

जर कुठे नोकरी करत असाल तर हा प्रश्न तुम्हाला नेहमी विचारला जात असणार. शेजारपाजारचे विचारतील, सहकारी विचारतील, दुकानदार विचारतील, नाही नाही ते लोक तुम्हाला तुमचा पगार किती, हा प्रश्न विचारत असतात. आपणही आपल्या मुलीसाठी किंवा बहिणीसाठी वरसंशोधन करताना स्थळ शोधत असतो. पहिला प्रश्न असतो, तो म्हणजे मुलाला नोकरी आहे का? असेल तर पुढचा प्रश्न असतो, सरकारी आहे की खासगी आहे? या दोन्हीपैकी काहीही उत्तर आले तरी पुढचा प्रश्न असतो, मुलाचा पगार किती आहे? पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये नोकरी असेल तर मुलाचे पॅकेज किती आहे, असा प्रश्न विचारला जातो. पॅकेज म्हणजे वर्षभराचा पगार आणि नुसता पगार म्हणजे एक महिन्याचा पगार असा त्याचा अर्थ असतो. महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे पुरेसे आहेत इतका पगार असेल तर ते घर सुखवस्तू आहे, असे समजले जाते. सुखवस्तू घरामध्ये मुलगी द्यायला कोणीही तयार असते. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीनच पगाराचे काढले आहे आज? सांगत आहोत.
नुकतीच रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या बाबतीतील एक बातमी स्थानिक आणि राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये झळकली. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सलग चौथ्या वर्षी एक रुपयाही पगार म्हणून घेतलेला नाही. रिलायन्समध्ये शून्य पगारावर काम करणारे मुकेश अंबानी हे एकमेव अधिकारी आहेत, असाही त्या बातमीत उल्लेख आहे. याचा अर्थ मुकेशभाई पण बिनपगारी, फुल्ल अधिकारी आहेत.
आपल्यासारख्या सामान्य माणसांना हा प्रश्न पडतो की, स्वतःच्याच कंपनीमध्ये मुकेश अंबानी पगार घेतील तरी कशासाठी? रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुकेश अंबानींनी वेतन घेतलेले नाही; पण त्यांची तीन मुले आणि पत्नी नीता अंबानी संचालक मंडळात सामील होण्यासाठी काही एक मानधन घेतात. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी असतात बाबांनो. आपल्याला त्या समजणार नाहीत. 2008-09 ते 2019-20 पर्यंत मुकेश अंबानी वार्षिक 15 कोटी रुपये पगार घेत असत.2020 मध्ये म्हणजे कोरोना काळात कंपनीवरील दबाव कमी कमी करण्यासाठी त्यांनी पगार घेतला नाही आणि त्या निर्णयावर ते अद्यापही ठाम आहेत. ज्याची कंपनीच हजारो कोटींची आहे आणि ज्याची वार्षिक उलाढाल पाकिस्तानच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठी आहे, त्या माणसाला पगाराचे कसले आले हो कौतुक! जगातील मोठमोठ्या अब्जाधीश व्यक्तींच्या पंक्तीत विराजमान मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 190 अब्ज डॉलर आहे. ज्यांच्या चिरंजीवाचे प्री-वेडिंग आणि लग्न शेकडो कोटी रुपये खर्च करून झाले, त्या माणसाला पगाराचे कसले आले आहे कौतुक! पगार ही तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या कौतुकाची गोष्ट असते. एक तारखेला पगार झाल्यानंतर घरी बायकोही,चार दिवस का होईना, पण प्रेमाने बोलत असते आणि गोडधोड खाऊ घालत असते. सामान्य माणसाला 25 तारखेला म्हणजे महिनाअखेर जवळ आल्यानंतर जर मुलांची फी भरण्याची वेळ आली तर त्याची दमछाक होते. आपण सर्वसाधारण लोक आहे त्या पगारामध्ये आपल्या संसाराचा गाडा अत्यंत कौशल्याने ओढत असतो. त्या पगाराची कुठेही जगात चर्चा होणार नाही. असो. आपल्याला काय करायचे आहे?