पाकची भीतीने गाळण

PM Modi on terrorism
पाकची भीतीने गाळणfile photo
Published on
Updated on

दहशतवाद्यांनी कधी कल्पनाही केली नसेल, अशी कठोर शिक्षा त्यांना व ज्यांनी हा कट रचला अशांना दिली जाईल. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍यांचा कणा मोडून टाकेल, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला उद्देशून दिला होता. आता पहलगाममधील हल्ल्याला लष्करी कारवाईद्वारे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांनी संरक्षण दलांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी दिलेल्या या संदेशामुळे पाकिस्तानला आता धडा शिकवला जाणार, अशीच चिन्हे आहेत.

26-11 च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर भारताने प्रतिहल्ला करणे आवश्यक होते; पण तसे घडले नाही; पण उरी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, तर पुलवामाच्या हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये हवाईहल्ला चढवून भारताने पाकला चांगलाच झटका दिला होता. मात्र, घाईघाईत कोणताही निर्णय घेणे योग्य होणार नाही. सैन्यदलांची तयारी, देशातील राजकीय परिस्थिती व आर्थिक ताकद या तीनही मुद्द्यांवर विचार केल्यानंतर धोरण निश्चित होईल. सुदैवाने संपूर्ण देशातून पाकिस्तानविरोधी करवाईसाठी जनसमर्थन आहेच. योग्य ती कृती करण्यासाठी सर्वच पक्षांनी भारत सरकारला पाठिंबा दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या दुकानदारांनी बंद पाळून व मोर्चे काढून पहलगाममधील मृतांबद्दलच्या भावना प्रकट केल्या. ‘कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापार्‍यांच्या संघटनेने पाकिस्तानशी तत्काळ व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशहितापुढे व्यापारी हित मोठे नाही, असे या संघटनेचे मत असून, ते अभिनंदनीय आहे. काश्मीरमधील 48 पर्यटनस्थळे सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून बंद करण्याचा सावधगिरीचा उपाय योजला आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमधील 60 पाकिस्तानी नागरिकांना तेथून हाकलून दिले आहे. 2010 मध्ये अनेक दहशतवाद्यांनी शरणागती पत्करत, मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होती. अशा दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी पत्नी, तसेच मुलांना देशाबाहेर काढले जात आहे. याप्रकारच्या उपाययोजना करणे गरजेचे होते. तसेच, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अल्जेरिया, ग्रीस, गयाना, पनामा, स्लोव्हानिया, सिएरा लिओन, तसेच सोमालिया या संयुक्त राष्ट्रांमधील सुरक्षा परिषदेच्या 7 अस्थायी सदस्य असलेल्या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. सुरक्षा परिषेदत भारताला समर्थन मिळण्यासाठी परराष्ट्र विभाग गंभीरतापूर्वक प्रयत्न करत आहे; तर दहशतवादाला खतपाणी घालण्याचा देशाचा काळा इतिहास पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ यांनी उघड केल्याचे सांगत, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पाकचे कारस्थान चव्हाट्यावर आणले आहे.

पाकिस्तान हा दहशतवादाला प्रोत्साहन देणारा बदमाश देश आहे, असे संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या सहायक कायम प्रतिनिधी योजना पटेल यांनी सांगितले आणि पाकची अब्रूच वेशीवर टांगली. पाकिस्तानसोबत केलेल्या सिंधू करारातील पाणी थांबवण्याचा निर्णय भारताने यापूर्वीच घेतला असून, प्रत्यक्षात हे पाणी थांबवले, तर भारताने युद्धासाठी तयार राहावे. घोरी, शाहिन, गझनवी ही क्षेपणास्त्रे केवळ प्रदर्शनासाठी नाहीत, तर भारताला उत्तर देण्यासाठी ठेवली आहेत. आमच्याकडे 130 अण्वस्त्रे असून, तीही आम्ही वापरू, अशी धमकी पाकचे मंत्री हनीफ अब्बासी यांनी दिली आहे. यापूर्वीही पाकिस्तानच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी अशा वल्गना केल्या होत्या; पण भारताने सामर्थ्य दाखवताच, त्यांचे हे शब्द हवेत विरून गेले होते. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, म्हणून आपण ‘अरेला कारे’ करता कामा नये, ही मिळमिळीत भूमिका भारताने केव्हाच सोडून दिलेली आहे. एकीकडे पाकिस्तान युद्धासाठी तयार असल्याच्या बाता मारत असतानाच, त्या देशाची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे.

बलुचिस्तान आणि सिंध प्रांतांत स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. खैबर पख्तुनख्वामध्ये तालिबानी बंडखोरांचा धुडगूस सुरू आहे; तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात लोक रस्त्यावर येत असतात. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारतविरोधी प्रक्षोभक वक्तव्य केल्यानंतरच पहलगाम हल्ला झाला. ते भारतविरोधी कितीही गर्जना करत असले, तरी उद्या भारत काय करेल, या भीतीपोटी मुनीर यांच्यासह काही लष्करी अधिकारी व नेत्यांनी कुटुंबीयांना विदेशात धाडले आहे. रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकी देणारे पाकिस्तानचे खासदार बिलावल भुट्टो यांनीही भावंडांना कॅनडाला धाडले आहे. शेकडो लष्करी अधिकारी व सैनिकांनी नोकरीचाच राजीनामा देऊन टाकला आहे.

खरे तर, पहलगामनंतर भारताने घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान हादरला आहे. शिवाय, भारताच्या निम्मेही सैन्यबळ पाकिस्तानकडे नाही. भारत तुफानी हल्ला चढवेल, या भीतीमुळे पाकिस्तानची सध्या गाळण उडाली आहे. पाकिस्तानला अद्दल घडवण्याची पूर्ण मोकळीक भारतीय लष्करास दिल्याच्या वृत्तामुळे पाकिस्तानला घाम फुटला आहे. 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचे 8 हजार सैनिक मारले होते. तसेच, पाकिस्तानची 86 विमाने व 226 रणगाडे नष्ट केले होते. पाकिस्तानच्या 90 हजार सैनिकांना भारतीय लष्कराने युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले.

या युद्धात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे अध्यक्ष जनरल याह्याखान यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यापूर्वीचे 1965 चे युद्ध हे प्रामुख्याने वायव्य काश्मीर आणि पंजाब या भागात लढले गेले. लालबहादूर शास्त्री यांचे उत्तुंग नेतृत्व देशाला तेव्हा लाभले होते. त्यात पाकिस्तानच्या 5 हजार सैनिकांचा भारताने खात्मा केला होता. पाकचे 300 रणगाडे आणि 50 लढाऊ विमाने उद्ध्वस्त केली होती. त्या युद्धात भारतीय सैन्याने लाहोरच्या दिशेने कूच केले होते; पण आंतरराष्ट्रीय आवाहनानंतर भारताने लाहोरवर आक्रमण करण्याचे टाळले आणि त्यामुळे पाकिस्तान बचावला. त्यावेळी पाकिस्तानने काश्मीर बळकावण्याची योजना आखली होती, ती भारताने उधळून लावली आणि त्यांना सणसणीत चोप दिला. वारंवार मार खाऊनही पाकिस्तानचे पोट भरलेले नाही, असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news