महाराणी ताराबाई यांचे महाचरित्र

Mogalmardini Maharani Tarabai
महाराणी ताराबाई यांचे महाचरित्रPudhari File Photo
Published on
Updated on
डॉ. श्रीमंत कोकाटे

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आज (24 जानेवारी) होत आहे. त्यानिमित्ताने.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यानी ऐतिहासिक साधनांच्या आधारे इतिहासाची निःपक्षपाती मांडणी केली आहे. त्यांनी शिवचरित्र, छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, शिवपुत्र राजाराम महाराज, मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध, क्रांतिसिंह नाना पाटील ग्रंथ लिहिले आहेत. विशेषतः राजर्षी शाहू महाराज यांच्यावर त्यांनी केलेले संशोधन आणि लेखन हे आधुनिक महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक ठरले आहे. त्यांचे शाहू चरित्र जगभरातील महत्त्वाच्या भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. अलीकडच्या काळात त्यांनी लिहिलेले ‘महाराणी ताराबाई’ यांचे चरित्र प्रकाशित होत आहे. हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. कारण अशा प्रकारचा संशोधनात्मक आणि प्रदीर्घ ग्रंथ प्रथमच प्रकाशित होत आहे. हा ग्रंथ सुमारे 786 पृष्ठांचा आहे. या ग्रंथासाठी डॉ. पवार यांनी समकालीन आणि उत्तरकालीन 104 संदर्भ साधनांचा परामर्श घेतलेला आहे. महाराणी ताराबाईंच्या कार्याला योग्य न्याय देणारा हा ग्रंथ आहे. प्रस्तुत ग्रंथ दोन खंडात विभागलेला असून पहिल्या खंडात एकूण 25 प्रकरणे आणि दुसर्‍या खंडात 12 प्रकरणे आहेत. तसेच परिशिष्टांचाही समावेश आहे. त्यांच्या या कार्यामुळे महाराणी ताराबाईंचे कार्य, कर्तृृत्व, विचार विस्तृतपणे महाराष्ट्राला समजणार आहे. या ग्रंथामुळे महाराणी ताराबाईंचे शौर्य, धैर्य, पराक्रम, स्वाभीमान, निर्भीडपणा, दूरद़ृटी, मुत्सुद्दीपणा, संघटन कौशल्य, लढाऊपणा नव्याने महाराष्ट्राला ज्ञात होणार आहे. प्रतिकुल काळात त्यांनी (ताराबाई) स्वराज्य रक्षणासाठी जो संघर्ष केला त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. औरंगजेबासारख्या सत्ताधिशांविरुद्ध त्या 7 वर्षे लढल्या आणि शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण केले. अशा प्रकारचा पराक्रम करणारी अन्य स्त्री इतिहासात झालेली नाही, असे डॉ. पवार यांनी प्रस्तुत ग्रंथात ऐतिहासिक संदर्भाच्या आधारे सिद्ध केले आहे.

इतिहास केवळ पुरुषांनीच घडविला असे नाही, तर स्त्रियांनीही इतिहास घडविला. लढाऊपणा, मुत्सुद्दीपणा, राजनीती, प्रशासन इत्यादी गुण केवळ पुरुषांकडेच असतात असे नाही, तर स्त्रियाही शूर, पराक्रमी, मुत्सद्दी आणि उत्तम राजनीतिज्ञ असतात, हे डॉ. पवार लिखित ‘महाराणी ताराबाई’ हे चरित्र सिद्ध करते. महाराणी ताराबाईंचा संघर्ष कठीण काळातील आहे. सासरे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अकाली निधन झाले. छत्रपती संभाजी महाराज यांची ऐन तारुण्यात औरंगजेबाने हत्या केली. पती राजाराम महाराज यांचे ऐन तारुण्यात निधन झाले. त्यावेळेस ताराराणी यांचे वय केवळ 25 वर्षांचे होते. औरंगजेब हा संपूर्ण फौज (सुमारे सात लाखांची) आणि सुमारे पन्नास कोटी रुपयांचा वार्षिक महसूल घेऊन महाराष्ट्रात तळ ठोकून होता. यावेळेस ताराराणींचे सैन्य सुमारे 1 लाख व वार्षिक महसूल सुमारे 1 कोटींचा होता. अर्ध्या आशिया खंडावर वर्चस्व असणार्‍या धुर्त, पाताळयंत्री औरंगजेबाविरुद्ध ताराराणी 7 वर्षे लढल्या. मराठ्यांचे राज्य सहज हस्तगत करू, अशा अविर्भावात असणार्‍या औरंगजेबाला ताराराणींनी स्वराज्यातच नेस्तनाबूत केले.

समकालीन संदर्भाच्या आधारे डॉ. पवार यांनी ताराबाईंचा ज्वलंत इतिहास साक्षात समोर उभा केलेला आहे. आपण मुलगी, स्त्री असल्याचा न्यूनगंड नष्ट करणारे हे चरित्र आहे. आपली मुलगी ताराराणी सारखी निर्भीड आणि कर्तृत्ववान झाली पाहिजे, अशी प्रेरणा देणारा ग्रंथ आहे. हतबल झालेल्या जनतेला लढाऊपणा शिकवणारा हा ग्रंथ आहे. प्रस्तुत ग्रंथाला सुमारे 140 पृष्ठांची लेखकाची प्रस्तावना आहे. महाराणी ताराराणी यांच्या मोहिते घराण्याची (माहेर) दुर्मीळ माहिती या ग्रंथात आहे. ताराबाईंच्या काळात धनाजी जाधव, हिंदुराव घोरपडे, हणमंतराव घोरपडे, नेमाजी शिंदे इत्यादींनी मोठा पराक्रम गाजविला. औरंगजेबाने सह्याद्रीला विळखा घातला होता. पती राजाराम महाराजांचे वयाच्या तिसाव्या वर्षी सिंहगडावर निधन झाले. दुःखाने खचून न जाता त्या स्वराज्य रक्षणासाठी पुढे आल्या. सती न जाता त्यांनी मोगलांविरुद्ध लढा दिला. डॉ. पवार यांनी प्रस्तुत ग्रंथात प्रतिकुल काळात ताराराणी यांनी दाखविलेले धाडस, शौर्य, कार्य, पराक्रम, मुत्सद्दीपणा, उत्तम नियोजन याबाबत विस्ताराने मांडणी केली आहे. तसेच औरंगजेबाची धर्मांधता, त्याचे कुटील राजकारण, त्याने लागू केलेला जिझिया- त्यामध्ये केलेली वाढ, शाहू महाराजांवर धर्मांतरासाठी टाकलेला दबाब, याबाबतची ऐतिहासिक माहिती त्यांनी विस्ताराने दिलेली आहे. ताराबाईंच्या पराक्रमामुळे औरंगजेबाला त्याचा जो हेतू होता, तो साध्य करता आला नाही. डॉ. पवार यांनी समकालीन ऐतिहासिक नोंदीच्या आधार ताराबाईंचे वस्तुनिष्ठ, ऐतिहासिक आणि प्रदीर्घ असे चरित्र लिहिले आहे. हे मराठी वाचकांसाठी प्रथमच उपलब्ध होत आहे. पुत्र शिवाजी (दुसरा) यांना मांडीवर बसवून ताराबाईंनी राज्यकारभार केला, एका हातात तलवार तर दुसर्‍या हातात प्रशासन असा कारभार त्यांनी केला. पुत्राचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी सावत्रपुत्र संभाजी (दुसरा) यांना गादीवर बसवून राज्यकारभार केला. शाहू महाराज (पहिले) यांची मोगलांच्या कैदेतून सुटका झाल्यावर खेड (जि. पुणे) येथे त्यांच्याशी ताराबाईंच्या सैन्याची चकमक झाली, पण पुढे 13 एप्रिल 1731 रोजी वारणेच्या तहाने सातारा आणि कोल्हापूर अशी राज्याची विभागणी झाली. शाहू महाराजांनी चुलती ताराबाई यांना आदराने सांभाळले. शाहू महाराजांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ताराबाई करारी होत्या. त्या निर्भीड आणि स्वाभिमानी होत्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news