Mitesh Khapra IIT Madras |मितेश खाप्रा

सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट
mitesh-khapra-included-time-100-most-influential-2025
influential personalities 2025 India |मितेश खाप्रा Pudhari File Photo
Published on
Updated on

सिलिकॉन व्हॅलीमधील व्यावसायिक दिग्गजांचे वर्चस्व असलेल्या जागतिक एआय क्षेत्रात एका भारतीय प्राध्यापकाने प्रभावी, ओपन सोर्स संशोधनाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. आयआयटी मद्रासमध्ये असोसिएट प्रोफेसर असलेल्या मितेश खाप्रा यांचे नाव ‘टाईम’ मासिकाच्या 2025 मधील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट केले आहे. ज्यात एलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन यांच्यासारख्या जागतिक दिग्गजांचाही समावेश आहे, या यादीत खाप्रा यांचा समावेश जागतिक एआय क्षेत्रात भारताचा वाढता दबदबा दर्शवतो. या यादीतील अनेकजण कुठल्यातरी अब्जावधी डॉलरच्या टेक कंपनीचे नेतृत्व करतात. पण खाप्रा यामध्ये वेगळे आहेत. पण त्यांनी केलेले मूलभूत काम भारताच्या भाषिक एआय क्रांतीचा कणा आहे. खाप्रा यांच्या संशोधनाची आणि त्यांच्या ‘एआय4भारत’ उपक्रमाची प्रेरणा केवळ शैक्षणिक किंवा व्यावसायिक उद्दिष्टांपुरती मर्यादित नाही.

तंत्रज्ञानामुळे समाजात निर्माण होणारी मोठी दरी त्यांना नेहमी अस्वस्थ करत होती. त्यांना हे स्पष्ट दिसत होते की, देशातील कोट्यवधी लोक स्मार्टफोन वापरत असले, तरी भाषांच्या अडथळ्यामुळे ते इंटरनेट आणि सरकारी सेवांचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाहीत. ही समस्या फक्त तंत्रज्ञानापुरती मर्यादित नव्हती, तर ती एक सामाजिक असमानतेला आमंत्रण देत होती. यावर उपाय शोधायला हवा याच विचारातून त्यांनी संशोधन एका मूलभूत प्रश्नावर केंद्रित केले. तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयासाठी सोपे आणि सुलभ कसे होईल याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी संपूर्ण लक्ष भारतीय भाषांसाठी एआय मॉडेल विकसित करण्यावर दिले. ही मोहीम सोपी नव्हती. कारण इंग्रजीप्रमाणे भारतीय भाषांसाठी पुरेसा डेटा उपलब्ध नव्हता. पण, हीच खरी संधी आहे, असे त्यांनी मानले आणि ते कामाला लागले. टीमसोबत देशभरातील 500 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रवास करून त्यांनी प्रत्येक भाषेचे आणि बोलीचे नमुने गोळा केले. हा डेटा गोळा करण्यामागची त्यांची प्रेरणा केवळ वैज्ञानिक नव्हती, तर ती प्रत्येक भारतीयाला डिजिटल जगात सन्मानाने स्थान मिळवून देण्याची होती. ते म्हणतात की, एकेकाळी पीएचडीचे विद्यार्थी फक्त इंग्रजीच्या भाषिक समस्येवर काम करायचे. पण आता भारतीय विद्यार्थी भारतीय समस्यांवर काम करत आहेत तेव्हा त्यांच्या कामामागील दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्ट होते. त्यांच्या या मूलभूत संशोधनामुळे आज शेकडो स्टार्टअप्सना भारतीय भाषांवर आधारित तंत्रज्ञान विकसित करणे शक्य झाले. तसेच त्यांच्या कामावर आधारित ‘भाषिणी’सारखे सरकारी कार्यक्रम ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या भाषेत सरकारी सेवा उपलब्ध करून देत आहेत. खाप्रा यांचे कार्य हे केवळ एक प्राध्यापकाचे संशोधन नाही, तर ते एका अशा व्यक्तीचे स्वप्न आहे, ज्याला तंत्रज्ञानाचा वापर समाजातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन अधिक चांगले अधिक उन्नत करण्यासाठी करायचा आहे.

- तानाजी खोत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news