

लग्न समारंभामध्ये तीन-चार फोटोग्राफर, दोन-तीन व्हिडीओग्राफर आणि एखादा ड्रोन कॅमेरा यांनी शूटिंग सुरू असते. लग्न आयुष्यात एकच वेळेला होणार असल्यामुळे फोटोशूटला खूप महत्त्व आले आहे. लग्नाच्या आधी प्री-वेडिंग म्हणजे विवाहपूर्व फोटोशूट केले जाते. शहरांमध्ये या फोटोशूटचा खर्च लाख रुपयांपर्यंत असतो. निसर्गरम्य ठिकाणी स्टुडिओ काही तासांसाठी घेऊन शूटिंग करणारे फोटोग्राफर असतात. कोकणात समुद्रकिनारीही प्री-वेडिंग शूट वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते.
विवाह समारंभाचे शूट संपल्यानंतर काही दिवसांनी दिवस गेले की, पूर्वी डोहाळे जेवणाचे कार्यक्रम केले जात असत. आता बम्प शूट केले जाते. हे अशात कॉमन झाले आहे. परवा एका ठिकाणी नवीनच प्रकार पाहायला मिळाला. लॉबीमध्ये संपूर्ण मेकअप करून एक महिला आली. सोबत फोटोदादा होतेच. नेमके कशाचे फोटो शूट आहे समजायला मार्ग नव्हता; परंतु त्या महिलेची एकंदरीत परिस्थिती पाहता अंदाज येणे सोपे होते.
दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ऍडमिट होण्यापूर्वी सुरू असलेले ते फोटोशूट होते. हा प्रकार एखाद्या हॉटेलमध्ये सुरू असावा, असा होता; पण तो हॉस्पिटलमध्ये सुरू होता. ती महिला चाकाच्या दोन-तीन सुटकेस घेऊन आलेली होती आणि विविध अँगलमध्ये फोटो काढून हौस भागवून घेत होती. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी डिलिव्हरी झालेल्या एका महिलेचे बाळ सजवलेल्या बाबागाडीमध्ये स्वतःच्या घरी निघाले होते. तिथे पण तीन-चार फोटोग्राफर शूटिंग करत होते.
हे फोटोशूटचे प्रकार अचंबित करणारे आहेत. सध्या एकच फोटोशूट बाकी आहे. घरातील एखादी व्यक्ती मरणासन्न असून, शेवटच्या घटका मोजत आहे. या शेवटच्या घटका मोजण्याचे फोटोशूट अद्याप पाहण्यात आले नाही. काही हौशी लोक नजीकच्या काळामध्ये असेही फोटोशूट करून ती हौस भागवून घेतील की काय, अशी शक्यता नाकारता येत नाही. घरातील एखादी जवळची व्यक्ती गेल्यानंतर हंबरडा फोडतानाच्या डेडबॉडीबरोबरच्या सेल्फीही पाहण्यात आल्या आहेत.
फोटो व रील्स यांच्या गदारोळात शूटचे महत्त्व खूपच वाढलेले दिसून येत आहे. नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे अवघ्या काही मिनिटांत केले जाणारे शूट आता पाहायचे बाकी आहे. नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाचे पहिला श्वास घेतानाच अवघ्या काही मिनिटांत केलेले फोटोशूट पाहायचे अद्याप बाकी आहे. दवाखान्यांमध्ये कदाचित याला परवानगी दिली जात नसावी म्हणूनच ते केले गेले नसेल, असे वाटते.