात जाते. मोठ्या भुयारी जलबोगद्यांद्वारे आणि बंदिस्त जलवाहिन्यांतून कोकण किनारपट्टीला समांतर नेऊन मुंबईपर्यंत हे पाणी पोहोचवण्याचे नियोजन आहे. यामुळे सध्याच्या तानसा, वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांवरील ताण कमी होऊन मुंबई महानगराला अतिरिक्त आणि शाश्वत पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल. अर्थात, हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरवणे आव्हानात्मक आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आणि विविध तांत्रिक सल्लागार समित्यांच्या अहवालांनुसार, हे अवजल अडवून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपसा सिंचन योजना किंवा जलवाहिनी प्रकल्प उभारावे लागतील. यासाठी प्रचंड ऊर्जा आणि भांडवली खर्च लागेल. पर्यावरणीय आव्हानेही असतील. चिपळूण आणि दाभोळ खाडी परिसरातील जलपरिसंस्था, मत्स्यव्यवसाय, शेती आणि भूजल पातळीवर काय परिणाम होतील, याचाही विचार होणे आवश्यक आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांची तहान भागवणाऱ्या सातही जलाशयांची एकत्रित उपयुक्त पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून, त्यातून दररोज सुमारे ३ हजार ९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येतील वाढीमुळे सध्याची दैनिक पाण्याची मागणी ८ हजार २६२ दशलक्ष लिटरवर पोहोचली आहे. भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन डॉ. माधवराव चितळे समितीने पालघर जिल्ह्यातील गारगाई आणि पिंजाळ हे दोन महत्त्वाचे धरण प्रकल्प प्रस्तावित केले होते. या दोन्ही प्रकल्पांमधून मुंबईला दररोज एकूण १३०५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा अंदाज वर्तवला होता. तथापि, गारगाई धरण प्रकल्पासाठी तानसा अभयारण्यातील वनजमीन बाधित होत असल्याने आणि लाखो झाडे तोडावी लागणार असल्याने पर्यावरणप्रेमींचा त्याला विरोध होता. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प तात्पुरता बासनात गुंडाळला. मात्र, महायुती सरकारने या प्रकल्पाला पुन्हा चालना दिली.
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या संबंधित समित्यांकडून वनजमीन वळतीकरणाच्या आणि वन्यजीव संरक्षणाच्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया बृहन्मुंबई महापालिकेकडून वेगाने राबवली जात आहे. पालघर जिल्ह्यातीलच जव्हार आणि मोखाडा तालुक्यांच्या सीमेवर पिंजाळ नदीवरील प्रकल्पातून दररोज ८६५ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची शक्यता असून हे पाणी बोगद्याद्वारे गारगाई धरणात आणि तेथून पुढे मोडक सागर धरणामार्गे मुंबईत आणण्याचे नियोजन आहे. राज्य शासनाने हा प्रकल्प बृहन्मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे. मात्र, तेथेही भूसंपादन, बाधित आदिवासी गावांचे पुनर्वसन आणि वाढलेला खर्च या बाबी प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरल्या आहेत. निधी असूनही परवानग्या आणि पुनर्वसनाच्या गुंतागुंतीमुळे हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्ष बांधकामाच्या टप्प्यावर येण्यास विलंब होत आहे. या पार्श्वभूमीवर कोयनेचे अवजल वळवण्याची योजना प्रत्यक्षात कशी आणि कधी अवतरणार याकडे मुंबईकरांचे लक्ष आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तात्पुरते उपाय करण्यापेक्षा आधीच पर्यायी स्रोत विकसित करणे हा मुख्यमंत्र्यांचा दूरदर्शीपणा स्वागतार्ह आहे. कोयनेचे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागांपर्यंत पोहोचवण्याची मागणीही अनेक वर्षांपासून होत आहे. त्याबाबतही राज्य सरकाराने गतिशीलता दाखवायला हवी.